शोधयात्रा भारताची #२७ – अरुपाचे रूप!

वयाच्या १४ व्या वर्षी एक कारकून म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत रुजू झालेला स्टॅमफर्ड रफेल्स त्याच्या दूरदृष्टी आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर जावा बेटांचा गव्हर्नर जनरल झाला होता. मलाय या स्थानिक भाषेवर प्रभुत्व आणि जावाच्या चालीरीती आणि लोकजीवनाची उत्तम जाण असणारा रफेल्स इतिहास अभ्यासक ही होता. १८११ मध्ये डच आणि फ्रेंच वसाहतींचे वर्चस्व मोडून रफेल्स ने जावा बेटांवर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकार पक्का केला.

सन १८१४. स्टॅमफर्ड रफेल्सला जावा मधल्याच एका मंदिराच्या अवशेषांची माहिती मिळाली. याआधीही त्याला त्याचा सेना सर्वेक्षण अधिकारी ( military surveyer ) कोलीन मॅकेन्झी कडून हिंदू देवतांच्या मूर्तींचे अवशेष अनेक ठिकाणी दिसल्याचे समजले होतेच. हा मॅकेन्झी अकरा वर्षे भारतात राहिला असल्याने त्याला हिंदू देवतांबद्दल पुरेसे ज्ञान होते. आणि मुस्लिम बहुसंख्य असणाऱ्या जावा बेटांवर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंदू संस्कृतीची चिन्हे पाहून तो आश्चर्यचकित झाला होता. स्टॅमफर्ड रफेल्सही उत्तम इतिहास अभ्यासक असल्याने त्याने मिळालेल्या माहितीप्रमाणे त्या देवळाकडे कूच केले. तिथे त्याला एक अचंबित करणारे दृश्य दिसले.

ज्वालामुखीच्या राखेच्या ढीगाखाली आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या झुडूपांमधून मंदिराचे कळस आणि काही अवशेष चोरटेपणाने बाहेर डोकावत होते. रफेल्स ने कॉर्निलिओस या डच इंजिनिअर च्या मदतीने २०० मजुरांना कामाला लावले आणि दीड महिन्यांच्या परिश्रमानंतर हे मंदिर रफेल्स समोर पूर्णाकृतीत उभे होते. या मंदिराची कारागिरी आणि देखण्या स्थापत्याने सर्वांना भुरळ घातली. हा होता बोरोबुदुर चा आज जगविख्यात असणारा सर्वात मोठा बौद्ध स्तूप!

इ. सन १००० नंतर पूर्णपणे विस्मृतीत गेलेला हा स्तूप १७०० च्या सुमारास काही काळासाठी लोकांसमोर आला होता, पण तो एक अपशकून म्हणून! आणि या कटू स्मृतींनंतर हा स्तूप पुन्हा एकदा काळाच्या पडद्याआड लपला होता.

प्राचीन इतिहासातील आठवे आश्चर्य म्हणून प्रसिद्ध असणारा हा स्तूप इंडोनेशियातील जावा बेटावरच्या एका छोट्या टेकडीवर उभा आहे. आठव्या शतकात जावा बेटांवर राज्य करणाऱ्या शैलेंद्र घराण्याच्या श्रीविजय याने हा स्तूप उभारला आहे. शैलेंद्र घराण्याच्या काळात जावा बेटाने महायान बौध्द पंथाचा स्वीकार केला होता.

महायान पंथाचे तत्वज्ञान या बोरोबूदुर च्या स्तूपामध्ये उतरले आहे. एकंदरीत नऊ मजले असणारा हा स्तूप कळसाकडे जाताना निमुळता होत जातो. या स्तूपाच्या निर्मितीचा पाया बौध्द धर्माचे तत्वज्ञान आहे. याच बरोबर महायान पंथाच्या ललित विस्तर या ग्रंथातील अनेक प्रसंग या स्तूपावर शिल्पंकित केले आहेत.

बौध्द तत्वज्ञानाच्या संकल्पने प्रमाणे विश्व हे तीन घटकांवर आधारित आहे. कामधातू, रूपधातू आणि अरुपधातू.

स्तूपाच्या सर्वात खालच्या स्तरावर आहे कामधातु. अर्थात मानवी जीवनातील सुख दुःखानी भरलेल्या घटना आणि पुनर्जन्म. ज्यात मानवी जीवन नाव ,पैसा आणि इच्छा आकांक्षा नी पूर्ण बांधले गेलेले असते. स्तूपाच्या या सर्वात खालच्या थरात अशाच घटनांची शिल्पे आहेत.

स्तूपाचा दुसरा टप्पा हा रूप धातू अर्थात जीवनाच्या अधिक गहिऱ्या आणि गहन विचारांचा आहे. यात मानवी जीव इच्छा आकांक्षा यांच्या पलीकडे आला आहे. परंतु अजूनही आपला अहंकार जपतो आहे. स्तूपाच्या या स्तरावर आपल्याला महायान पंथातील बोधिसत्वाची आत्मशोध विषयक तत्वे कोरलेली दिसतात.

महायान पंथात असणारी सर्वात वरची पायरी म्हणजे अरुप धातू. ज्याचे स्वरूप निराकार आणि अहंकार मुक्त आहे. स्तूपाचा सर्वात वरचा आकाशाकडे निमुळता होत जाणारा मार्ग हेच दर्शवतो. स्तूपाचा हा भाग स्थिरतेचा आहे जो मानवी जीवनाच्या कोणत्याही सामान्य अवस्था दाखवत नाही. एकही शिल्पांकन नसणारा स्तूपाचा हा अवकाश निर्वाणपद दर्शवतो!

बोरोबुदुर च्या या स्तूपाचे वैशिष्ट्य केवळ तो जगातील सर्वात मोठा स्तूप आहे यावर सीमीत नाही, तर तो बौध्द तत्वज्ञानाचा अचल आणि निरंतर आविष्कार आहे!

– विनिता हिरेमठ

संदर्भ –
* Borobudur – Golden tales of Buddhas – John Miksic
* प्राचीन भारत – इतिहास आणि संस्कृती – डॉ. गो. बं देगलूरकर
* बृहत्तर भारत – रमेश शंकर गुप्ते
* मराठी विश्वकोश
* Encyclopedia Britannica


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

%d bloggers like this: