शोधयात्रा भारताची #२८ – अंकोर वाट

कंबोडिया मधले घनदाट अरण्य. गेली अनेक वर्षे या अरण्यात कुठलीही मानवी चाहूल नव्हती. त्यामुळं इथं पायवाटा असण्याचा ही प्रश्न नव्हता. अशा या अनोळखी प्रदेशात हेन्री मॉहॉट वाट काढत चालला होता. वर्ष होते १८६०. हा हेन्री जन्माने फ्रेंच होता, पण तो ब्रिटनच्या रॉयल जिओग्राफिकल सोसायटी आणि झुलॉजिकल सोसायटी लंडन या संस्थांमध्ये नॅचरल हिस्ट्री चा अभ्यासक होता. त्याच्या या संशोधक वृत्तीला प्रवासाचीही जोड होती. हेन्री ला या दोन संस्थांनी आग्नेय आशियामध्ये(SA Asia) तिथल्या स्थानिक वनस्पतींचे संशोधन करायला पाठवले होते.

या संशोधनासाठी चे नमुने गोळा करायला तो या अरण्यात आला होता. तिथल्या स्थानिकांकडून त्याला या अरण्यात असणाऱ्या काही गूढ वास्तूंच्या अवशेषांबद्दल ही माहिती मिळाली होती. त्या वास्तूनाही भेट द्यावी असं हेन्री च्या मनात होतेच. त्या घनदाट अरण्यातून वाट काढताना त्याला हळूहळू अनेक भग्नावशेष दिसू लागले होते. त्याचा आधार घेऊन तो अजून पुढे जात राहिला आणि एका क्षणी त्याला आकाशाला भिडणारे पाच भव्य मनोरे दिसले. हेन्री मॉहॉट ते दृश्य पाहून खिळून राहिला. अनेक भग्न अवशेषांमध्ये ही पाच गोपुरे असणारे एक भव्य मंदिर उभे होते. भाविष्यामध्ये जगातील सर्वात मोठं मंदिर म्हणून प्रसिद्ध होणारं अंगोर वाट च मंदिर होतं.

हेन्री मॉहॉटने या जागेला भेट देण्याआधी आणि अभ्यास करण्याआधी १५०० आणि १६०० च्या दशकांमध्ये डच आणि पोर्तुगीज ख्रिस्ती मिशनऱ्यानी इथे आपली हजेरी लावली होती. पण या जागेबद्दल त्यांनी काही नोंदी ठेवल्या नाहीत. आणि या काळात युरोपमधील अभ्यासकांना हे अवशेष म्हणजे कोणत्यातरी ग्रीक किंवा रोमन मंदिरांचे भाग आहेत असे वाटत होते.

पण १८६० मध्ये हेन्री ने या मंदिराची पाहणी केली आणि त्याची निरीक्षणे नोंदवली. १८६१ मध्ये हेन्री मरण पावला. पण अजूनही त्याची ही निरीक्षणे जगासमोर आली नव्हती.

नशिबाने त्याने नोंदविलेली निरीक्षणे कोणीतरी युरोपमध्ये पाठवली. आणि नंतर ती पुस्तकरूपाने फ्रान्स मध्ये प्रसिद्ध झाली. हेन्री मॉहॉट च्या या लेखनाने अंगोर वाट च्या मंदिराचे भवितव्य कायमस्वरूपी बदलून गेले. हेन्री चे एक निरीक्षण या संदर्भात अतिशय बोलके आहे. तो लिहितो, “they are ruins of grandeur … that at the first view one is filled with profound admiration and cannot but ask what has become of powerful (people), so civilized, so enlightened the authors of this gigantic work…”

या नंतर १८६६ मध्ये रॉयल जिओग्रफिक सोसायटीचा सभासद जॉन थॉम्पसन तिथे पोचला आणि त्याने या मंदिराची ५० छायाचित्रे असणारे ‘Antiquities of Cambodia’ असे पुस्तक प्रसिद्ध केले.

जगभरामध्ये अशी विलक्षण आणि अमाप प्रसिद्धी मिळवलेले हे मंदिर इ. स. ८०० ते १३०० या काळात वैभवाच्या शिखरावर असणाऱ्या ख्मेर साम्राज्याचे प्रतीक बनले. भारताबाहेरील भारतीयांचे पाहिले राज्य असणाऱ्या कम्बुज म्हणजे कंबोडियातील हे मंदिर भारतीय संस्कृतीचा देखणा आविष्कार आहे.

इ. स. १११३ मध्ये दुसरा सूर्यवर्मा या ख्मेर साम्राज्याचा शासक झाला. या राजाने अंगोर वाट च्या विष्णू मंदिराची निर्मिती केली. अंगोर वाट म्हणजे नगर मंदिर. या मंदिराची व्याप्ती पाहता हे खरोखरीच एका नगरा एवढे मोठे आणि भव्य आहे. द्रविड शैलीतले हे मंदिर बांधायला ३० वर्षे लागली. शिल्पकारांनी आणि मंदिर स्थपतीनी ( architect) आपले सर्व कौशल्य पणाला लावून या भव्य मंदिराची निर्मिती केली. हे विष्णूचे मंदिर असल्याने याला मेरू पर्वताची उपमा दिली आहे. या मंदिराची गोपुरे हेच दर्शवतात. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या भोवती असणारे पाण्याचे खंदक सियाम रीप नदीला वळवून तयार केले आहेत.

हे मंदिर एकावर एक मजल्यांचे, ओवऱ्या आणि त्यावरील छतांचे, अनेक मुखमंडप आणि विविध पातळीवरील चौक अशा रचनांचे देखणे मंदिर आहे. मंदिराचा सगळा परिसर, मंदिराच्या भिंती या यमाचा दरबार, स्वर्ग, नरक, समुद्रमंथन, भगवान विष्णूंनी राक्षसांवर मिळवलेले विजय, रामायण आणि महभारतातील प्रसंग यांनी सुशोभित आहेत. त्याचबरोबर या मंदिरात अतिशय देखण्या, सालंकृत अशा १५०० अप्सरांची शिल्पे देखील आहेत.

कंबोडिया मधील प्राचीन मंदिरांतील अप्सरांची शिल्पे ही अतिशय सुंदर आणि आकर्षक आहेत. राजा राजेंद्रवर्माने उभे केलेले बांटे श्राय चे शिव मंदिर हे अशा मोहक अप्सरांच्या शिल्पांनी वैशिष्ठ्यपूर्ण झाले आहे.

अंकोर थोम ही सातव्या जयवर्म्याने वसवलेली राजधानी. ख्मेर साम्राज्य अस्ताला जाताना हा राजा गादीवर आला आणि यानेही सुंदर नगर आणि मंदिराचे निर्माण केले. अंगोर वाट पासून जवळच असणाऱ्या या नगरीत एक बौध्द मंदिर उभे राहिले. राजा जयवर्मा बौध्द होता. याने अतिशय प्रमाणबद्ध आणि चित्तवेधक असे अवलोकितेश्र्वर बुद्धाचे मंदिर बांधले. या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे या मंदिराचे कळस हे लोकेश्वर बुद्धाची स्मितहास्य मुखे आहेत. आणि ती कळसाच्या सर्व बाजूंनी शिल्पंकीत आहेत.

प्राचीन कंबुज देशात आधी हिंदू आणि नंतर बौध्द धर्माचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला. या दोन्ही धर्माची प्रतीके आपल्याला या देशात पाहायला मिळतात. अंगोर वाटचे विष्णू मंदिर या सर्व मंदिर स्थापत्याचा मुकुटमणी आहे.

भारताबाहेरील भारताची ही पदचिन्हे नेत्रदीपक सौंदर्याचा आणि भक्तीचा अखंड स्त्रोत आहेत!

– विनिता हिरेमठ

संदर्भ –
* प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती – डॉ. गो. ब. देगलूरकर
* मराठी विश्वकोश
* AngkorWat – unearthing ancient worlds – Alison Behnke
* Angkor Wat and cultural Ties with India – K.M. Shrivastava


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

%d bloggers like this: