शोधयात्रा भारताची #१९ – मंदिर स्थापत्य

अर्थशास्त्राच्या तिसऱ्या अध्यायात कौटिल्याने दुर्ग बांधणीचे नियम सांगितले आहेत. या मध्ये नदीदुर्ग (जलदुर्ग), पर्वतदुर्ग, धन्वदुर्ग (दलदलीच्या प्रदेशातील दुर्ग) आणि वन दुर्ग अशा दुर्गांचे वर्णन केले आहे. तर चौथ्या अध्यायात किल्ल्यामधील नगराची रचना वर्णन केली आहे. प्राचीन भारतातील स्थापत्यशास्त्राचे पुरावे म्हणून हे उल्लेख नक्कीच महत्वाचे ठरतात. पण अशा प्रकारच्या स्थापत्याचे अवशेष अतिशय दुर्मिळ आहेत. उत्तर प्रदेशातील अहिछत्र इथे सापडलेल्या अवशेषात उंच तटबंदीचे अवशेष मिळाले आहेत. तर पाटण्याजवळील कुमराहर येथे एका भव्य दालनाचे अवशेष मिळाले आहेत. हे दालन म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचा दरबार असावा असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. मात्र अशा प्रकारचे अवशेष फार कमी प्रमाणात आढळतात. याचे एक कारण असे असावे की प्राचीन काळातील इमारतींचे बांधकाम प्रामुख्याने लाकडात होत असे. त्यामुळे या इमारती आजपर्यंत टिकल्या नाहीत.

प्राचीन भारतीय स्थापत्याबद्दल बोलताना मंदिर स्थापत्य जाणून घेणे आवश्यक आहे आणि इंटरेस्टिंग सुद्धा! इस पूर्व दुसऱ्या शतकातील मंदिराच्या पायांचे अवशेष मिळाले आहेत. पण  इसवीसनाच्या चौथ्या शतकापासून म्हणजे गुप्त काळापासूनची  मंदिरे पाहायला मिळतात. छोटी आणि प्राथमिक स्वरूपाची ही  मंदिरे होती. ही मंदिरे बांधीव दगडाची होती. चार खांबांवर असणारे सपाट छत, प्रवेशद्वार आणि गर्भगृह (गाभारा) इतकी साधी रचना या सुरुवातीच्या मंदिरांची होती.

पण काही काळातच मंदिर स्थापत्याचा विकास होऊ लागला आणि नवनवीन मंदिरांची निर्मिती होऊ लागली. अगदी छोट्या स्वरूपात असणारी देवालये आता भव्य रचनेत रूपांतरित होऊ लागली. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील मलप्रभा नदीच्या खोऱ्यात बदामी, पट्टदकल आणि ऐहोळे येथील चालुक्य कालीन मंदिरे मंदिर स्थापत्याच्या विकासातील पुढचा टप्पा दर्शवितात. गुप्त काळातील एकखणी मंदिरापासून सुरू झालेले स्थापत्य आता ऐहोळे येथील दुर्गा मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेपर्यंत येऊन पोचले होते. या मंदिराचे तीन भाग आहेत आणि त्याचा गाभारा अर्धवर्तुळाकार आहे.

हळूहळू मंदिर स्थापत्याच्या द्रविड, नागर, वेसर, भूमिज अशा विविध शैली विकसित झाल्या. ढोबळमानाने द्रविड शैली दक्षिण भारतात तर नागर शैली उत्तर भारतात दिसून येते.

या कालखंडातील मंदिर स्थापत्य हे विलक्षण आश्चर्यकारक आहे. महाबलिपुरम येथे असणारे तटमंदिर (shore temple) समुद्रकिनाऱ्यावरच्या पाऊस, खारे वारे, अस्वस्थ करणारे उन या सगळ्यांचे घाव सोसून आजही वैभवशाली इतिहासाच्या खुणा अंगावर वागवत उभे आहे. तर ओडिशा मधील कोणार्क चे सूर्य मंदिर मंदिर स्थापत्याचा मानदंड आहे.

बाराव्या शतकात चंडेल घराण्याच्या कारकिर्दीत खजुराहो येथील मंदिरांची निर्मिती झाली. सुमारे ८५ मंदिरे असणाऱ्या या मंदिर समूहातील आता केवळ २५-२६ मंदिरे उभी आहेत. या मंदिरांमध्ये हिंदू मंदिरांबरोबर जैन मंदिरे ही आहेत. खजुराहो मधील मंदिरांच्या बाबतीत अनेक वदंता किंवा गॉसिप्स असल्या तरीही या मंदिरांच्या उल्लेखाशिवाय भारतीय मंदिर स्थापत्य अपूर्ण आहे. चौथ्या शतकाासून नवनिर्मित होणाऱ्या मंदिरांच्या परमोच्च स्थपत्याचा आविष्कार म्हणजे खजुराहो येथील मंदिरे आहेत!

१४ व्या शतकात दक्षिण भारतात विजयनगरचे बलाढ्य साम्राज्य परकीय आक्रमकांपासून अजूनही अनाघ्रात होते. या काळात या साम्राज्याची राजधानी असणाऱ्या हंपीला असंख्य देखण्या मंदिरांची आणि शिल्पांची निर्मिती झाली.

प्राचीन भारतामधील ही आणि अशी असंख्य मंदिरे भारतीय संस्कृती आणि परंपरांचा स्त्रोत आहेत ओजस्वी आणि अक्षय्य!

– विनिता हिरेमठ

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: