संस्कृत साहित्य सरिता

आध्यात्मिक साहित्याविषयी काही चुकीच्या धारणा, समज अस्तित्वात आहेत। जसे की हे साहित्य सर्वसंगपरित्यागी संन्यासी लोकांसाठी आहे, हे साहित्य जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात गलितगात्र झाल्यानंतर वाचण्यासाठी आहे किंवा रोजच्या जगण्याच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी हे शास्रे निरुपयोगी आहेत।

मागील दोन शतकांत भारतामध्ये, पाश्चिमात्य विचारांच्या मार्गाने चालणारे विचारवंत निर्माण झाले। त्यांनी बोध साहित्याची आत्यंतिक उपेक्षा तरी केली किंवा त्यांचे चुकीचे अन्वयार्थ तरी लावले। समाजजीवनाचे वास्तविक प्रतिबिंब साहित्यात उमटलेले असते। काळाच्या कसोटीवर खरे उतरणाऱ्या, प्रत्येक देश-काल-परिस्थितीला अनुकूल असणाऱ्या उपनिषदांना केवळ विचारवंतांची मक्तेदारी म्हणून दूर लोटले गेले। रोजच्या जीवनाला अनुपयुक्त म्हणून उपेक्षित ठेवले गेले।

रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या ‘संस्कृती के चार अध्याय’ या ग्रंथासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रस्तावना लिहिली आहे. ती वाचल्यानंतर लक्षात येते की भारतीय चिंतन परंपरेविषयी स्वातंत्र्योत्तर काळात जी उपेक्षेची भूमिका घेतली गेली, त्याचे मूळ कोठे आहे! पंडित नेहरू लिहितात “जब पश्चिम के लोग समुद्र पार से यहां आये, तब भारत के दरवाजे एक खास दिशा की ओर खूल गये। आधुनिक औद्योगिक सभ्यता, बिना किसीं शोरगुल के, धीरेधीरे, इस देश में प्रविष्ट हो गयी। नये भावो और नये विचारो ने हम पर हमला किया और हमारे बुद्धिजीवी अंग्रेज बुद्धीजीवियो की तरह सोचने का अभ्यास करने लगे।यह मानसिक आंदोलन,बाहर की ओर वातायन खोलने का यह भाव,अपने ढंग पर अच्छा रहा,क्योकी इससे हम आधुनिक जगत को थोडा-बहुत समझने लगे। मगर,इससे एक दोष भी निकला की हमारे ये बुद्धिजीवी जनता से विच्छिन्न हो गये, क्योंकी जनता विचारों की इस नयी लहर सें अप्रभावित थी।परंपरा से भारत में चिंतन की जो पद्धती चली आ रही थी, वह टुट गयी। फार भी, कुछ लोग उससे इस ढंग से चिपके रहे,जीसमे न तो प्रगती थी,न रचना की नयी उद्भावना और जो पूर्ण रूप से नयी परिस्थितीयो से असंबद्ध थी।पाश्चात्य विचारो में भारत का जो विश्वास जगा था, अब तो वह भी हिल रहा है। नतिजा यह है,की हमारे पास न तो पुराने आदर्श है न नवीन; और हम बिना यह जाने बहेते जा रहे है की हम किधर को या कहां जा रहे है।नयी पिढी के पास न तो कोई मानदण्ड है,न कोई दुसरी ऐसी चीज,जीससे वह अपने चिंतन या कर्म को नियंत्रित कर सके”

या प्रास्त्ताविकात ते स्पष्टपणे म्हणतात की, “परंपरा से भारत मे चिंतन की जो पद्धती चली आ रही वह टूट गयी। हमारे पास न पुराने आदर्श है न नवीन।नयी पिढी के पास कोई मानदंड नही है जीससे वह अपने चिंतन या कर्मको नियंत्रित कर सके।” यामधून त्यांना स्पष्टपणे म्हणायचे आहे की आधुनिकता म्हणजे पश्चिमेकडून येणारे विचार चिंतन!भारतीय चिंतनाची परंपरा पूर्णपणे खंडित झालेली आहे।त्यामुळे भारतीय मनुष्याकडे तत्वज्ञान अगर व्यक्तित्वाचे आदर्शच नाहीत। त्यामुळे भारतीय माणूस हा एक भरकटलेला तारू आहे। असे ज्यांचे मत होते त्या राज्यकर्त्यांच्या हातात दीडशे वर्षांच्या गुलामी नंतर हा देश गेला। त्यांनी “भारतीय चिती” मृत झाली आहे, हे मानूनच देश चालवायला घेतला होता। त्याच्या दृष्टीने हे नव्याने निर्माण झालेले राष्ट्र होते।या देशासाठी नवीन आदर्श निर्माण करायचे आहेत अशी त्यांची भूमिका होती। वेद उपनिषदे महाकाव्ये आगमे पुराणे या सर्व साहित्याकडे जुनाट प्रतिगामी म्हणूनच पाहिले गेले। या दृष्टिकोनाबरोबरच भारतात अस्तित्वात असलेली विषमता, जाती परंपरा, अस्पृश्यता, सामाजिक प्रश्न, दारिद्र्य या सर्व समस्यांच्या मुळाशी धर्म(रिलीजन) धार्मिकता आहे, असे नागरिकांवर ठसवले गेले। हे म्हणजे एखाद्या विशाल वृक्षाच्या तळाशी तण वाढलेले असेल, तर ते झाडच निरुपयोगी आहे, असे म्हटल्या प्रमाणे होते। एकूणच भारतातील पुरातन प्राचीन जे जे आहे ते ते सर्व मागास प्रतिगामी आहे, असे सांगण्याची चढाओढच मागच्या कालखंडामध्ये विचारवंतांमध्ये लागली होती। तैत्तिरीय उपनिषदात आलेला, शिक्षावल्लीचा ११ वा अनुवाक जरी नवीन पिढीला सांगितला असता तरी त्यांना आदर्श, मानदण्ड सर्व काही लाभले असते। पण आपल्या खजिन्यात काय आहे, हे पाहण्याची तसदीच घेतली गेली नाही।

आधुनिकता हा शब्द केवळ पश्चिमी विचार, सभ्यता व विकासासाठी वापरला जाऊ लागला। जणूकाही पौर्वात्य भारतीय विचार हे आधुनिक असूच शकत नाही, असेच या विचारवंतांनी मानणे सुरू केले। एकंदरीतच हे विचारवंत भारत देशाचा विकास आणि अलीकडच्या काळात पश्चिमेला उदयास आलेली राष्ट्रे आणि त्यांचा विकास यात साम्य आहे,असे मानून चालणारे होते। वास्तविक अलीकडच्या काळात उदयास आलेले पश्चिमी राष्ट्रे, तेथे घडलेल्या राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती किंवा संपूर्ण उलथापालथ,या प्रकारचे काहीही भारतात घडणे शक्य नव्हते आणि नाही। कारण भारताची चेतना शक्ती या देशांहून पूर्णपणे भिन्न आहे। परंतु एकदा दुसर्‍याच्या ओंजळीने पाणी पिण्यामध्ये धन्यता मानली की वस्तुस्थितीकडे आपोआपच डोळेझाक होते। अज्ञानाने वास्तव नाकारून देशाला भलत्याच वाटेने चालायला लावण्याचा हा अप्राकृतिक प्रकार आज आपल्याला महागात पडलेला दिसून येतो आहे।याच विद्वानांनी देशाची शिक्षण, आरोग्य, उद्योग, विदेशनिती विषयक धोरणे ठरवली!!

मानवी कल्याण सुख शांतता यांची ग्वाही आजच्या शिक्षणातून दिली जात नाही। जीवघेणी स्पर्धा जगात सगळीकडे बोकाळली आहे।मानवाला कुठे पोहोचायचे आहे हे माहीत नसलेल्या गंतव्याकडे विकासाच्या नावाखाली धावणे भाग पाडले जात आहे। त्यामुळेच आपण सतत परिवर्तन घडले पाहिजे, बदल झाले पाहिजेत, सर्वकाही नूतन नवीन झाले पाहिजे हेच ऐकत आलेलो आहोत। दुकानांची नावे, उत्पादनाची नावे यातही नवीन न्यू नूतन हे शब्द असतात। जगभरात खेळला जात असणारा विकास नावाचा खेळ तर, सर्वांना आता चक्रावून टाकतो आहे। सगळीकडे विकासाचे पडघम वाजताहेत। माणसाला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा सुख सेवा मिळावी म्हणून सर्वत्र प्रयोग, संशोधन, खर्चिक प्रकल्प ,औद्योगिक संस्था ,सामाजिक संस्था उभ्या केल्या जात आहेत। राजकारणी वैज्ञानिक उत्पादक व्यापारी सगळेजण मानवाच्या विकासासाठी झटत आहोत हे सांगत असतात। सगळे जण विकास आणि त्यातून परिवर्तन-बदल याविषयी बोलताना दिसत आहेत। अजिबात माहीत नसलेले किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेले असे कोणते तरी गंतव्य गाठण्यासाठी मानवाचे बोट धरून, ही विकासगामी मंडळी धावत सुटली आहेत।पण ज्याच्या सुखासाठी ती धावत आहेत त्या मानवाला खरे सुख लाभते आहे का?? सुखाच्या पाठोपाठ येणाऱ्या समाधान संतोष शांती प्रीती या भावंडांशी त्याची भेट होते आहे का? हे कोणी पाहत नाही.

अशा सगळ्या गदारोळात एक शांतीमंत्र ऐकू येतो. तीन वेळा गुंजणारा– शांती: शांती: शांती: ।।विकासामागे धावणारे विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक, कर्मचारी, मजूर ,राजकारणी, व्यवस्थापक, सेवाकर्मी, अधिकारी यांच्यापैकी अनेकांना हा मंत्र क्षीण आवाजात ऐकू येऊ लागतो आणि ते त्या दिशेला वळून पाहतात। तेथे धावत जावे लागत नाही। तेथे पथ दिशा आणि लक्ष्य नसते। तेथे चालणे झाले तरी ते निर्हेतुक असते। तेथे अनेक विविध ठिकाणी विविध रूपे घेऊन वावरणारा “स्व” हा “स्थ” होतो!! थांबतो.

मूल्यांकन, सवयी ,रुढी ,रितीरीवाज, लोकमान्यता या सगळ्यांना घेऊन धावणार्‍या मन-मस्तिष्कात, या सर्वाहून काही वेगळे, श्रेष्ठ असे तत्व जगतात असू शकेल अशी जाणीव निर्माण होते। आणि मग अनेकानेक ऋषी मुनी महर्षी ब्रह्मवादिनी हात उंचावून, परतत्त्वाच्या शोधात येणाऱ्या या पाहुण्याचे स्वागत करतात।ते म्हणतात आम्ही असेच आलो या तत्वाकडे “”अथाsतो ब्रह्मजिज्ञासा”” म्हणत। इथे प्रत्येकाला अनुकूल प्रणाली उपलब्ध आहे। ही उपनिषद अमृतगंगा प्रत्येकाची तृषापूर्ती करू शकते।
(“विकासाची भारतीय संकल्पना” या येऊ घातलेल्या ग्रंथातील काही परिच्छेद)
रमा दत्तात्रय गर्गे

1 Comment

  1. खूप छान लेख आहे वाचून आनंद झाला आपला आभारी आहे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s