राजतरांगिणी या संस्कृत काव्याचे सात तरंग आहेत. यातील प्रत्येक तरंगात कवी कल्हणाने विविध राजे आणि त्यांच्या राज्यकारभाराचे सुरस वर्णन केले आहे. राजतरांगिणीमध्ये येणारे हे तरंग काश्मीर मधल्या राजांचे विलक्षण आणि विस्मयकारक जीवन उलगडतात. या ग्रंथाच्या चतुर्थ(चौथा) तरंगात कवी कल्हण म्हणतो –
नाद्यापि या भुवो दृष्टा जाने भानुकरैरपि l
राज्ञतस्य वभुवाज्ञा तत्र स्वैरविहारिणि ll ३३९ll
(राजतरांगिणी)
अर्थ – आजपर्यंत ज्या भूमीने सूर्यकिरणे देखील पहिली नव्हती तेथेही राजा ललितदित्याची आज्ञा स्वच्छंद रूपाने विहार करत होती.
राजा ललितदित्याच्या समर्थ आणि उत्कृष्ट राज्यव्यवस्थेचे हे अतिशय समर्पक वर्णन आहे!
इ.स ७२६ ते ७३३ राजा ललितदित्य युद्धभूमीवर होता. या काळात त्याने झाबुल, काबूल, तोखारिस्तान, गिलगिट, लडाख या प्रदेशांना आपल्या राज्यात जोडले होते. राजाच्या या अतुल्य पराक्रमाने प्रजेचा आनंद गगनात मावेना! काश्मीर मधल्या प्रजेने ललितादित्याच्या या पराक्रम आणि सन्माना प्रीत्यर्थ एक उत्सव सुरू केला. हा उत्सव मुस्लिम आक्रमण आणि बहुसंख्य होईपर्यंत सुरू होता.
पूर्व आणि पश्चिम दिग्विजय प्राप्तीनंतर राजाने आपल्या राज्यात अनेक नवनिर्माणाची कामे सुरू केली. परीहासपूर (city of joy) नावाच्या नवीन राजधानीची निर्मिती केली. काश्मीरमधील सर्वात सुंदर अशा मार्तंड मंदिराची निर्मिती राजा ललितदित्याने केली. आता केवळ अवशेष रूप असणारे हे भव्य सूर्य मंदिर राजाने एका उंच पठारावर बांधले. असे म्हणतात की सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबर राजा आपल्या दिनक्रमाची सुरुवात करत असे. सहिष्णु वृत्तीच्या ललितदित्याने अनेक चैत्य आणि विहारांची निर्मिती केली. परिहास केशव, मुक्त केशव, गोवर्धनदेव अशी अनेक मंदिरे बांधली.
आपल्या पराक्रमाला ललितदित्याने लोक सेवेचे अधिष्ठान दिले. या शांततेच्या काळात त्याने दुर्गम भाग रस्त्यांनी जोडले तर पर्वतावरील गावांना वितस्ता (झेलम) नदीचे पाणी पोहचवण्याची व्यवस्था केली. मंदिरांमध्ये सहस्त्रभक्त देव म्हणजे रोज अन्न पात्रांचे दान सुरू केले.
राजा ललितदित्याच्या या व्यवस्थेस पराक्रमाची धार होती. शांततेच्या या काळात त्याने राज्य आणखी बळकट केले आणि आपल्या असिधारेची झळाळी अधिक वाढवण्यासाठी दक्षिण दिग्विजयाची पताका उभारली. या दिग्विजयाची सुरुवात ललितदित्याने त्याला पश्चिमेकडील विजयामध्ये मोलाची मदत करणाऱ्या राजा यशोवर्मन च्या पराभवाने केली. कान्यकुब्ज (कनौज – उत्तर प्रदेश) चा राजा असणारा यशोवर्मन तोखारीस्तान च्या युद्धात ललितदित्याच्या बरोबरीने लढला. पण तरीही ललितदित्याने यशोवर्मनशी युद्ध का केले असावे याबद्दल इतिहास मौन बाळगून आहे. या युद्धात ललितदित्याने हिमाचल प्रदेशापासून ते आंतरवेद (गंगा यमुना खोरे) प्रदेशा पर्यंत आपले वर्चस्व स्थापन केले.
यानंतर ही ललितदित्याची घोडदौड सुरूच राहिली. त्याने कलिंग (ओरिसा) वर विजय मिळवला. यानंतर त्याने कर्नाटकावर आपली विजय पताका झळकवली मलय पर्वत ओलांडून त्याचे अश्व तामिनाडूपर्यंत पोचले. त्यानंतर सप्तकोकणातील प्रदेश ललितदित्याने आपल्या ताब्यात घेतला. स्वर्गाचे प्रवेशद्वार समजली जाणारी द्वारका नगरी ललितदित्याने अंकित केली. उजैन, ग्वाल्हेर ही ललितदित्याच्या अधीन झाले. कल्हणाने सांगितल्या प्रमाणे मरुस्थळ(राजपुताना) देखील ललितदित्याने जिंकून घेतले. या दिग्विजयाच्या अनेक कथा कल्हण सांगतो. मात्र याचे पुरेसे पुरावे आजही अज्ञात आहेत. परंतु त्यामुळे ललितदित्याचा पराक्रम झाकोळला जात नाही.
दक्षिण दिग्विजय प्राप्त करून ललितदित्य काश्मीर मध्ये परतला. या दिग्विजयाच्या आधी एक कोटी सुवर्णमुद्रा असणारा खजिना अकरा कोटी सुवर्ण मुद्रानी अधिक ऐश्वर्य संपन्न झाला. ललितदित्याने पुन्हा एकदा राज्यव्यवस्था बळकट केली आणि काही काळानंतर चीन वरील आक्रमणासाठी पामिर ओलांडून तकलामकान वाळवंटाच्या तरिम खोऱ्यात पोहोचला. पण यावेळी मात्र राजा ललितदित्य काश्मीर मधून बाहेर पडला तो पुन्हा कधीच न परतण्यासाठी! या विजय यात्रेमध्ये त्याचा अंत झाला. पण त्यामागची कारणे आजही अज्ञात आहेत. काही इतिहासकारांच्या मते एका हिमप्रपातात राजा ललितदित्य सैन्यासह नाहीसा झाला. तर काहींच्या मते त्याने अग्नि प्रवेश केला. तर काहींच्या अभ्यासप्रमाणे त्याच्या मृत्यूस भूकंप कारणीभूत होता.
यातोS स्तं द्युमाणि: पयोधिसलिलं कैश्चीतप्रविष्टोSपरै: संप्राप्तो
दहनं गतः किल परै लोकांतरं कीर्त्यते l
जायन्ते महतामहो निरुपमप्रस्थानहेवाकिनां
नि:सामान्य महत्वयोगपिशुना वार्ता विपत्तावपि
Il३७१ ll राजतरांगिणी
ज्याप्रमाणे सायंकाळी सूर्यास्त समयी कोणी म्हणतो सूर्य अस्त झाला, कोणी म्हणतो सूर्य समुद्रात बुडाला, कोणी म्हणतो सूर्याने अग्निप्रवेश केला तर अनेक म्हणतात सूर्य लोकोत्तरास गेला. अशा प्रकारे महापुरूषांच्या अंतकाळच्या विचित्र कथा प्रचलित होतात.
सम्राट ललितादित्याच्या गूढ मृत्यूने काश्मीरच्या पराक्रमी कालखंडाच्या अस्ताची सुरुवात झाली! तरीही त्याच्या पराक्रमाच्या आणि सामर्थ्याच्या तेजाने पुढची तीनशे वर्षे विखारी आक्रमण थोपवून धरले!!
– विनिता हिरेमठ
संदर्भ :
* राजतरांगिणी – कवी कल्हण
* Emperor of Kashmir – King Lalitaditya
– Sanjay Sonwani