रामजन्मभूमी – पुरावे, पुरावे आणि पुरावे

रामजन्मभूमी वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने नुकताच आपला निकाल दिला. त्याद्वारे विवादास्पद जागा ही अनंत प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असल्याची श्रद्धा आणि विशास अनंत काळापासून हिंदू धर्मियांच्या मनामध्ये आहे ह्यावर पाचही न्यायाधीशांनी एकमताने शिक्कामोर्तब केलं. ह्या निकालामध्ये ह्या वादबिंदूंसंदर्भात एक पुरवणी जोडून दाव्यामध्ये दाखल विविध तोंडी आणि लेखी पुरावे न्यायालयाने चर्चिले आहेत. हा वाद वेगवेगळ्या दाव्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे तयार केला गेला होता. जसं की ही विवादास्पद जमीन प्रभू रामचंद्रांच्या मालकी हक्काची आहे का? त्यावर मंदिर होते का? मशीद बाबराने बांधली का? ती मंदिर पाडून बांधली गेली का? त्यामध्ये राम जन्म स्थान म्हणून अनादी काळापासून हिंदूंकडून पूजा होत होती का? आणि जन्मस्थान असल्याचा विश्वास आणि श्रद्धा आहे का? अधिक श्रेयस्कर ताबा मालकी हक्क ठरविण्यासाठी ह्या सर्व वाद बिंदूंचा उपयोग होणार होता. निकालातील हे जोडपत्र केवळ ह्या वादबिंदूवर भाष्य करते. की हे स्थान जन्मस्थान आहे की नाही.

रामलल्ला विराजमान ह्या वादीच्या अर्थात हिंदूंच्या बाजूने प्रभू श्रीरामांचे अयोध्येतील विवादास्पद जागा हे जन्मस्थान असून त्यावर राजा विक्रमादित्यने बाराव्या शतकात बांधलेले प्रसिद्ध मंदिर होते. मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार १५२८ साली बाबराच्या आदेशाने मीर बाकी ह्या त्याच्या सेनापतीने कोणतेही मंदिर ध्वस्त न करता मशीद बांधली.

वरील सर्व वादाचे मुद्दे हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने इतर तोंडी व लेखी पुराव्यान्व्यातिरिक्त सर्व धर्माचे धार्मिक ग्रंथ, प्रवास वर्णने, गॅझेटीयर्स, कविता आणि साहित्य ह्याचे पुरावे दाखल करून घेतले तसेच ते मान्यही केले. निकालात असलेले महत्त्वाचे पुरावे काय आहेत हे जाणून घेऊया.

रामलल्ला विराजमानतर्फे श्री. के. परासरण ह्या वकिलांनी बाजू मांडताना आठव्या शतकात लिहिलेले स्कंद पुराण, वैश्नवखंड, रुद्रयमाला, अयोध्या महात्म्यवर आपली भिस्त ठेवली. ख्रिस्तपूर्व लिहिलेल्या वाल्मीकी रामायणातही अयोध्या हे जन्मस्थळ असल्याचे म्हटले आहे. तुलसीदासाने लिहिलेले ‘रामचरित मानस’ मध्येही तेच म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की भारतीय पुरावा कायद्याप्रमाणे जेव्हा एखाद्याचे मत ग्राह्य असते तेव्हा ते ज्यावर आधारित आहे असे आधारही ग्राह्य मानावे लागतात. त्यामुळे अनेक साक्षीदारांनी दिलेले तोंडी पुरावे मान्य करताना धार्मिक ग्रंथ, चरित्रे ह्यांचे पुरावे ग्राह्य धरावे लागतात. राजपत्रे (गॅझेटीयर्स) ही पुरावा म्हणून ह्याआधीच अनेक खटल्यामध्ये मान्य केलेली कागदपत्रे आहेत. एखाद्या तथ्याची संभाव्यता जर सामान्य माणसालाही सहज वाटली तर ते सिद्ध झाले आहे असे म्हणता येते. त्याप्रमाणेच स्कंद पुराणातील अयोध्या माहात्म्यातील श्लोक हे जन्म स्थानाची भौगोलिक स्थिती दर्शवितात ज्याची आजही कसोटी बघता येते.

येथे न्यायमूर्ती एआयआर १९५४ एससी २८२ ह्या वादामध्ये न्यायाधीशांनी केलेले निरिक्षण नोंदवतात. जस्टीस बी. के मुखर्जी ह्यांनी ह्या निर्णयात म्हटले की, ‘धर्म ही नक्कीच विश्वास आणि आस्थेची गोष्ट आहे, केवळ ईश्वरवादी नाही. धर्म म्हणजे शिकवण तत्त्वप्रणाली आणि विश्वास. धर्म फक्त नैतिक नियम सांगतो असे नाही तर तो विधी, उत्सव आणि पूजापाठाच्या पद्धतीही सांगतो जो धर्माचा अविभाज्य भाग असतो. अशा पालन करण्याच्या गोष्टी ह्या अगदी खाणंपिणं आणि पेहेरावापर्यंतही असू शकतात.’

ह्या निरीक्षणावर अवलंबून राहून न्यायाधीशांनी धार्मिक शास्त्रवचने ही हिंदू धर्माचा प्रमुख आधार आहे असे म्हटले आहे. वाल्मीकी रामायण हे प्रभू रामासंदर्भातील प्रमुख स्त्रोत आहे हे म्हटले. वादींनी सुवीरा जयस्वाल ह्या इतिहासकाराच्या तपासलेल्या साक्षीप्रमाणे वाल्मीकी रामायणाचा काल हा ख्रिस्तपूर्व ३०० ते ख्रिस्तपूर्व २०० हा आहे.

वाल्मीकी रामायणातील बालकांड अध्यायातील १८ व्या भागाप्रमाणे अयोध्येत कौसल्येने दिव्य अशा बालकास जन्म दिला.
ब्रिहद्-धर्मोत्तर पुराणातील खालील श्लोकाप्रमध्ये अयोध्या हे सातपैकी एक पवित्र स्थळ असल्याचे म्हटले आहे.

अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिका ।
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः॥

बृहद् धर्मोत्तर पुराण

स्कंद पुराणातील अयोध्या महात्म्यामधील १८ ते २५ श्लोक हे जन्माचे भौगोलिक स्थान दर्शविण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

तस्मात् स्थानत ऐशाने राम जन्म प्रवर्तते |
जन्मस्थानमिदं प्रोक्तं मोक्षादिफलसाधनम ||१८||
विघ्नेश्वरात पूर्व भागे वासिष्ठादुत्तरे तथा |
लौमशात् पश्चिमे भागे जन्मस्थानं तत: स्मृतम ||१९||

स्कंद पुराण, अयोध्या महात्म्य

या स्थानाच्या उत्तर-पूर्व दिशेला रामाचे जन्मस्थान आहे. हे पवित्र स्थान मोक्षप्राप्तीचे स्थान आहे. असे म्हटले जाते की हे जन्मस्थान विघ्नेश्वराच्या पूर्व, वशिष्टच्या उत्तर व लौमासाच्या पश्चिमेला आहे. पुढील श्लोकांमध्ये ह्या स्थानाचे दर्शन घेतल्यावर जन्मांचा फेरा टाळता येतो. त्यापासून मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो असे म्हटले आहे. १८ आणि १९वे श्लोक असे स्थान दर्शवितात. त्याबरोबरच हे स्थान हे हिंदूंसाठी जन्मस्थान म्हणून अत्यंत पवित्र आणि तीर्थयात्रेचे स्थान होते हेसुद्धा सिद्ध होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टीस अगरवाल यांनीही आपल्या २०१० च्या निकालपत्रात स्कंद पुराणाचा पुरावा ग्राह्य धरला आहे. अतिशय स्पष्टपणे त्यांनी वादग्रस्त जागा हीच जन्मस्थान असल्याचे म्हटले आहे. महंत राम विलास दास वेदांती यांनी आपल्या साक्षीत स्कंद पुराणातील दाखला दिला.

अयोध्येची राम नवमीची यात्रा चैत्रातल्या तिसऱ्या नवरात्रीपासून सुरु होते. रामजन्मभूमी पूर्वोत्तर कोपऱ्यात आहे. पश्चिमेला गणेशाची पूजा होते. जन्मभूमी वशिष्ठ कुंडाच्या उत्तरेला आहे तर वशिष्ठ कुंड विग्नेश्वरीच्या पूर्वेला आहे.

स्कंद पुराणातील वैष्णव खंड

अयोध्या हे रामाचे जन्मस्थान असल्याचे वेद, उपनिषदे, स्मृति ह्याद्वारेही सिद्ध आहे. अनेक महंत, आचार्य ह्यांनी आपल्या प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर केलेल्या वर्णनाच्या तोंडी पुराव्याच्या आधारे आणि ग्रंथांवर अवलंबून राहून हे स्पष्ट होत असल्याबाबत आणि प्रतींच्या सत्यतेबाबत न्यायालयात साक्ष दिली. ‘ स्वामी अविमुक्तस्वरानंद सरस्वती यांनी स्कंद पुराणात दिलेल्या पद्धतीप्रमाणे जन्मभूमीचं दर्शन घेतल्याचे, वादग्रस्त जमिनीवर पिंडारक, लोमश, राम जन्म भूमी, विघ्नेश, वाशिष्ठकुंड आणि विघ्नेश्वरा अशासारखी जी बारा स्थाने आहेत त्यापैकी काहींवर काही दगडी बोर्ड्स बघितले असल्याचे आणि त्याप्रमाणे जन्म भूमीचे भौगोलिक स्थान निश्चित होते असे सांगितले.

पी. व्ही. काणे ह्या इतिहासकारांनी आपले मत नोंदवले की, स्कंद पुरण हे सातव्या शतकाच्या पूर्वी आणि नवव्या शतकानंतर लिहिले गेलेले नाही. अर्थात १७-१८व्या शतकातले काव्य असण्याची शक्यता नाही. न्यायालयाने कालावधी निश्चित करण्यासाठी इतरही ग्रंथांचा तसेच इतिहासकारांच्या साक्षी नोंदवून घेतल्या आणि त्याप्रमाणे स्थान निश्चित केले.

हजारो तोंडी आणि लेखी पुराव्यांपैकी अजून एक महत्त्वाचा पुरावा गुरु नानक देवजी यांचा होता. न्यायालयात अनेक शीख साक्षीदारांनी आपल्या साक्षी नोंदवल्या आहेत. तसेच शीख संप्रदायाचा इतिहास सांगणारे अनेक ग्रंथ पुरावा म्हणून सादर केले आहेत. जन्म साखी अर्थात गुरु नानक देवजी यांची काही चरित्रे उपलब्ध आहेत ती त्यांनी न्यायालयात सादर केली आहेत. त्यापैकी पुरातन जनम साखी, पोथी जनम साखी, सचखंड पोथी – जनमसाखी श्री गुरु नानक देवजी यासारखे ज्यांची यादीच अर्ध पान होईल अनेक शीख धर्मग्रंथ आणि चरित्रे हे सर्व न्यायालयाने ग्राह्य धरले.

गुरु नानक देवजींनी इ.स. १५१० ते १५११ मध्ये अयोध्या येथील राम जन्म भूमी मंदिराला भेट देऊन रामाचं दर्शन घेतलं होतं.

जन्म साखी व गुरु नानक देवांची इतर चरित्र

न्यायाधीशांनी धर्मग्रंथातील हा पुरावा मान्य करून असं म्हटलं की जरी नेमकं स्थान ग्रंथ सांगू शकत नसतील तरी १५१०-११ साली तेथे पवित्र मंदिर होतं, जन्मस्थान म्हणून आस्था होती, भाविक यात्रा करत असत, नियमित दर्शन घेत असत हे सिद्ध होतं. त्यावरील हिंदूंचा विश्वास आणि श्रद्धाही सिद्ध होते. न्यायालयाने पुढील काही निष्कर्ष काढले नसतील तरी हे म्हणायला वाव आहे की अकराव्या शतकात राजा विक्रमादित्यने बांधलेलं मंदिर १५११ पर्यंत इतक्या सुस्थितीत होतं की तिथे भाविक दुरून दर्शनाला येत असत. मंदिर पाडून मशीद उभारली असा पुरावा नाही असं म्हणताना १५२८ ला मंदिर पाडेपर्यंत मंदिर काल ओघात नष्ट किमान १५११ पर्यंत तरी झाले नाही. आणि पुढच्या १७ वर्षातच ते काळाच्या ओघात पूर्णतः नामशेष होईल अशी शक्यताही नाही.

तुलसीदास रचित श्री रामचरितमानस इ.स. १५७४-७५ हा ग्रंथ ज्यामध्ये अयोध्या हीच जन्मभूमी असल्याचे म्हटले तो पुरावा म्हणून मानला गेला.

राजपत्रे (गॅझेटीयर्स) आणि प्रवास वर्णने ही पुरावा म्हणून किती विश्वासार्ह मानायची ह्यावर वाद झाला. ह्यासाठी भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ५७ प्रमाणे इतिहास, साहित्य, विज्ञान, कला ह्या सर्व बाबींची दखल न्यायालय घेऊ शकतं. सुखदेव सिंघ वि. महाराजा बहादूर ऑफ गीद्धौर एआयआर १९५१ एससी २८८ ह्या तसेच इतरही अनेक निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे राजपत्रे ही अनुभवी अधिकाऱ्यांनी अधिकृत नोंदींच्या आधारे तयार केलेली असल्यामुळे तो औपचारिक आणि तितकाच महत्त्वाचा पुरावा आहे आणि पुरावा म्हणून ग्राह्य आहे. कलम ८१ प्रमाणेही सर्व राजपत्रे सत्य मानणे न्यायालयाला अनिवार्य आहे.

ह्याप्रमाणे ए इन इ अकबरी हे अबुल फझल अलामी ह्यांनी लिहिलेला ग्रंथ ज्याचा तिसरा खंड जदुनाथ शंकर ह्यांनी भाषांतरित केलेला आहे. हा भाग हिंदू धर्म, तत्त्वज्ञान आणि विज्ञानाचा ज्ञानकोश आहे. तसेच दुसरा भाग अकबराच्या कालावधीतल्या मुघल साम्राज्याची राजपत्रे आहेत.

तीर्थस्थळ अयोध्या, रामचंद्र अवतार, अयोध्येतील रामाचा जन्म, हिंदूंच्या अयोध्ये बद्दलच्या पवित्र आस्थेबद्दल लेखन आहे.

ए इन इ अकबरी, भाग १ व २

१६०७ ते १६११ दरम्यान भारतात येऊन गेलेला प्रवासी विल्यम फ्लीन्च ह्याने ‘Early Travels in India’ हे प्रवासवर्णन लिहिले. तो रामचंद्रांच्या महल आणि किल्ल्याच्या अवशेषांचा उल्लेख आहे. फादर जोसेफ टीफेन्थहालर ह्या प्रवाश्याने १७६६ – १७७१ मध्ये भारताला भेट दिल्यानंतर लिहिलेल्या वर्णनात म्हटले की –

सीता रसोई हे ही टेकडीवरील जागा प्रसिद्ध आहे मात्र औरंगजेबाने रामकोट किल्ला उध्वस्त करून तिथे तीन घुमटांचं मुस्लीम प्रार्थनास्थळ बांधलं. काही म्हणतात की ते बाबराने बांधलं. मी तिथे अनेक कोरीव काम केलेले खांब बघितले तसेच ते वानरांचा राजा हनुमानाने आणल्याचे म्हटले आहे. त्या ठिकाणी एक पाळणा पण बघितला. हिंदूंचा असा विश्वास आहे की भगवान विष्णूने तेथे रामाचा अवतार म्हणून जन्म घेतला. औरंगजेब वा बाबराने ती जागा उध्वस्त केली तरीही जिथे प्रभू राम राहिले त्या जागेवर हिंदू तीन वेळा जातात आणि पालथे होतात. (नमस्कार घालतात)

फादर जोसेफ टीफेन्थहालर

ईस्ट इंडिया कंपनीच्या १८२८, १८३८ सालच्या राजपत्रात राम, लक्ष्मण, सीता मंदिरे, इतिहास ह्याचे उल्लेख आहेत. १८५८ सालच्या राजपत्रात अयोध्येचं मोठं वर्णन आहे. १८५६ साली मिर्झा जान ह्यांनी हदीथ ए सेहबा नावाच्या पुस्तकात राम जन्म भूमी जी सीता की रसोईला लागून आहे तिची पूजा होते असे म्हटले आहे. जिथे भव्य मंदिर होते त्यावर बाबराने मशीद बांधली असे म्हटले आहे.

१८५८ ते १९४९
ह्या दरम्यानचे अनेक राजपत्रे, ए. एस. आय. अहवाल, पुस्तके, ग्रंथ, इतर कागदोपत्री पुरावे आणि तोंडी पुरावे न्यायालयात दाखल आहेत. १ नोव्हेंबर १८५८ नंतर ब्रिटीश सरकारने काढलेल्या अनेक आदेशांमध्ये, पत्र व्यवहारांमध्ये आणि अधिकृत अहवालांमध्ये मशिदीचा उल्लेख जन्म स्थान मशीद असाच झाला आहे. पी. कार्नेगी जे अयोध्या आणि फैझाबादचे कमिशनर होते त्यांनी अयोध्या हिंदूंना मक्कासारखी आहे असे मत त्यांच्या लिखाणात नोंदवले आहे. रामाच्या जन्मस्थानावर मशीद उभारली होती, त्यासाठी मोठा संघर्ष झाला होता असे म्हटले. ते पुढे नोंद करतात की जोपर्यंत ब्रिटिशांनी रेलिंग घालून भाग पाडले नाहीत तोपर्यंत हिंदू आणि मुस्लीम मशीद मंदिरात पूजा करत असत. १८७७ च्या राजपत्रातही ह्याची पुनरावृत्ती लिहिली गेली आहे. १८८९ च्या ए.एस.आय. चा अहवाल नोंद करतो की –

रामाचं जुनं मंदिर अतिशय सुंदर असणार कारण त्यातील बरेचसे खांब मशिदीसाठी वापरले गेले आहेत. मंदिराच्या जागीच मशीद बांधली गेल्याचे म्हणणे बळकट करतो.

१८८९ ए.एस.आय. चा अहवाल

१९२१ चे बाराबंकी राजपत्र, पूर्वीचे मंदिर, त्यावर मशीद, हिंदूंसाठी हे स्थळ पवित्र असल्याचे आणि त्यामुळे आता संघर्षजन्य असल्याचे नमूद करतो.

३०.११.१८५८ मध्ये मुस्लिमांनी केलेल्या तक्रार अर्जावरून हे सिद्ध होते की मशिदीच्या आतमध्ये हिंदूंनी एक चबुतरा बांधला आहे, तेथे होम आणि पूजा चालू आहे तसेच पूर्ण मशीदीवर ‘राम राम’ असे लिहिले आहे. चबुतरा हटविण्यासाठी हा अर्ज आहे. असाच माशिदिताला चबुतरा काढून टाकावा यासाठीचा अर्ज मोहम्मद असघर ह्यांनी १२.२.१८६१ रोजी केला आहे. इतरही अनेक तक्रारींवरून हे सिद्ध होतं की सदर जागेवर हिंदू निरंतर आणि अखंड पूजा करत असत. त्यानंतर महंत रघुवर दास ह्यांनी मशीद परिसरातील चबुतऱ्यावर मंदिर बांधायची परवानगी कमिशनरकडे मागितलेली दिसते. १८६६ साली परिसरात मूर्ती ठेवल्याची मुसलमानांची तक्रार आहे. पुढे डेप्युटी कमिशनरांनी १८७७ साली खेम दास महंत ह्यांना जन्मस्थान दर्शनासाठी स्वतंत्र रस्ता मिळण्यासाठी उत्तरेकडील भिंतीचे दरवाजे उघडण्याचा आदेश केल्याचे दिसते. त्यावर सईद महम्मद असघर ह्यांनी अपील केल्याचे दिसते. सदर अपिलात परिसरात एक छोटा ‘चुल्हा’ असल्याचे नमूद आहे. १९३४ साली झालेल्या हिंदू मुस्लीम दंग्यांमध्ये मशिदीचे नुकसान झालेले दिसते.

अयोध्येतील ७ जागांचे भाविक दर्शन घेताना मी कायम पाहत आलो आहे. त्या तसेच रामजन्मभूमी ह्या जागांचे स्थान दुसरीकडे बदलू शकत नाही.

महंत परमहंस रामचंद्रदास

इतर अनेक महंत, आचार्य, प्रवासी, भाविक ह्यांच्या न्यायालयातील तोंडी साक्षी ह्या जन्मस्थानावर भाविकांच्या भेटी, दर्शन, पूजा, परिक्रमा, परिक्रमा मार्ग, परिसराची निरीक्षणे नोंदवितात आणि स्मृतीपलीकडच्या काळापासून ही जागा राम जन्मभूमी आहे, तसेच मध्य घुमटाच्या खालचे क्षेत्र तीर्थक्षेत्र आहे आणि तिथे पूजा केली जाते हे सांगतात. महंत भास्कर दास हे आपल्या साक्षीत तेथे १९४६ ते १९४९ पर्यंत म्हणजे जागा अधिग्रहित होईपर्यंतही तेथे एकही मुस्लिमाने नमाज अदा केला नाही उलट हिंदू फळे, फुले, पैसे वाहत असत असे म्हटले. अनेक साक्षीदारांनी मशिदीला जन्मस्थान म्हणत असल्याचेही न्यायालयात सांगितले. ह्याचा अर्थ १८५७ पर्यंत ब्रिटिशांनी लोखंडी जाळीची भिंत बांधून देईपर्यंत हिंदू सदर स्थानावर पूजा करत होते. त्यानंतर मात्र राम चबुतऱ्यावर जन्म भूमी म्हणून प्रतीकात्मक पूजा सुरु झाली. हिंदूंचा हा संपूर्ण संघर्ष, विरोध, चिकाटी, सातत्य आणि कृती ह्या त्यांच्या आस्थेची, श्रद्धेची आणि विश्वासाची ग्वाही देतात.

मशीद बांधण्यापूर्वी आणि नंतरही हिंदूंचा असा विश्वास आणि श्रद्धा होती की प्रभू रामाचे जन्मस्थान हे ज्यावर बाबरी मशीद उभारली आहे तेच आहे, आणि हा विश्वास आणि श्रद्धा ही लेखी आणि तोंडी पुराव्याच्या आधारे सिद्ध झाली आहे.

न्यायालयाचा निष्कर्ष

ह्या न्यायालयीन लढाईत इतरही ए. एस. आय. च्या उत्खननाच्या अहवालासारखे अत्यंत महत्त्वाचे पुरावे, दावे, प्रतिदावे आणि वाद्बिंदू आहेत. परंतु तो ह्या लेखाचा विषय नाही. वाद्बिंदूच्या ह्या निष्कर्षामुळे हिंदूंचा ‘अधिक श्रेयस्कर मालकी हक्क’ (better possessory title) सिद्ध होत आहे. हिंदूंचा पूजेसाठी आणि यात्रेसाठी हिंदूंचा सिद्ध झालेला आणि मुस्लिमांनी सिद्ध न केलेला अखंडित ताबा (unimpeded possession) हा निकालातील कलाटणी देणारा मुद्दा ठरला. त्यामुळे ६ डिसेंबर १९९२ ची घटना वगळताही न्यायालयीन लढाईद्वारे हिंदूंचा हा मालकी हक्क मान्य झाला असता, केला गेला असता.

हे सर्व विस्तृतपणे लिहिण्याचा उद्देश म्हणजे निकालामध्ये मान्य केलेल्या पुराव्यांचे महत्त्व लक्षात यावे आणि त्यानिमित्ताने इतिहासातून कोणकोणते धडे घ्यायचे हेसुद्धा लक्षात यावे हा होता. हिंदू ही जीवनपद्धती असे आत्तापर्यंत न्यायमूर्तींसह अनेक जणांनी म्हटले आहे. ह्या लेखाच्या सुरुवातीसच न्यायमूर्ती बी. के मुखर्जी हे धर्म अनेक खाण्यापिण्याच्या आणि पेहेरावासहित अनेक बाबी नोंदवत असतो असं म्हणतात हे लिहिलंय. भारतीय समाजाचा सांस्कृतिक पट हा अनेक प्रथा, परंपरा, दंतकथा, आरत्या, पुराणे, श्लोक, गीते, पोथ्या, धर्मग्रंथ, भाषा, तसेच गायन, नृत्य, चित्र, शिल्प, लोककला आदि कला, प्रथा परंपरा, उत्सव, सण-समारंभ ह्यांनी विणलेला आहे. इतकेच नाही तर रोजच्या जगण्यातील अनेक प्रथा, विधी ह्यामध्येही त्याचे धागे सापडतात. हजारो वर्षे जाऊनही त्यातल्या बदलत्या रुपात का असेना त्यातलं तत्त्व अजून मूळ धरून आहे. त्यातल्या बदलांची संगती वेळ आली तर लावता येते. आणि त्याचा ‘मूळ’ शोधण्यासाठी परस्परसंबंध जोडता येतो.

जागेच्या मालकी हक्कासाठी त्यांचा हा उपयोग ह्या निकालामध्ये झाला मात्र भविष्यात कितीतरी गोष्टींसाठी त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. आस्था, विश्वास आणि श्रद्धा ह्या अंध नाहीत तर त्यांना ठोस असा प्राचीन आधार आहे, तो बुद्धीस अनुभवजन्य आहे. हा आधार राम जन्म भूमी निकालामध्ये तर्क आणि बुद्धीने ग्राह्य धरला गेला, सिद्ध झाला हे ह्या निकालाचं उदाहरण (precedent)! ही सर्वांनीच लक्षात ठेवण्यासारखी आणि ह्यापुढे वापरता येण्यासारखी गोष्ट.

हा निकाल ह्या सर्व प्रथा, परंपरांचं पालन, धार्मिक ग्रंथांचं, प्रवास वर्णनांचं जतन, पोथ्या पुराणांचं पठण, सण समारंभ, उत्सवांचं साजरीकरण, कर्मकांडे आणि त्यांची उपयोगिता, अखंडित तीर्थयात्रा, वहिवाट (unimpeded use) अशा अनेक गोष्टींचं महत्त्व लक्षात आणून देतो.

माणसाच्या आयुष्याचं ध्येय हे ‘अंतिम सत्य’ जाणून घेण्याचं असतं. ते जाणून घेण्याचा जो मार्ग प्रभू रामचंद्रांच्या श्रद्धेतून जातो. तीच श्रद्धा ‘किती सत्य’ हे जाणून घेण्याचा मार्ग ह्या निकालाने उदाहरण (precedent) म्हणून घालून दिला आहे.

विभावरी बिडवे
९८२२६७१११०

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s