मानस् सरोवर! आधी ब्रह्मदेवाच्या मनात निर्माण होऊन नंतर प्रत्यक्षात पृथ्वीवर अवतरलेले एक स्वर्गीय आणि दिव्य सरोवर! साक्षात् शिवाच्या सानिध्यात असणारे आणि गहिरी निळाई अंगभर वागवणारे हे सरोवर. सरोवराच्या काठी असणारी पांढरी रेती, निळ्याशार पाण्यावर खुलणारे पूर्ण चंद्रबिंब यामुळे मानसरोवराचा परिसर अद्भुत बनला आहे. या वैशिष्ट्यामुळे मानस् सरोवराला सरोवरांची राणी मानले जाते.
मानस् सरोवर केवळ त्याच्या सौंदर्यामुळे जसे प्रसिद्ध आहे तसेच ते हिंदू , बौद्ध आणि जैन श्रद्धेचे ही प्रतीक आहे. याच सरोवराच्या कुशीत जन्माला येतात सतलज, सिंधू आणि ब्रह्मपुत्र! यापैकी सतलज आणि सिंधू हिमालय पार करून पश्चिम वाहिनी होतात तर ब्रह्मपुत्रा हिमालय लांघून पूर्व वाहिनी होते.
तिबेटच्या भूमीवर उगम पावणारी ब्रह्मपुत्रा तिथे त्संगपो म्हणजे तिबेटी भाषेत ‘शुद्ध करणारी’ असते तर भारतात प्रवेश करताना ती ब्रह्मपुत्रा होते. जेंव्हा ती भारतीय सीमा ओलांडून बांगला देशात प्रवेश करते तेंव्हा ती जमुना असते. तिचा एव्हाना शांत होत जाणारा प्रवाह पद्मा (गंगेचे बांगलादेशातील नाव) नदी बरोबर वाहू लागतो आणि तिचे नामकरण होते मेघना! एकाच नदीला इतकी सुंदर नावं मिळण्याचं असं उदाहरण दुसरं नसेल!
त्सांगपोचा छोटा खळाळता प्रवाह भारतात शिरताना ब्रह्मपुत्रा बनून भलताच वेगवान आणि रौद्र होतो. वाटेत या रौद्रास अनेक प्रपातमाला येऊन मिळतात. विलक्षण वेग असणारी ही ब्रह्मपुत्रा आसामात येताना एक प्रचंड नद बनून येते. आणि साक्षात् ब्रह्माचा शक्तिशाली पुत्र बनते. या नदीच्या अतिशय वेगवान आणि शक्तिशाली प्रवाहामुळे ही नदी पुरुष वाचक ‘महानद ‘ म्हणूनही ओळखली जाते. आसाममधील लोक तिचा उल्लेख अनेकदा ‘दर्या ‘ असाच करतात.
आसाम या शब्दाचा असम (म्हणजे समतल नसणारी भूमी ) या संस्कृत शब्दावरून घेतला आहे असे काही अभ्यासकांचे मत आहे. तर काहींच्या मते हा शब्द असमा म्हणजेच अद्वितीय या अर्थाचा असावा. आधुनिक भारताच्या मुख्य धारेपासून काहीसा अलग पडलेला हा प्रदेश भारताचा एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक प्रवाह आहे. महाभारत आणि कलिकापुरणात या प्रदेशाचा उल्लेख आला आहे – कामरूप. एका कथेप्रमाणे महादेवाने आपला तिसरा डोळा उघडून भस्म केलेल्या कामदेवास या ठिकाणी आपले रूप परत मिळाले.
या कामरूप देशाची राजधानी प्रागज्योतिषपुर म्हणजे आजचे गुवाहाटी शहर. हे शहर वसवणाऱ्या नरकासुराचा वध श्रीकृष्णाने येथे केला होता. नरकासुर ज्या कामाख्या देवीच्या संतपास कारणीभूत झाला तिचे मंदिर इथून जवळच नीलाचल पहाडावर आहे. देवीचे शक्तिपीठ असणारे हे कामाख्या मंदिर तांत्रिकांचे मोठेच श्रद्धास्थान आहे.
अनादेि काळापासून अखंड सुरू असणाऱ्या या आणि अशा अनेक घटनांची साक्षीदार आहे ब्रह्मपुत्रा! परशुरामाने केलेला क्षत्रिय संहार आणि पिता जमदग्नीच्या आज्ञेनुसार केलेली माता रेणुकेची हत्या याचे पातक त्याला लागले. रक्तरंजित झालेली आपली कुऱ्हाड भार्गवाने ब्रह्मपुत्रेच्या पाण्याने शुद्ध केली आणि त्या पातकातून मुक्त झाला. पण ब्रह्मपुत्रेचे पाणी मात्र लाल झाले आणि ब्रह्मपुत्रा ‘लोहित’ या नावानेही ओळखली जाऊ लागली.
ब्रह्मपुत्रेने अशी अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. महाभारत काळापासून असणाऱ्या अनेक राजवटी तिने पहिल्या आहेत. याच कालौघात घडलेल्या एका यशस्वी संगराची ती साक्षीदार आहे. आणि ब्रह्मपुत्रेच्या विशाल पात्रात झालेल्या यशस्वी युद्धाचा नायक होता अहोम राजघराण्याचा सेनापती लचित बरफुकन!!
– विनिता हिरेमठ
संदर्भ:-
भारतकोश (हिंदी)
मराठी विश्वकोश
History of Assam ( G.Gait – 1906)
indiawaterportal.org