पतिया लिख भेजी मै…

पतिया लिख भेजी मै
तुम्हरे कारण जुग सी बीतत मोरी रतिया
जरत मन जुहत बाट तुमहरी अखिया 

 मारूबिहागच्या या बंदिशीचा रंग अधिक गहिरा होत जातो आणि समोर येते ती पत्र लिहिणारी एक सुंदरी.

प्राचीन मंदिराच्या शिल्पपट्टावर विराजमान आहे एक युवती. कदाचित  आपल्या प्रियकराला पत्र लिहिते आहे. पत्रलेखिका असं तिला म्हटलं जातं. तिचा कमनीय बांधा, तिची उभी राहण्याची लकब ही जशी लक्षवेधी आहे तसं तिचं पत्र लिहिणं सुद्धा विलोभनीय आहे. ज्या शतकात ही मंदिरे बांधली गेली त्या शतकातल्या स्त्रियांना अक्षरज्ञान होतं का? की केवळ ती एकाद्या शिल्पकाराच्या नजरेतून साकारली गेली आणि पत्र” लेखिका” म्हणून जगभरात मान्यता पावली? चला जरा मुशाफिरी करून येऊ या का प्राचीन भारतीय महिला आणि त्यांच्या शिक्षणाबाबत.

हिंदू परंपरेचे अधिष्ठान असणा-या वैदिक साहित्यातील ऋग्वेदात स्त्रियांनी रचलेल्या सूक्तांचा समावेश आहे ही उल्लेखनीय बाब आहे. वैदिक काळात मुलाइतकेच मुलीच्याही शिक्षणाला प्राधान्य दिले जात असे. त्यांच्याही अभ्यासाची सुरुवात उपनयन संस्काराने होत असे. त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश केला जात असे. कन्यांचे  उपनयन झाल्यावर त्या गुरूगृही राहून वेदाध्ययन करीत असत. ब्रह्मचर्याचे पालन करून अध्ययन पूर्ण करणा-या कन्येला सुयोग्य वराची प्राप्ती होते असे अथर्ववेदात म्हटले आहे. ऋषिका जुहू ही बृहस्पतीची पत्नी होती. प्रमादामुळे त्याने पत्नीचा त्याग केला होता तथापि वैदिक संहितांचे अध्ययन- अध्यापन करून तिने स्वत:चे जीवन व्यतीत केले होते. विश्वावरा आत्रेयी हिने स्वत: यज्ञाचे पौरोहित्य केले व अन्य स्त्रियांनाही तसे करण्याचा उपदेश केला. अग्नीची पूजा करण्यास तत्पर आणि विद्वानांचे स्वागत करणा-या विश्वावरेला यज्ञकर्त्री म्हणून संबोधिले आहे.

ब्राह्मणकाळात यज्ञ हा वैदिक धर्माचा मेरुदंड मानला जाई. कौषीतकी ब्राह्मणात पथ्यास्वस्ति ही स्त्री उत्तरेकडचा खडतर प्रवास करून अध्ययन करते व तिच्या पारंगततेबद्द्ल वाच् ही उच्च पदवी मिळविते असा संदर्भ दिसतो. व्याकरणकार पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथा तसेच महाभाष्यातही उल्लेख आढळतात की काही स्त्रिया आचार्य या नात्याने अध्यापनही करीत असत. 

गार्गी व मैत्रेयी यांच्या कथा बृहदारण्यक उपनिषदात आल्या आहेत. कात्यायनी व मैत्रेयी या याज्ञवल्क्य ऋषींच्या दोघी पत्नी. कात्यायनीला  प्रामुख्याने गृह्कृत्याची आवड होती तर मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी होती. याज्ञवल्क्यांनी संन्यास घेण्यापूर्वी मैत्रेयीला तिच्या इच्छेनुसार ब्रह्मज्ञान दिले. पृथ्वीवरील वैभवापेक्षाही अमरत्वाचे ज्ञान मैत्रेयीला अधिक महत्वाचे वाटले.

विदेह देशाच्या राजा जनकाने बहुदक्षिण यज्ञ केला व आवाहन केले की सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी ब्राह्मणाने शिंगाना सोने बांधलेल्या एक हजार गाई न्याव्यात. याज्ञवल्क्य ऋषींनी पुढाकार घेतल्यावर अन्य ब्राह्मणांनी त्यांच्याशी शास्त्रचर्चा केली परंतु  याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांना निरुत्तर केले. त्यानंतर गार्गी वाचक्नवी पुढे आली आणि तिने याज्ञवल्क्य ऋषींशी शास्त्रचर्चा केली. गार्गी  मर्यादेचे उल्लंघन करून प्रश्न विचारते आहे असे मानून याज्ञवल्क्य ऋषींनी तिला धमकी दिली की तुझे मस्तक गळून पडेल. पण गार्गीला त्याचे भय वाटले नाही. आपल्याला धमकी देणा-या याज्ञवल्क्य ऋषींना गार्गीने ब्रह्मज्ञानी म्हणून घोषित केलेले दिसते.

ज्याप्रमाणे पुरुष ब्रह्मचारी राहून तप, स्वाध्याय, योग  इ. द्वारे ब्रह्मपद प्राप्त करीत असत त्याप्रमाणे  स्त्रियाही परमार्थाची वाटचाल करीत असत.

रामायण काळातील स्त्रियांना धर्मशिक्षण दिले जात असे. सीता, कौसल्या, तारा,वेदवती,स्वयंप्रभा यांना वैदिक शिक्षण दिले गेले होते. सीतेचे उपनयन झाले असून ती सायंसंध्या करीत असल्याचे उल्लेख सापडतात. श्रीराम व लक्ष्मण यांना विश्वामित्रांबरोबर पाठविण्यापूर्वी कौसल्येने त्यांचे स्वस्त्ययन केले होते. वालीची पत्नी तारा ही मंत्रविद् म्हणून ओळखली जात असे. मतंग मुनींच्या आश्रमात राहून ज्ञानार्जन करणारी शबरी सर्वांना परिचित आहे.

महाभारतातील सुलभा-जनक संवाद प्रसिद्ध आहे. सुलभा ही एक कुमारी संन्यासिनी असून प्रधान नावाच्या राजाची कन्या होती. संन्यास आणि योगमार्गाचे आचरण करणा-या विदुषी सुलभेने  मिथिलेचा राजा जनक याच्याशी कर्मयोग , गृहस्थाश्रम यासारख्या विषयांवर शास्त्रचर्चा केली आहे. (म.शां. ३०८ ) महाभारतातील स्त्रिया स्थालीपाकयज्ञ व त्यासदृश यज्ञ करीत असत. उत्तम स्त्रियांनी पांडव पत्नी द्रौपदीप्रमाणे वेदाध्य्यनकेले पाहिजे असे महाभारत निर्णय या ग्रंथात सांगितले आहे.

स्कंद पुराणातील प्रभास खंडात सावित्रीचे चरित्र आले आहे तेथेही ती अग्नीला मंत्रपूर्वक आहुती देताना दिसते.

येथपर्यंत स्त्रियांच्या शिक्षणाचे संदर्भ पाहिल्यानंतर स्त्रियांच्या सामाजिक स्थानाविषयी समजून घेणे औचित्याचे ठरेल. शिक्षणाच्या अधिकारामुळे स्वत:ला ब्रह्मपदी नेण्याचा अधिकार असलेल्या स्त्रीच्या सामाजिक अध:पतनाला नंतरच्या काळात सुरुवात झालेली दिसते. भारतातील भौतिक समृद्धीचा मोह पडून अनेक परकीय आक्रमकांचे आघात भारताला झेलावे लागले.  त्यामुळे स्त्रियांच्या  विशेषत: मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. 

मनुस्मृतीमध्ये मनूने नोंदविले आहे की विवाह हाच मुलीचा उपनयनसंज्ञक  विधी मानावा. पतिसेवा हीच तिची गुरुसेवा आणि गृहकृत्ये हेच तिचे यज्ञकृत्य होय. स्त्रिया, शूद्र व इतर अधर्मी वृत्तीच्या लोकांच्या जीवनाचे व नीतीचे नियमन करण्यासाठी पुराण साहित्याची रचना केली गेली कारण स्त्रिया, शूद्र आणि कुळहीन ब्राह्मण लोकांचा वेद ऐकण्याचा अधिकार काढून घेतला गेला. लहान वयात मुलींच्या विवाहाची पद्धत सुरु झाल्याने  त्यांच्या शिक्षणाच्या हक्कावर घाला घातला गेला. या सा-याचा परिपाक म्हणून पुरुषसत्ताक समाजव्यवस्था अस्तित्वात आल्याने विधवा स्त्रियांना सामाजिक व कौटुंबिक आदर नाकारला गेला. स्त्रीच्या मासिक धर्माचे निमित्त पुढे करून तिला अपवित्र ठरविले गेले आणि धार्मिक कृत्यातही तिचे अधिकार नाकारले गेले. धार्मिक कार्यात पतीसह तिचा सहभाग अनिवार्य समजला गेला. कोणत्याही सामाजिक अगर धार्मिक बाबतीत स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची कल्पना नाकारली गेली असेही आपल्याला दिसते. पण याकडे पाहताना विचार करावा की reading between the lines म्हणजे जे त्या ओळींमध्ये प्रत्यक्ष लिहिलेले नाही तरीही जे त्यात अनुस्यूत आहे ते समजून घ्यावे. भारतातील स्त्री शिक्षणाची परंपरा प्राचीन आहे आणि तिच्यामध्ये का खंड पडला याचे ऐतिहासिक दाखलेही उपलब्ध आहेत. गरज आहे  फक्त आपण ते वाचण्याची, शोधण्याची आणि त्यातून योग्य तो बोध घेण्याची.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s