इतिहास
प्राचीन शृंगेरी गावात, अत्यंत रमणीय अशा तुंग नदीच्या तीरावर उभं असलेलं हे देऊळ शक्तीच्या सरस्वती रूपास समर्पित आहे. आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी सनातन धर्म प्रस्थापित करण्या हेतू स्थापन केलेल्या चार पीठांपैकी शृंगेरी हे पहिले पीठ आहे.
शंकराचार्यांनी शृंगेरी येथे पीठ स्थापन केल्यावर सर्व प्रथम जी ज्ञानाची देवता आहे त्या देवी सरस्वतीची आराधना करून शारदा रूपात तिची येथे स्थापना केली. शंकराचार्यांनी स्वतः एका दगडावर कोरलेल्या श्री यंत्रावर चंदनाच्या लाकडापासून तयार केलेली शारदा देवीची मूर्ती स्थापना केली. त्यामुळे हे पीठ ‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठं’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
तेव्हापासून तब्बल बाराशे वर्ष या ठिकाणाची महती , ‘ शारदा देवीच्या सान्निध्यात आणि कृपाछत्राखाली ज्ञान संपादन करून घेण्याचे तीर्थक्षेत्र’ म्हणून वाढत आहे.
१४व्या शतकामध्ये पीठाचे १२वे आचार्य स्वामी विद्यारण्य यांच्या आशीर्वादाने निर्माण झालेल्या विजयनगर साम्राज्याच्या राजांनी या मंदिरास पुष्कळ दान दिले. त्याच सुमारास या परिसरात विद्याशंकर नावाच्या देखण्या शिवमंदिराचीदेखील निर्मिती झाली. विजयनगर राजांच्या काळात शारदेची मूळ चंदनाची मूर्ती बदलून सोन्याच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. नंतरच्या काळात होऊन गेलेल्या अनेक राजांनी जसे की मैसूरचे महाराजे, पेशवे, त्रावणकोरचे राजे इत्यादींनी शृंगेरी पीठास असणारा राजाश्रय कायम ठेवला आणि मोठ्या भक्तिभावाने शारदेची आणि येथील आचार्यांची सेवा केली.
आख्यायिका –
या संदर्भात एक आख्यायिका प्रचलित आहे. ‘आदी शंकराचार्य आणि थोर विद्वान मंडनमिश्र यांच्या वादविवादात मंडनमिश्र यांची पत्नी उभयभारती हीने पंच म्हणून जबाबदारी स्वीकारली. या वादविवादात शंकराचार्यांचा विजय झाला. असं म्हणतात की उभयभारती ही देवी सरस्वतीचा अवतार होती. वादविवादात पराभव झाल्यानंतर मंडनमिश्रांनी उभयभारतीची परवानगी घेऊन संन्यास स्वीकारला आणि शंकराचार्यांचे शिष्यत्व पत्करले. ‘अशा या शारदा देवीची मनोभावे भक्ती केली तर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सरस्वती, लक्ष्मी, पार्वती या सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात’, अशी मान्यता आहे.
या ठिकाणी ‘अक्षरभाष्य’ नावाचा विधी अनेक भाविकांकडून केला जातो. यामध्ये २ ते ५ वयोगटातील मुलांचे पालक आपल्या मुलांना घेऊन देवी शारदेच्या दर्शनासाठी येतात आणि पाटीवर मुलांच्या हाताने ओंकार गिरवून ती पाटी व पेन्सिल देवीस अर्पण करतात. अशा तऱ्हेने लहान मुलांची पहिली अक्षरओळख शारदा देवीसमोर करून दिली जाते. यात ‘त्या छोट्या शिशूस उत्तम ज्ञान मिळावे’ अशी प्रार्थना केली जाते.
या मंदिरास अनेक उत्सवांची अतिशय प्राचीन परंपरा आहे. त्यामध्ये ११ दिवसांचा नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
या पहिल्या लेखाच्या निमित्ताने ‘आम्हास उत्तम प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती व्हावी’ म्हणून श्री शारदेस आम्ही मनोभावे वंदन करतो.
या देवी सर्व भूतेषु ज्ञानरूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ||
– गिरिनाथ भारदे
©Ancient Trails.
नमस्कार, महत्वाचा विषय, मात्र विषय विस्तार अजूनही होणे अपेक्षित आहे…!