शोधयात्रा भारताची #२२ – अरुणाचा अवतार (२)!

इ.स. पूर्व सहावे शतक हे वैचारिक खळबळीचे आणि संक्रमणाचे होते. भारतामध्ये वैदिक यज्ञसंस्थेला आव्हान देणाऱ्या जैन आणि बौद्ध धर्माचा उदय होत होता. या वैचारिक संक्रमणाच्या काळात सामान्यांना जीवन पद्धती आणि श्रद्धा यांचा एक नवीन मार्ग दिसत होता. आणि या परिस्थितीत जैन आणि बौद्ध धर्माला मोठ्या प्रमाणावर लोकाश्रय मिळू लागला होता.

गौतम बुद्धाच्या जीवनातच बौद्ध धर्माने सर्वसामान्य जनतेला आकर्षित केले होते. आणि त्याच वेळी बौद्ध धर्मातील काही तत्वांचा विरोध करणारे त्याचे अनुयायी ही होते. या सर्व काळात बौद्ध धर्माने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर हा विरोध अधिकच वाढला. या विरोधाला उत्तर देण्यासाठी गौतम बुद्धाचा पट्टशिष्य कश्यपाने राजगृह (आजचे राजगिर – बिहार) इथे पहिली बौद्ध संगीती भरवली. ही संगीती म्हणजे बौद्ध धर्मासभा होती. यात बुद्धाने सांगितलेल्या सर्व नियमांचे आणि उपदेशांचे एकत्रीकरण करण्यात आले. अशाच प्रकारच्या संगिती नंतरच्या काळातही भरवल्या गेल्या. त्यामध्ये चौथी संगीती ही काश्मीर मध्ये कुंडलवन इथे भरवली गेली. कुशाण राजा कनिष्क याने ही संगीती भरवली होती.

काश्मीरमध्ये बौद्ध धर्माला सम्राट अशोकाच्या काळात मोठा आश्रय मिळाला आणि तो तिथे वाढला. अशोकानंतर कनिष्काने ही बौद्ध धर्म काश्मीरमध्ये वाढवण्यास हातभार लावला. या काळात अनेक परदेशी विद्वान काश्मीर मध्ये येऊन बौद्ध धर्माचा अभ्यास करत. आणि काश्मीर मधून हा धर्म इतर देशांमध्ये ही पसरत होता. पण भारताच्या इतर प्रांतांमध्ये मात्र बौध्द धर्माची पिछेहाट सुरू झाली होती.

काश्मीरचे सांस्कृतिक आणि धार्मिक वेगळेपण आपल्याला इथेही दिसून येतं. काश्मीरच्या भूमीवर प्राचीन वैदिक धर्म, बौद्ध आणि जैन धर्म आणि नंतर च्या काळात इस्लामी धर्म एकत्र होते. म्हणून काश्मीर म्हणजे एक ‘ melting pot’ म्हणून ओळखले जाते. या धार्मिक समरसतेचे महत्व नंतर राज्यभार सांभाळणाऱ्या कर्कोटक वंशातल्या राजांना ही होते.

ललितदित्याने हा राज्यभार सांभाळायला सुरुवात केली तेंव्हा काश्मीर मधील हे धार्मिक वातावरण सौहार्दाचे होते. आणि त्याबरोबरीने च ऐश्वर्य ही होते. पण या काळात अरबांच्या आक्रमणाचे सावट होतेच. ललितदित्याने अरबांच्या पराभवासाठी दिग्विजयाची मोहीम आखली. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच त्याने हे क्रूर आक्रमण यशस्वीपणे परतवले. या युद्धात त्याने कान्यकुब्ज ( कनौज – उत्तर प्रदेश) प्रदेशाचा राजा यशोवर्मनची मदत घेतली. आणि तोखरिस्तान (आजचा तुर्कस्तान – Turkey) मधील अरबांचे वर्चस्व संपवून तोखारिस्तान स्वतंत्र केले आणि तिथल्या रजकन्येशी विवाह केला. आणि तिथून परत येताना गिलगिट, बल्टिस्तान (आजचा पाकव्याप्त काश्मीर चा प्रदेश – part of POK) जिंकून घेतले.

या पश्चिमेकडच्या विजयानंतर ललितदित्याने प्राचीन रेशीम मार्गावर आपले नियंत्रण स्थापित केले. या काळात तिबेटचे राज्य हे स्वतंत्र आणि आणि सामर्थ्यशाली होते. पण तिबेटचे हे सामर्थ्य ललितादित्याच्या पराक्रमापुढे नमले. तिबेटचे राज्य काश्मीरशी जोडले गेले. त्याचबरोबर लडाखचा दुर्गम प्रदेश ही काश्मीरमध्ये समविष्ट झाला. याच काळात ललितदित्याने रेशीम मार्गावरील आपली पकड आणखी घट्ट केली. राज्यव्यवस्था बळकट आणि सशक्त असण्यासाठी व्यापार आणि व्यापारी मार्गांचे महत्व ओळखणारा सम्राट ललितादित्य एक कुशल शासक ही होता.

राजाने शांततेच्या काळात कोणती कामे करावीत याबद्दल कौटिल्याच्या अर्थशास्त्रात चाणक्याने स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कौटिल्य यातील दुसऱ्या अध्यायात म्हणतो – शांतता आणि उद्योग हे योगक्षेमाचे मूळ आहेत. शांततेच्या काळात प्रारंभ केलेल्या कार्याला सिद्धी (पूर्णंता) देणे म्हणजे उद्योग. आणि या काळात पूर्ण झालेल्या कार्याचा उपभोग आणि सुरक्षितता असेल तर त्याचा परिणाम भविष्यातील उत्कर्षात होतो.

ललितादित्याने काश्मीरच्या पूर्व आणि पश्चिम दिशा आपल्या सामर्थ्याने अभेद्य बनवल्या मूळच्या सौंदर्यवतीस ज्याप्रमाणे तिने धारण केलेले अलंकार अधिक सुंदर बनवतात त्याचप्रमाणे ललितादित्याच्या कालखंडात काश्मीर अनेक राजप्रासादानी, नवीन नगरानी आणि शांत, धीरगंभीर मंदिरांच्या निर्मिती ने अधिकच देखणे आणि समृद्ध झाले.

काश्मीरची राज्यव्यवस्था पुरेशी बलवान झाल्यानंतर ललितदित्याने पुढच्या दिग्विजयासाठी आपली सेना सज्ज केली. यावेळी राजाच्या दृष्टिपथात होता दक्षिण दिग्वजय!

– विनिता हिरेमठ
संदर्भ:
* राजतरांगिणी – कवी कल्हण
* कौटीलिय अर्थशास्त्र – अनुवाद – प्रा. र. पं. कांगले
* Emperor of Kashmir king Lalitaditya- Sanjay Sonwani
* मराठी विश्वकोश

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s