कोणे एके काळी, रामनामाने शिळांना समुद्रात तारले होते. आज काही शिळांनी रामाच्या लढ्याला तारले. त्या शिळांची, दगडांची, शिलालेखांची, दगडी पन्हाळ्याची, कातळाच्या स्तंभांची, पाषाणाच्या मूर्तींची कथा…
पण ही कथा सुरु होते ग्रीस मध्ये. १८७० च्या दशकात.
ग्रीक कवी होमरचे अजरामर महाकाव्य आहे इलियाड. या कथेच्या सुरुवातीला ट्रोयचा राजपुत्र पॅरीस हा मेनेलीयसची पत्नी हेलेनचे अपहरण करतो. त्यावर ग्रीक राजा मेनेलीयस ट्रोयवर हल्ला करतो. हे युद्ध १० वर्ष चालते. शेवटी एका बनावट घोड्यात सैन्य लपवून पाठवले जाते व ट्रोयचा पडाव होतो. होमरची कथा ‘काल्पनिक’ आहे असे इतिहासकारांचे मत होते. मात्र ग्रीक लोकांत अशी मान्यता होती की, होमरने एक प्राचीन ऐतिहासिक घटना, जी मौखिक परंपरांनी जपली होती ती लिहून काढली. १८७० मध्ये हेन्री श्लीमन (Henry Schliemann) यांनी होमरने वर्णन केलेली ट्रोय कुठे असेल याचा शोध घेतला. तुर्कीस्तानच्या पश्चिमेला त्या नगरीचे अवशेष त्यांना सापडले. एका खाली एक असे इस पूर्व ३००० पर्यंत जाणारे ९ थर मिळाले. या उत्खननाच्या नंतर होमरने वर्णन केलेले युद्ध कदाचित इस पूर्व १३०० च्या आसपासचे घडले असावे असे आता मानले जाते.
ट्रोयच्या यशा पाठोपाठ बायबल मध्ये वर्णन केलेल्या गावांचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. या उत्खननातून इजिप्त, जोर्डन, इस्राईल, इराक, तुर्कस्तान आदि भागात उत्खनन केले गेले. या मधून अनेक प्राचीन गावे, राजे, साम्राज्ये समोर आली. या मधून बायबल मधील काही कथांना दुजोरा मिळाला, तर काही खोडल्या गेल्या.
अशा प्रकारे २० व्या शतकाच्या आधी, प्राचीन साहित्यावर आधारित असे उत्खनन युरोपीयन लोकांनी केले होते. त्या मधून साहित्याला पूरक असे काही पुरावे मिळाले होते. इसपुर्व ७ व्या / ८ व्या शतकातील होमरने, मौखिक परंपरेने जपलेली कथा लिहिली. पण जेंव्हा उत्खनन करून त्या कथेत वर्णन केलेले नगर मिळाले, तेंव्हा त्या साहित्याला आणि त्या आधीच्या मौखिक परंपरेला आधार मिळाला. या उत्खाननांमुळे युरोपियन लोकांचा प्रवास “प्राचीन साहित्य एक मिथक असते” इथपासून “प्राचीन साहित्यात थोडेफार तथ्य असू शकते” इथ पर्यंत झाला.
इंग्रजांचा हा प्रवास होईतो २० व्या शतकाच्या मध्यावर भारत स्वतंत्र झाला. मात्र या वेळेपर्यंत इंग्रजांनी रामायण, महाभारत व पुराणे ही केवळ ‘मिथक’ आहेत, ‘कथा’ आहेत, ‘कल्पनाविलास’ आहे असा शिक्कामोर्तब केला होता. स्वतंत्र्य मिळालेल्या नवयुवा भारताला अनेक प्रश्न भेडसावत होते. त्यात एक प्रश्न होता स्वत:च्या मुळांचा. स्वत:च्या इतिहासाचा. स्वत:च्या identity चा. रामायण – महाभारत घडले होते का? अयोध्या खरेच रामाची जन्मभूमी होती का? वाल्मिकी रामायण आणि व्यासकृत महाभारत महाकाव्ये आहेत की इतिहास? राम – कृष्ण खरे होते की निव्वळ कविकल्पना?
या प्रश्नांची उत्तरे साहित्यात मिळतात. स्वत: व्यास महाभारतात सांगतात की, “मी इतिहास लिहित आहे”. तसेच महाभारतात मागे होऊन गेलेला मोठा राजा म्हणून रामाची गोष्ट येते. म्हणजे रामाची कथा सुद्धा इतिहास म्हणून येते. किंवा ११ व्या शतकातील स्कंद पुराणातील अयोध्या महात्म्य या अध्यायात अयोध्या, शरयू, रामजन्मभूमी या बद्दल सविस्तर माहिती आली आहे. हे ग्रंथ इतिहास आणि भूगोल सांगत आहेत हे ते स्वत: सांगतात.
भारतीय ग्रंथांशिवाय, अयोध्येत आलेल्या परदेशी प्रवाश्यांनी लिहून ठेवलेली काही प्रवासवर्णने आहेत. रामजन्मभूमीच्या बाबतीत उपलब्ध असलेली प्रवासवर्णनात – १६३१ मध्ये Joannes De Laet हा डच प्रवासी काही काळ अयोध्येत राहिला होता. त्याने शरयू नदीत स्नान करून रामाचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांबद्दल तपशीलवार लिहिले आहे. १६३४ मध्ये आलेल्या Thomas Herbert ने रामनवमीला रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या गर्दी बद्दल लिहिले आहे. १६६७ मध्ये आलेल्या Joseph Tieffenthaler याने राम मंदिरात जाणाऱ्या शेकडो लोकांबद्दल लिहिले आहे.
… परंतु, साहित्याला जो पर्यंत पुरातत्त्व शास्त्राची जोड मिळत नाही, तोपर्यंत सगळा खेळ हा “बोलाची कढी आणि बोलाचा भात” असा मनाला जातो. १९५५ मध्ये ASI ने रामायण व महाभारताशी संबंधित काही प्रकल्प हाती घेतले. श्री. बी. बी. लाल यांनी महाभारतात वर्णन केलेल्या नगरींचे उत्खनन केले. हस्तिनापुर, इंद्रपत, सोनपत, पानिपत, तिलपत, बघपत, आदी अनेक ठिकाणी उत्खनन केले गेले. या उत्खानातून इस पूर्व १३०० मधील मानवी संस्कृतीच्या खुणा मिळाल्या. राखाडी रंगाच्या खापरांवर काळ्या रंगाने रंगवलेली भांडी, (PGW Painted Grey Ware) तसेच लोहापासून तयार केलेल्या अनेक वस्तू मिळाल्या. जसे बाणांचे अग्र, भाल्यांचे अग्र आदि. हाडांपासून तयार केलेले द्यूतात वापरले जाणारे फासे सुद्धा मिळाले. १९६० मध्ये ASI च्या डॉ. एस. आर. राव यांनी समुद्रात बुडलेली द्वारका नगरी शोधली. या ठिकाणी केलेल्या उत्खननातून त्या नगरीचे प्राचीन अवशेष मिळाले. महाभारतात वर्णन केल्याप्रमाणे, द्वारका नगरी समुद्रात बुडाली होती हे या शोधातून पुढे आले. व महाभारत ही कविकल्पना नसून त्यामध्ये थोडेफार तरी तथ्य आहे हे मान्य केले गेले.
१९७५ मध्ये श्री. बी. बी. लाल यांनी रामायणाशी संलग्न असलेल्या गावांचे उत्खनन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. या वेळी – अयोध्या, नंदीग्राम, शृंगवेरपूर, भारद्वाज आश्रम व चित्रकुट या ठिकाणी उत्खनन करण्यात आले. अयोध्येत रामजन्मभूमी परिसरात उत्खनन केले गेले. राम वनवासात असतांना भरत नंदीग्राम येथे राहिला होता. तिथे उत्खनन केले. शृंगवेरपूर येथे रामाने वनवासात जातांना गंगा नदी ओलांडली होती. इथे निषादराज गुहाने त्यांना आपल्या होडीतून गंगापार नेले होते. इथून पुढे राम, लक्ष्मण व सीता भारद्वाज आश्रमात गेले होते. भारद्वाज मुनींनी त्यांना चित्रकुटची माहिती दिली व तिथे जाण्याचा रस्ता सांगितला होता. आणि नंतर राम, लक्ष्मण व सीता मंदाकिनी नदीच्या तीरावर असलेल्या चित्रकुट येथे गेले होते.

या सर्व ठिकाणी इस पूर्व २ ऱ्या सहस्रकातील मानवी संस्कृतीचे अवशेष मिळाले. विशेष उल्लेखनीय आहे शृंगवेरपूर येथे पाणी साठवण्यासाठी बांधलेला मोठा हौद. गंगा नदीच्या काठावर शृंगवेरपूर वसलेले आहे. गंगेच्या पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी येथे ११ मीटर रुंद व ५ मीटर खोल इतका मोठा कॅनाल मिळाला. या मधून वेगवेगळ्या बांधीव टाक्यांमध्ये गाळ साचू देत स्वच्छ पाणी एका मोठ्या हौदाकडे वळवले आहे. २० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेला हा हौद आहे.

बी बी लाल यांनी अयोध्ये मध्ये १४ ठिकाणी उत्खनन केले. जन्मभूमी जवळच असलेल्या हनुमान गढी येथे देखील उत्खनन केले गेले. बाबरी ढॉंचाच्या आतमधून देखील पाहणी केली गेली. या उत्खननाची माहिती पुढील प्रमाणे –
- मशिदीला लागून दक्षिणेला व पश्चिमेला उत्खनन केले गेले.
- या मध्ये अनेक थर मिळाले – सर्वात वरचा मध्य युगातला साधारण इस १५०० च्या आसपासचा. त्या खाली गुप्त कालीन थर. त्याच्या खाली कुशाण काळातील थर. त्याच्याही खाली शुंग काळातील थर. त्या खाली मौर्य काळातील थर. व त्या खाली NBPW (Northern Black Polished Ware) संस्कृतीचा थर.
- इस १५०० चा थर हा मंदिर तोडलेल्या काळातला आहे.
- इथे १४ स्तंभांच्या पायाचे अवशेष मिळाले आहेत. हे सर्व विटांनी बांधलेले होते.
- यावर मंदिराचे पाषाणाचे स्तंभ उभे केले गेले असावेत.

- कसौटी पाषाणाचे १२ स्तंभ बाबरी ढॉंचात वापरले होते. व २ स्तंभ जवळच असलेल्या एका मकबऱ्यात वापरले आहेत. या स्तंभांवर पूर्ण कलशाचे शिल्प कोरले आहे.
- पूर्णकलश (पाण्याचा कलश व त्यामधून बाहेर येणारी पाने) हे अष्टमंगलचिन्हांपैकी एक आहे. कोणत्याही पूजेसाठी कलशाची स्थापना केली जाते. पूर्वी कुणाचे स्वागत करतांना कलश दिला जात असे. राम जेंव्हा वनवासातून परत आला तेंव्हा त्याचे स्वागत कलश देऊन केले होते असा उल्लेख रामायणात आहे. असे पूर्णकलशाचे शिल्प असलेले स्तंभ ढॉंच्यात होते.

- दोन स्तंभांवर हातात त्रिशूल घेतलेल्या द्वारपालांचे शिल्प आहे. या स्तंभांमधील अंतर व उत्खननात मिळालेल्या स्तंभाच्या पायांमधील अंतर एकच आहे. पाषाणाच्या स्तंभाचा पाया उत्खननात मिळालेल्या स्तंभाच्या पायाच्या आकारापेक्षा थोडा लहान आहे. या वरून मंदिराचे स्तंभ या पायांवरच उभे होते हे कळते.
- या स्तंभांवरील नक्षीकाम ११ व्या शतकातील कलेशी मिळते जुळते आहे हे दिसते.
- हे सर्व स्तंभ उत्तर-दक्षिण व पूर्व-पश्चिम दिशेने काटेकोरपणे बांधले आहेत.
- या मंदिराचे मुख पूर्व दिशेला होते.
- ढॉंचाच्या मागे साधारण ४० फुट खोल असा चॅनेल आहे. हा शरयू नदीचा प्राचीन चॅनेल असावा.
१९७५ मध्ये सुरु केलेल्या पहिल्या उत्खननातून अगदी स्पष्टपणे प्राचीन राम मंदिराचे पुरावे समोर आले होते. या पुराव्यांवरून १९८० च्या दशकात रामजन्मभूमीचा प्रश्न सुटला असता. पण काही इतिहासकारांनी समोर असलेले धडधडीत पुरावे मान्य केले नाहीत. त्यातून हा प्रश्न चिघळला आणि त्याचा शेवट १९९२ मध्ये ढॉंचा पाडण्यात झाला.
त्या नंतर २००३ मध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाने ASI ला जन्मभूमी स्थानावर उत्खनन करायचे आदेश दिले. हे आदेश होते – उत्खननाच्या प्रत्येक दिवशी Babari Mashid Action Committee चा एक सदस्य आणि रामजन्मभूमी गटाचा एक सदस्य तिथे उपस्थित असायला हवा. रोज उत्खननात ज्या ज्या वस्तू मिळतील त्याची एन्ट्री एका रेजिस्टर मध्ये केली जावी. व त्यावर दोन्ही गटाच्या सदस्यांनी सही करावी. असे आदेश दिले होते.
अशा प्रकारे दुसरे उत्खनन मशिदीच्या खाली सुरु झाले. या वेळी ASI चे श्री. बी. आर. मणी यांनी उत्खनन केले. या वेळी मिळालेल्या वस्तू अशा –
- इस पूर्व दुसऱ्या सहस्रकापासून या ठिकाणी मानवी संस्कृतीचे अवशेष मिळाले.
- हे अवशेष घरांचे / रस्त्यांचे नसून प्रत्येक थरातील अवशेष हे एका पूजनीय स्थानाचे होते.
- गुप्तोत्तर काळात याच ठिकाणी एक गोलाकार मंदिर होते.
- अभिषेकाचे पाणी वाहून नेण्याकरता बांधलेली मकरप्रणाली येथे मिळाली. अशी वस्तू केवळ मंदिरातच असल्याने प्राचीन मंदिराचे अस्तित्व अधोरेखित झाले.
- १० व्या शतकात येथे एक मंदिर होते. मात्र ते मंदिर फार काळ टिकले नव्हते. कदाचित ते मंदिर तुर्कांनी पाडले असावे. (११ व्या शतकाच्या सुरुवातीला महंमद गझनीने सोमनाथ पाडले होते. तसेच मथुरेवर स्वारी करून तेथील मंदिरांवर हल्ला केला होता.)
- १२ व्या शतकात याच ठिकाणी पुन्हा एक भव्य मंदिर बांधले होते. (सोमनाथचे मंदिर सुद्धा वेळोवेळी पुनश्च बांधले गेले होते.)
- १२ व्या शतकातील मंदिराच्या ५० स्तंभांचा पाया मिळाला आहे.
- मंदिरांच्या शिखरावर असलेले ‘अमलक’ मिळाले आहेत. (नागर मंदिरांच्या शिखरावर अवळ्यासारखा दिसणारा चपटा गोल decorative दगड.)
- अनेक मातीच्या मूर्ती मिळाल्या आहेत. त्यामध्ये मानवी आकृती आहेत. प्राण्यांच्या आकृती आहेत. या मातीच्या मूर्ती – शुंग व गुप्त काळातील आहेत. मातीच्या मूर्तीची पूजा करणे व नंतर त्या मूर्तीचे विसर्जन करणे आजही हिंदू धर्मात पाहतोच.
- बाबरी मशिदीला पाया वेगळा खणला नव्हता. जुन्या मंदिराच्या भिंतींवर नवीन भिंती बांधल्या होत्या.
- सर्वात महत्वाचा असा एक शिलालेख मिळाला. ५ फुट रुंद व २ फुट उंच असा मोठा शिलालेख बाबरी मशीद पाडली त्या ढिगाऱ्यात मिळाला. बाबरी मशिदीच्या एका भिंतीत ती शीला वापरली गेली होती, जी भिंत पडल्यावर बाहेर आली. हा लेख ‘विष्णू-हरि लेख’ या नावाने ओळखला जातो. सुरुवातीला मार्क्सिस्ट इतिहासकारांनी “ही शीला नव्याने कोरून इथे ठेवली आहे” असा निराधार आरोप केला. नंतर पवित्रा बदलून “ती शीला लखनौ संग्रहालयातून चोरून आणून इथे ठेवली आहे” असा ही आरोप केला. मात्र लखनौ संग्रहालयाने त्यांच्या कडे असलेला त्रेता-के-ठाकूर येथील शिलालेख त्यांच्याकडेच असल्याचा निर्वाळा दिला. एकूण हा शिलेख अग्निदिव्यातून पार पडून शुद्ध असल्याचे सिद्ध झाले. हा लेख २० ओळींचा असून त्यावर लिहिले आहे –
- “नम: शिवाय” या मंत्राने शंकराला नमन करून लेखाची सुरुवात होते.
- गढवाल राजा गोविंदचंद्र याचा अंकित असलेल्या अनयचंद्र राजाने हे मंदिर बांधले आहे.
- विष्णू-हरिचे हे मंदिर आहे. ज्याने अप्रतिम-विक्रम केला त्या (रामा) चे हे मंदिर आहे. ज्याने दहा शीर असलेल्या राक्षसाला मारले त्याचे हे मंदिर आहे.
- या मंदिराला सोन्याचा कळस बांधला आहे.
- विष्णूच्या अवतारांची स्तुती व अनयचंद्राच्या आधीच्या राजांची प्रशस्ती व नंतरचा राजा आयुषचंद्र याची प्रशस्ती येते.

या सर्वातून निष्कर्ष असे निघतात की – बाबरी मशीद ही जुन्या मंदिरावर बांधली होती. आधीचे मंदिर, १२ व्या शतकात बांधले होते. ते मंदिर पूर्वाभिमुख होते. राम हा सूर्यवंशी देव असल्याने, त्याचे मंदिर सूर्य मंदिराप्रमाणे पूर्वमुखी असणे योग्यच आहे. कदाचित वर्षातील काही ठराविक दिवशी, उगवत्या सूर्याची किरणे गर्भगृहातील मूर्तीवर पडत असावित. हे मंदिर भव्य होते. त्याला उंच शिखर असून त्याला सोन्याचा कळस होता. मंदिराच्या बाजूने परिक्रमा मार्ग होता. शरयू नदीच्या काठावर हे मंदिर होते. येथे आलेले भाविक, शरयू मध्ये स्नान करून रामाच्या दर्शनाला जात असत. रामनवमी व कार्तिक पौर्णिमेला येथे मोठा उत्सव होत असे व भक्तांची गर्दी होत असे.
१२ व्या शतकातील मंदिर त्या आधीच्या १० व्या शतकातील मंदिराच्या स्थानावर उभे होते. आणि त्या आधी, या ठिकाणी, गुप्तोत्तर काळात एक गोलाकार मंदिर होते. इस पूर्व २ ऱ्या सहस्रकापासून या ठिकाणी एक धार्मिक स्थळ होते. उत्खननातील पुराव्यांवरून निश्चितपणे हे लक्षात येते की हिंदू भाविकांनी सातत्याने या ठिकाणी रामाची पूजा केली आहे.
पाश्चिमात्य इतिहास शास्त्र असे आहे की – मौखिक परंपरेने जपलेले काव्य शेकडो लोकांनी जसेच्या तसे म्हणून दाखवले तरी त्याला ‘ऐतिहासिक’ता मिळत नाही. पण तेच जर दोन – चारशे वर्षांपूर्वीच्या कुठल्या कागदावर लिहिलेले सापडले, तर तो कागद ‘ऐतिहासिक’ दस्तावेज होतो. आणि जर तेच काव्य एक – दोन हजार वर्षांपूर्वीच्या राजाने शिळेवर कोरून ठेवलेले मिळाले, तर तो त्या काव्याच्या प्राचीनतेचा सर्वाधिक विश्वसनीय पुरावा! म्हणूनच दगडात कोरलेली कथा, शिल्प किंवा मंदिर यांना इतिहास शास्त्रात अतिशय महत्वाचे स्थान आहे. दगडात लिहिलेला लेख खोडायचा जरी प्रयत्न केला, तरी खाडाखोड दिसते. दगडातून मूर्ती कोरतांना जर चूक झाली, तर ती लपवता येत नाही. यामुळेच एखादी गोष्ट किती पक्की आहे हे सांगतांना “काळ्या दगडावरची रेघ” असे म्हटले जाते. अशा दगडातील पुराव्यामुळेच रामाला त्याची जन्मभूमी परत मिळाली. कारण … दगड कधीच खोटे बोलत नाही …
संदर्भ –
- मीनाक्षी जैन, बी बी लाल व के के मुहम्मद यांनी दिलेल्या मुलाखती.