साधारणपणे सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या नीलमत पुराणाची सुरुवात राजा परिक्षिताचा मुलगा (पांडवांचा वंशज) जनमेजय आणि महर्षि व्यासांचे शिष्य ऋषी वैशंपायन यांच्या संवादाने होते. राजा जनमेजय वैशंपायन ऋषींना प्रश्न करतो. या प्रश्नोत्तरांचा प्रवाह काश्मीरच्या प्राचीन गोनंद वंश आणि काश्मीरच्या वर्णनापर्यंत येतो. हे वर्णन करताना वैशंपायन ऋषी म्हणतात –
पृथिव्यां यानि तीर्थानि तानि तत्र नराधिप I
ऋष्याश्रसुसंबाधं शीतातपसुखं शुभम II १७ II
अर्थात्, या पृथ्वीवर जेवढी तीर्थस्थाने आहेत ती सर्व येथे आहेत. ऋषींच्या आश्रमानी व्याप्त असणारी ही मंगलमय भूमी शीत आणि ग्रीष्म अशा दोन्ही ऋतुंमध्ये सुखद आहे.ब्रह्मघोषधनुर्घोषानित्योत्सवसमाकुलम I
केलिप्रायजनाकीर्णं नित्यहृष्टेजैनैर्वृतम II २१ II
( हा प्रदेश ) वैदिक मंत्रांचा उद् घोष आणि धनुष्याच्या टणत्काराने युक्त, नित्य उत्सव प्रिय, आणि क्रीडेत मग्न असणाऱ्या आणि सदा प्रसन्न असणाऱ्या जनांनी परिपूर्ण आहे.
नीलमत पुराणनीलमत पुराणातील प्राचीन काश्मीरचे हे वर्णन आपल्यासमोर धार्मिक आणि सुबत्तेचे चित्र उभे करते. या प्रदेशावर साधारणपणे सहाव्या शतकापर्यंत गोनंद वंशाचे राज्य होते. त्यानंतर मात्र कर्कोटक वंश गादीवर आला. कर्कोटक वंश हा नागवंश समजला जातो. ऋषी कश्यपांच्या नागवंशीय मुलांपैकी एका मुलाचे नाव कर्कोटक होते.
या कर्कोटक वंशाची परंपरा अतिशय प्रभावशाली आहे. या वंशाचा प्रथम राजा दुर्लभ वर्धनाने काश्मीरचे राज्य वाढवले. राज्यात संपन्नता आणि शांतता नांदू लागली. दुर्लभ वर्धनानंतर राजा प्रतापदित्याने हे राज्य जवळपास पन्नास वर्षे अतिशय समर्थपणे सांभाळले. या प्रतापदित्याला तीन मुलगे होते. वज्रदित्य, उदयादित्य आणि ललितादित्य!
आपल्या दोन्ही भावांच्या अकाली मृत्यूनंतर ललितादित्याचे राज्यारोहण झाले आणि काश्मीरच्या या दिग्विजयी सम्राटाची घोडदौड सुरू झाली! सम्राट ललितादित्याचा काळ आठव्या शतकातला आहे. या राजाच्या राज्यारोहणाच्या काही काळ आधी म्हणजे इ. स. ७१२ मध्ये महमद बिन कासिमने भारतात घुसखोरी केली होती. या आक्रमणाविरुद्ध काश्मीर सतत प्रतिकारास सिद्ध होते. राज्यारोहणाच्या काही काळ आधी झालेल्या क्रूर अरबी आक्रमणाचा खोल परिणाम ललितादित्याच्या मनावर झाला. आपले राज्य आणि पर्यायाने भारत भूमीवर परकीय आक्रमकांविरूद्ध खंबीरपणे उभे राहण्याची त्याची इर्षा जागृत झाली. इ. स. ७२५ मध्ये ललितादित्य मुक्तपीड काश्मीरचा राजा झाला आणि सुरू झाले काश्मीरच्या इतिहासातील एक गौरवशाली पर्व!
संदर्भ :-
* नीलमत पुराण
* राजतरांगिणी – कवी कल्हण
* Emperor of Kashmir – King Lalitaditya
– Sanjay Sonwani
* मराठी विश्वकोश
– विनिता हिरेमठ