प्राचीन काळी झालेल्या एका युद्धात विदेह देशाचा एक राजा हरला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर विधवा झालेली त्याची राणी आपला राजकुमार आणि राजकोषातील काही संपत्ती घेऊन लपत छपत चंपा (भागलपूर – बिहार) राज्यात पोचली. काही काळानंतर राजकुमार मोठा झाला. आणि त्याने आईला सांगितले, “तुझ्याजवळील अर्धी संपत्ती मला दे. ती घेऊन मी सुवर्णभूमीमध्ये जाऊन आणखी संपत्ती कमावतो आणि आपले राज्य परत मिळवतो.” त्यावर ती म्हणाली, “बाळ या सागरी प्रवासात अनेक धोके आहेत आणि यशाची शक्यता खूपच कमी आहे.” तरीही राजकुमार मोठ्या धाडसाने हा सागर पार करून अनेक अडचणींचा सामना करून सुवर्णभूमीमध्ये पोहोचला आणि पुढे त्याने आपले विदेह राज्य परत मिळवले.
एक जातककथा
बोधिसत्वाच्या अनेक जन्मांच्या कथा सांगणाऱ्या जातक कथांमधील ही एक कथा आहे. या जातककथा ख्रिस्तपूर्व ३०० च्या काळापासून लिहिल्या गेल्या आहेत. या आणि अशा अनेक जातक कथांमध्ये सुवर्णभूमीचे उल्लेख आणि त्याबरोबर असणारे व्यापारी संबंध आले आहेत. केवळ बौद्ध जातक कथांमधूनच नव्हे तर गुणाढयाने लिहिलेल्या संस्कृत बृहदकथांमधूनही या प्रदेशाचे उल्लेख आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. या कथांमधून समोर येणारी सुवर्णभूमी किंवा सुवर्णद्वीप म्हणजे मुख्यत्वे मलेशिया. पण याबरोबरच कंबुज (कंबोडिया), सुमात्रा, जावा, बाली (इंडोनेशिया) सयाम (थायलंड) अशा आग्नेय आशिया मधील ( Southeast Asia) देशांचे ही उल्लेख येतात.
भारतीयांच्या या सीमा विस्ताराचे सगळ्यात प्राचीन उल्लेख मिळतात ते चिनी साहित्यात. फा-हियान नावाचा एक चिनी यात्रेकरू इसवी सनाच्या पाचव्या शतकात सागरी मार्गाने भारतातून चीनला परतला. या प्रवासात त्याला भारतीय नाविक आणि त्यांच्या दर्यावर्दी वृत्तीचे आलेले अनुभव त्याने आपल्या प्रवास वर्णनात मांडले आहेत.
व्यापार उदिमाच्या निमित्ताने भारतीयांनी इ. स. दुसऱ्या शतकापासून ते साधारणपणे इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंत आपल्या वसाहती आणि कालौघात राज्येही स्थापन केली. या राज्यविस्तारात भारतीय संस्कृती आणि जीवन पद्धतीत तिथले स्थानिक अलगद सामील झाले.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतीय संस्कृतीचे पाहिले पाऊल फुनान (कंबोडिया) प्रदेशात पडले. त्यानंतर या प्रदेशांमधून भारतीय संस्कृती विस्तारत च गेली. चंपा(व्हिएतनाम), जावा, सुमात्रा, बोर्निओ, श्रीलंका, मलाया, कंबुज(कंबोडिया), सयाम (थायलंड), बाली (इंडोनेशिया), ब्रह्मदेश, चीन, तिबेट अशा अनेक प्रांतांमध्ये भारतीय संस्कृती फुलली, बहरली आणि यतीन अनेक राज्ये सशक्त आणि बलाढ्य झाली.
इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून सुरू झालेला हा सागरी प्रवास. असंख्य अदृश्य आणि अनाकलनीय संकटांचा होता. तरीही प्राचीन भारतीयांनी हा सागर लांघून या अनोळखी प्रदेशात एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. व्यापाराच्या निमित्ताने आलेले भारतीय या प्रदेशात स्थिरावले आणि त्याबरोबरच संस्कृत भाषा, बौध्द साहित्य, शिल्पकला, मंदिर स्थापत्य, पूजा पद्धती यांनाही नवीन आयाम मिळाले. आग्नेय आशियातील (south east Asia) संस्कृती पूर्णपणे भारतीय झाली. आणि हा प्रदेश आधुनिक काळात बृहत्तर भारत (Greater India) म्हणून ओळखला जाऊ लागला. तेराव्या शतकानंतर या प्रदेशात इस्लामचा प्रसार झाला. त्या आक्रमणात इथली भारतीय संस्कृती काहीशी झाकोळली गेली. तरीही या तेजोमय परंपरेचे अनेक किरण हा वैभवशाली भूतकाळ प्रकाशमान करत आहेत. अंगोरवाट आणि बोरोबदूर हे या वैभवाचे कळसाध्याय आहेत!
– विनिता हिरेमठ
संदर्भ –
* Hindu colonies in the far East
– R.C Majumdar
* मराठी विश्वकोश
* प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती
– डॉ. गो. ब. देगलूरकर
* बृहात्तर भारत – रमेश शंकर गुप्ते.