चौथ्या शतकात भारतातील बौद्ध भिक्षुंबरोबर, बौद्ध धर्म रेशीम मार्गाने चीन मध्ये पोचला. पुढच्या एक-दोन शतकात बौद्ध धर्म चीन मधून कोरिया मध्ये आणि मग जपान मध्ये पोचला. जपान मध्ये पोचलेल्या बौद्ध धर्मात हिंदू देवी देवता पण होत्या. या देवता जपान मध्ये जे स्थिरावल्या ते आजतगायत. आज जपान मध्ये – सरस्वती, गणपती, इंद्र, ब्रह्म, ईशान, वायू, सूर्य, चंद्र, चित्रगुप्त आदि अनेक देव मंदिरांतून दिसतात. अर्थात त्यांची इथली नावे मात्र वेगळी आहेत. बेन्झतेन म्हणजे सरस्वती. बोनतेन म्हणजे ब्रह्म. तैशाकुतेन म्हणजे इंद्र. इत्यादी. या सगळ्या नावातील ‘तेन’ म्हणजे ‘देव’. जपानी बोन-तेन म्हणजे आपला ब्रह्म-देव! वरील छायाचित्रे आहेत जपान मधील बोनतेनच्या जुन्या मूर्तींची – चतुरानन, हंसवाहन ब्रह्मदेवाची मूर्ती.
भारतीय विश्वात ब्रह्मदेव हा सृष्टीकर्ता असल्याने तो अनेक गोष्टींचा कर्ता मनाला जातो. त्यापैकी एक आहे अक्षरे किंवा लिपी. भारतातील प्राचीन लिपीला या आद्य कर्त्याचे नाव मिळाले – ब्राह्मी. देशकालानुरूप ब्राह्मी लिपीमध्ये बदल होत गेले, व त्यामधून तयार झाल्या उत्तरेत – गुप्त ब्राह्मी लिपी आणि दक्षिणेत ग्रंथ लिपी. साधारण ६ व्या शतकात गुप्त लिपीतून सिद्धम किंवा सिद्धमातृका ही लिपी तयार झाली. आपण आज वापरतो ती देवनागरी लिपी सिद्धम् मधून तयार झाली.

भारतात शेकडो बौद्ध ग्रंथ संस्कृत भाषेत व सिद्धम लिपीत लिहिले गेले. बौद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या बौद्ध भिक्षुंच्या बरोबर हजारो बौद्ध ग्रंथ चीन मध्ये पोचले. हे ग्रंथ सिद्धम लिपीत लिहिले होते. त्यावेळी चीन मधील बौद्ध संस्कृत भाषा व सिद्धम् लिपी शिकत असत. जपान मध्ये ८ व्या बौद्ध भिक्षू होऊन गेला – कूकइ. हा संस्कृत व सिद्धम् शिकण्यासाठी चीन मध्ये गेला. याने सिद्धम् लिपी जपानला नेली. त्याने जपान मध्ये शिंगोन नावाचा एक बौद्ध पंथ स्थापन केला. या पंथात गायली जाणारी सर्व मंत्रे संस्कृत भाषेत असून ते लिहिण्या करिता, आजही सिद्धम् लिपी वापरली जाते. जपान मधील शेकडो मंदिरातून सकाळ संध्याकाळ गोम (होम) केला जातो. या विधीत अग्नीमध्ये आहुती देत हे मंत्र गायले जातात. देवतेचे चित्र काढण्यापेक्षा अक्षरे लिहिणे सोपे, म्हणून त्या देवतेच्या बीजमंत्राच्या पहिल्या अक्षराचे चित्र काढायची पद्धत जपान मध्ये आहे. या चित्रांना शु-जी मंदर (बीज-अक्षर मंडळ) म्हटले जाते.

जपान मधील मंत्रांचे पठण करण्याच्या रूढीमुळे तेथील बौद्ध आजही सिद्धम् लिपी शिकतात व शिकवतात. फक्त, जपान मधील बौद्ध लोक, सिद्धम् लिपीला तिच्या जुन्या भारतीय नावाने ओळखतात – बोन्जी! बोन-तेनची अक्षरे. ब्रह्म-देवाची अक्षरे! अर्थात ‘ब्राह्मी लिपी’.
Reference –
- Sanskrit Beyond Text: The Use of Bonji (Siddham) in Mandala and Other Imagery in Ancient and Medieval Japan – Susan Dine
- This Unique 6th Century Script Vanished From India But Is Still Preserved in Japan! – TANVI PATEL
1 Comment