रूपा भाटी या National Institute of Technology, रायपुर येथून स्थापत्यविशारद झाल्या. त्या अमेरिकेतील Institute of Advanced Sciences, MA येथे प्राध्यापक आहेत. त्या संशोधक असून त्यांनी अनेक शोध निबंध लिहिले आहेत. त्यांच्या अभ्यासाचा विषय भारतीय साहित्यातील खगोलशास्त्रीय माहिती व त्यावरून त्यातील घटनांच्या काळाचा तर्क लावणे असा आहे. त्यांच्या लेखाचा हा अनुवाद …
वेद म्हणजे असंख्य, अगणित, अमित आणि अमुल्य माहितीचा खजिना आहे. ऋग्वेदातील ऋचांचा अर्थ शोधताना आपल्याला अजून कदाचित फक्त वरवरची माहिती कळली असेल. त्या मधून आपल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतीलच असे नाही, परंतु तरीही ऋग्वेद हे प्राचीन काळातील भौतिक माहितीचे सुद्धा उगमस्थान आहे यात शंका नाही. ऋग्वेदातील माहिती शुद्ध स्वरूपात जतन केली गेली आहे त्यामुळे तिला अधिकच महत्व प्राप्त होते. या लेखातून, ऋग्वेदात कोणती संभाव्य माहिती असू शकते याचा अंदाज येईल.
मी इथे विषय घेत आहे – श॒तहि॑माः अर्थात “शंभर वर्षांचा हिम किंवा शंभर वर्षांचे बर्फाळ वातावरण”. ऋग्वेदातील अशा प्रकारच्या माहितीला इतिहास किंवा विज्ञानाच्या अभ्यासात योग्य स्थान मिळणार नाही. पण मंत्रांमधून आपल्याला वैदिक लोकांनी थंड वातावरणाचा असामान्य (नेहेमीपेक्षा वेगळा) अनुभव घेतला होता याची साक्ष मिळते.
ऋग्वेदाच्या ६ व्या मंडळातील ७ ऋचांचे शेवटचे चरण “श॒तहि॑माः सु॒वीरा॑: ॥” असे आहे. ऋग्वेदाचे ६ वे मंडळ भारद्वाज कुळातील ऋषींचे आहे. आणि “श॒तहि॑माः” मंत्र अग्नी किंवा इंद्राला उद्देशून रचले आहेत.
मंत्र | देवता | ऋषी | छंद |
ऋग्वेद ६.४.८ | अग्निः | भरद्वाजो बार्हस्पत्यः | पङ्क्तिः |
ऋग्वेद ६.१०.७ | अग्निः | भरद्वाजो बार्हस्पत्यः | प्राजापत्याबृहती |
ऋग्वेद ६.१२.६ | अग्निः | भरद्वाजो बार्हस्पत्यः | निचृत्पङ्क्ति |
ऋग्वेद ६.१३.६ | अग्निः | भरद्वाजो बार्हस्पत्यः | निचृत्त्रिष्टुप् |
ऋग्वेद ६.१७.१५ | इन्द्र: | भरद्वाजो बार्हस्पत्यः | आर्च्युष्णिक् |
ऋग्वेद ६.२४.१० | इन्द्र: | भरद्वाजो बार्हस्पत्यः | विराट्त्रिष्टुप् |
“छन्दांसि छादनात्” अर्थात “मंत्रांच्या अर्थाला आच्छादतो तो छंद” असे म्हटले आहे. वैदिक छंदांमध्ये पङ्क्तिः छंद हा हैमंती अर्थात थंडीशी जोडलेला आहे (यजुर्वेद १३/५४-५८). “पङ्क्तिः स्वर: पंचमः” अर्थात पाचवा ऋतू पङ्क्तिः छंदाचा आहे असे म्हटले आहे. आपल्याला असेही दिसते की निचृत्पङ्क्ति हा सदोष पङ्क्तिः छंद देखील वापरला आहे. त्या अर्थी हिवाळ्याच्या शेवटी त्याचे पठण केले जात असावे. ऋतू प्रमाणे छंदांच्या गायनाची पद्धत काळाच्या ओघात कदाचित नष्ट झाले असेल. त्याच प्रमाणे त्रिष्टुभ छंद ग्रैष्मी मनाला आहे. हा छंद ग्रीष्म ऋतूसाठी किंवा उन्हाळ्याशी संबंधित आहे. आर्च्युष्णिक् छंद उष्णीसाठी म्हणजेच उष्णतेशी संबंधित आहे. आणि प्राजापत्याबृहती छंद प्रजापती आणि वर्षाशी संबंधित आहे.
आपल्याला माहितच आहे की ऋग्वेदात अग्नि आणि इंद्र वर्षाचे चक्र चालवणारे मुख्य प्रसारक आहेत. प्रत्येक मंडळात आधी अग्नीचे सुक्त येते त्यानंतर इंद्राचे सुक्त येते. तरीही इंद्राची – जवळपास २५० सुक्त व अग्नीची २०० सुक्त मिळतात. यावरून असे वाटते की वैदिक लोकांसाठी इंद्राची शक्ती अग्नीच्या शक्ती पेक्षा अधिक महत्वाची होती. थंडी मध्ये अग्नी आणि उन्हाळ्यानंतर पाऊस आणणारा इंद्र असे हे देव होत. त्या मध्ये पावसाचा देव कदाचित अधिक महत्वाचा होता का?
ऋग्वेदात अनेक देवता आहेत – आदित्य (सूर्य), सोम (चंद्र), अग्नी, इंद्र (पाऊस), वायू (पावसाचे वारे), वरुण (पाणी), पृथ्वी, सरस्वती (नदी), अरण्यानी (अरण्य) इत्यादी. पण या मध्ये ‘हिम’ देव मात्र नाही. का नसेल बरे?
यात काही शंका नाही की भारद्वाज कुळातील ऋषी अनेक वर्षांपासून हवामानातील संक्रमणाकडे लक्ष देत होते. “श॒तहि॑माः सु॒वीरा॑:” या वाक्यांमधून हे अगदी सहज समजते. लवकरच हिमवृष्टीची परिस्थिती बदलणार होती. तिचे रूपांतरण होणार होते – ऋग्वेदातील ६.६१ मध्ये वर्णन केलेल्या वृत्रासुरात. या वृत्रासुराने पाणी अडवून ठेवले होते. मग इंद्राने वृत्रासुराचा अंत करून पाण्याचे प्रवाह मोकळे केले. इंद्राच्या पराक्रमाने कदाचित पर्वताच्या गुहांमधून पाण्याचे प्रवाह वाहू लागले असतील. किंवा इंद्राने ढगांमध्ये साठलेल्या पाण्याची सुटका केली असेल.
शंभर वर्षाची बर्फाळ परिस्थिती मधून लवकरच इंद्र-वृत्र कथेचा जन्म होणार होता. ऋग्वेदाच्या ६.६१ सूक्तात वृत्र व इंद्राचे युद्ध सांगितले आहे. ऋग्वेदातील नंतरच्या अनेक इंद्र सूक्तात इंद्र-वृत्र उपाख्यान येते.
आता आपल्याला दिसते की वर्षाच्या सर्वात मोठ्या दिवसानंतर, पावसाला सुरुवात होते. तसेच एलजीएम काळापूर्वी पावसाचे प्रमाण आजच्या निम्मे होते. मानवी स्वभाव असा आहे की जे कमी असते त्या गोष्टींचे खूप अप्रूप वाटते. त्यामुळे या काळात – हिम मुबलक प्रमाणात होते आणि पाउस कमी प्रमाणात. म्हणून पाऊस, पर्जन्य, इंद्र यांची स्तुती केली गेली असावी. आणि त्याच कारणाने हिमाला देवत्व मिळाले नसावे. ऋग्वेदातला वर्णन केलेला हा वातावरणातील परिवर्तनाचा काळ late Pleistocene मध्ये जाऊ शकतो.
श्री. श्रीकांत तळेगीरी यांच्या संशोधनानुसार ६वे मंडळ सर्वात जुने आहे. माझ्या मते अगस्तींची जन्म कथा ही ऋग्वेदातील सर्वात जुनी आठवण असावी. पण ईथे ६वे मंडळ सर्वात जुने असे धरून चालू. तर ६व्या मंडळाचे आणखी एक वैशिष्ठ्य असे की त्यामध्ये सिंहाचा उल्लेख अजिबात नाही. दुसऱ्या एका अभ्यासातून कळते की सिंह हा प्राणी late Pleistocene काळात भारतभर होता, त्या आधी नाही. त्या वरून सुद्धा ६वे मंडळ १२०,००० वर्षांपूर्वी रचले गेले असावे असे म्हणू शकतो. त्या मधूनच ऋग्वेद रचनेच्या सुरवातीचा काळ इतक्या मागे जाऊ शकतो.