शोधयात्रा भारताची #२५ – महाबाहू ब्रह्मपुत्रेचा महाबाहू पुत्र

महाबाहू ब्रह्मपुत्र, महामिलनर तीर्थ
कोतोजुगधरि आइसे प्रकासी समन्वयर तीर्थ I

हे महाबाहु ब्रह्मपुत्र, (तू साक्षात्) महामीलनाचे तीर्थ (आहेस) कित्येक युगांपासून व्यक्त करत आहेस समन्वयाचा अर्थ!


डॉ. भूपेन हजारिका यांच्या एका गीतातील या ओळी ब्रह्मपुत्रेची संस्कृती एका क्षणात आपल्या समोर उभी करतात. युगानुयुगे वाहणारी ही नदी आसामची जीवनदायिनी आहे. केवळ भारतातली नाही तर आशिया खंडातल्या सर्वात लांब असणाऱ्या या नदीच्या काठावर गेली अनेक शतके अनेक समाज आणि कथा नांदल्या आहेत. ब्रह्मपुत्रेच्या अथांग आणि बलशाली प्रवाहात असंख्य निर्झर सामावले आहेत. ब्रह्मपुत्रा आसामची ओळख आहे. हिच्या किनाऱ्यावर कित्येक संस्कृती आणि जमातींचा उदयास्त झाला आहे.

कामरूप अर्थात् आसाम आणि ब्रह्मपुत्रेचं हे असं अद्वैत आहे! या कामरूप प्रदेशाचा पहिला लिखित ऐतिहासिक उल्लेख चक्रवर्ती गुप्तसम्राट समुद्रगुप्त याच्या अलाहाबाद प्रशस्ती ( शिलालेख) मध्ये आढळतो. चक्रवर्ती सम्राट समुद्रगुप्ताने जो दिग्विजय प्राप्त केला होता त्यामध्ये – “कामरूप देशातील जमातींनी सर्व कारभार त्याला देऊन, आज्ञापालन करून, प्रणाम करण्यास येऊन त्याचे उग्र शासन संतुष्ट केले” – असा उल्लेख आहे. ही प्रशस्ती इ. स. चौथ्या शतकातील आहे.

गुप्त साम्राज्याचा भाग असणारे कामरूप नंतर सहाव्या शतकात राजा भूति वर्मा याच्या अमलाखाली आले. प्रसिध्द चिनी यात्रेकरू हुआन श्वांग याने या प्रदेशास सातव्या शतकात भेट दिली होती. याशिवाय भास्कर वर्मा, पुष्यवर्मा असे मोठे शासक ही या प्रदेशास लाभले. पण तरीही या प्रदेशाचा सलग इतिहास आजही पूर्णपणे ज्ञात नाही. साधारणपणे अकराव्या शतकापर्यंतचा इतिहास विखुरलेल्या खुणांमधून आपल्या समोर येतो.

त्यानंतर मात्र १३व्या शतकात मूळची ब्रह्मदेशातील असणारी आहोम ही शान जमात पतकाई पर्वत पार करून आसाममध्ये आली. आहोम वंशाच्या ३९ राजांनी जवळपास ६०० वर्षे आसाममध्ये राज्य केले. या आहोमांचा स्वतंत्र धर्म होता. पण आसममधले अभिजन ( elite or noble class) आणि त्यांची आसामी भाषा यांनी हे आहोम प्रभावित झाले आणि त्यांनी आपला धर्म सोडून हिंदू धर्म आणि आसामी भाषा आंगिकारली. हिंदू धर्माच्या भव्य आणि अथांग प्रवाहाशी शान जमातीचे आहोम घराणे एकरूप झाले! आणि ब्रह्मपुत्रेच्या अथांग सर्वसमावेशक प्रवाहात या समन्वयाचे प्रतिबिंब डुलत राहिले!

लचित बरफुकन या आहोम राजवंशाचा सेनापती होता. लचितचा जन्म २४ नोव्हेंबर १६२२ या दिवशी आहोम राजवंशाच्या एका अधिकाऱ्याच्या घरात झाला. लचित यथावकाश योग्य प्रशिक्षण घेऊन तत्कालीन राजसत्तेचा सेनापती बनला. त्यावेळी भारतातील मुस्लिम सत्ता प्रबळ झाली होती.

१६६२ मध्ये या मुस्लिमांनी गुवाहाटी ताब्यात घेतले. यानंतर पुढची पाच वर्षे ते मुघलांच्या ताब्यात राहिले. पण १६६७ मध्ये लचित बरफुकन च्या शौर्याने मुघलांचा पराभव झाला. या पराभवाने औरंगजेबाने संतापून पुन्हा एकदा राजा राम सिंहाच्या नेतृत्वाखाली विशाल मुघल सेना आक्रमणासाठी पाठवली. या सैन्यात १८०० तुर्की घोडदळ, पन्नास हजार पायदळ, आणि पोर्तुगीज शिपयांबरोबर पाचशे तोफा होत्या. त्याशिवाय चाळीस नौका ही होत्या.

१६६९-७० मध्ये अनेक लढाया झाल्या. पण त्या निर्णायकी ठरल्या नाहीत. पण १६७१ मध्ये ब्रह्मपुत्रेच्या साक्षीने आहोम सेना आणि मुघलांमध्ये ऐतिहासिक लढाई झाली. ही लढाई लष्करी हालचालींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची समजली जाते. या लढाईने लष्करी डावपेच आणि युद्धाचे आयाम बदलले.

या सराईघाटच्या लढाईत मुघलांची सेना मोठी जहाजे घेऊन ब्रह्मपुत्रा ओलांडण्याच्या तयारीत होती. पण आहोम सेनेने संख्येने कमी असूनही युद्धतंत्र आणि चतुराई च्या बळावर मुघलांचा पराभव केला. या युद्धाच्या सुरुवातीला लचित बरफुकन आजारी असल्यामुळे सामील नव्हता. परंतु आहोम सैन्याची पिछेहाट होते आहे हे समजल्यावर तो रणभूमीवर आला. आणि अचाट शौर्य आणि नेतृत्व दाखवत त्याने ४००० मुघलांना यमसदनी पाठवले. त्यांची जहाजे नष्ट केली.

मात्र या लढाईनंतर लचित बरफुकनचा आजारपणात मृत्यू झाला. लचित बरफुकनने आपल्या असामान्य शौर्याने औरंगजेबासारख्या कपटी आणि धूर्त बादशहास पराभूत केले. त्यानंतर पुन्हा कोणत्याही मुघलाने आसामवर आक्रमण केले नाही. ब्रिटिशांचे राज्य येईपर्यंत आसाम मुघलांपासून स्वतंत्र राहिला.

लचित बरफुकनची ही तेजस्वी गाथा आज आपल्याला अनोळखी असली तरी NDA (National Defence Academy) मधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला लचित बरफुकन च्या नावाने असलेला सन्मान दिला जातो.

स्वतंत्र आणि सार्वभौम भारताची सेना लचित बरफुकनचे असामान्य शौर्य धारण करून राष्ट्राच्या सीमा अभेद्य राखते!

– विनिता हिरेमठ

संदर्भ
* मराठी विश्वकोश
* भारत कोश (हिंदी)
*History of Assam ( G.Gait 1906)
* Infiawaterportal.org
* पुराभिलेख विद्या – डॉ. शोभना गोखले

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s