डॉ. मंजुश्री गोखले यांनी मटा मध्ये ‘रामायणातील दुर्लक्षित नायिका’ म्हणून लेखमाला लिहिली. त्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याचे खंडन करणारा हा लेख. त्यांच्या लेखातील सर्व मुद्दे येथे घेतले नाहीत, थोडे घेतले आहेत.
डॉ. गोखले लिहितात – “शुर्पणखा ही दंडकारण्याची स्वामिनी होती. दंडकारण्य रावणाच्या मालकीचे होते.रावणाच्या राज्यात होते.”
“स्वामिनी” म्हणजे काय? “स्वामी”चे कर्तव्य काय? कुणाला राजा म्हणायचे? तर, वाल्मिकी रामायणातच चित्रकुट येथे भेटायला आलेल्या भरताला राम विचारतो – राज्यातील जनतेचे रक्षण करणे हा राजधर्म आहे. तू प्रजेचे रक्षण करत आहेस न? राज्यातील स्त्रियांना सुरक्षा देत आहेस न? तुझ्या राज्यातील कृषी करणारे, पशुपालन करणारे, वेदाभ्यास करणारे आणि प्राण्यांचे सुद्धा रक्षण तू करत आहेस न?
“स्वामिनी” म्हणून हीच कर्तव्य ओघाने शुर्पणखेकडे येतात. यातील कोणते कर्तव्य शूर्पणखा पार पाडले ते पुढे पाहू.
डॉ गोखले लिहितात – “राम-लक्ष्मण दंडकारण्यात रावणाची परवानगी न घेता आले. शुर्पणखेला सुद्धा त्यांनी परवानगी विचारली नाही.”
“परवानगी न घेता” म्हणजे? रावणाने दंडकारण्याला लंकेप्रमाणे तटबंदी केली होती का? की प्रत्येक द्वारावर त्याने आत जाण्याचे परवाने देण्यासाठी सुविधा केंद्र उघडले होते?
आपल्या राज्यातून घालवून दिला गेलेला राम एक आश्रित म्हणून, एक refugee म्हणून दंडकारण्यात आला होता. तिथे राहणाऱ्या ऋषींनी रामाला विनंती केली की येथील नरभक्षक राक्षसांपासून आमचे संरक्षण कर. शूर्पणखा तेथील ‘स्वामिनी’ असून सुद्धा त्या ऋषीमुनींना रामाकडे का धाव घ्यावी लागली? शूर्पणखा जर स्वामिनी होती, तर तिने तिच्या वनात ऋषी सुरक्षित का नव्हते? आपल्या वनात आलेल्या तीन लोकांना तिने आश्रय का दिला नाही? तिच्याकडे दोन सेनापती बंधू होते, त्यांचे मोठे सैन्य होते, असे असतांना तिने या पर्णकुटीत राहणाऱ्या तीन मामुली लोकांना “मी तुमचे रक्षण करीन तुम्ही तुमचा वनवास संपेपर्यंत खुशाल इथे रहा!” असे आश्वासन का दिले नाही? [वर दिलेली स्वामीची कर्तव्ये पहाणे.]
उलट तिने या निराधार लोकांच्या असहाय्यतेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. तिने आधी रामाला आणि त्याने नाही म्हटल्यावर मग लक्ष्मणाला लग्नाची मागणी घातली. दोघांनी नकार दिल्यावर ती सीतेच्या जीवावर उठली तेंव्हा लक्ष्मणाने तिचे नाक-कान कापले. तिला नकार पचवता आला नाही म्हणून खर व दूषणला सैन्यासह तिने रामावर हल्ला करण्यास पाठवले. हेच जर एखाद्या पुरुषाने स्त्रीला केले असते तर डॉ. गोखलेंनी निराधार अबलेवर हल्ला करणाऱ्या व एका स्त्रीचा नकार पचवू न शकणाऱ्या पुरुषाची बाजू घेतली असती का? नकार देण्याचा अधिकार फक्त स्त्रीला असतो का? पुरुषाला नकाराधिकार नाही का?
डॉ. गोखले म्हणतात – “रावणासारखा बंधू नाही. प्रत्येक स्त्रीला आपल्याला रावणासारखा भाऊ असावा असे वाटते. रावण हा बहिणींसाठी आदर्श बंधू होता.”
रावणासारखा भाऊ हवा असेल तर शूर्पणखेसारखी बहिण होण्याची तयारी आहे का? वाल्मिकी रामायणातून कळते ती शूर्पणखा अशी आहे – सुपासारखी नखे असलेली, ढेरपोटी व बेडकासारखे वटारलेले डोळे असलेली. तिला आपले प्रेम धड कुणावर आहे ते कळत नाही. क्षणात रामावर तर क्षणात लक्ष्मणावर ती भाळते. तिला कोणीही नवरा म्हणून चालणार आहे. रामाचा नकार पचवू न शकल्याने ती सीतेला खायला निघते. लक्ष्मणाला सुद्धा खाऊन टाकीन म्हणते. अशी ती नरभक्षक राक्षसी आहे. रामाने लग्नाला नकार दिल्यावर ती आपल्या बंधूंना सैन्य घेऊन त्याच्यावर हल्ला करण्यास सांगते. ते प्रयत्न निष्फळ झाल्यावर ती रावणाकडे जाऊन तक्रार सांगते. पण रावणाला काही तिचे नाक-कान कापल्याचा सूड घ्यावा असे वाटत नाही. तेंव्हा ती रावणाला सांगते –“अरे, त्या रामाची बायको फार सुंदर आहे. जा तिला बळजबरीने पळवून आण. तिच्याशी तिची इच्छा असो नसो, लग्न कर.”
जी स्त्री आपल्या भावाला दुष्कर्म करायला सांगते, जी स्त्री दुसऱ्या स्त्रीवर अन्याय घडवून आणते, जी स्त्री नकार देणाऱ्या पुरुषाला जीवे मारायला उठते, जी स्त्री भावाच्या नाशाला कारण होते, जी स्त्री राज्याच्या नाशास कारण होते, जी स्त्री क्षणात एकाशी तर क्षणात दुसऱ्याशी लगट करू शकते … अशाच स्त्रीला रावण हा भाऊ म्हणून शोभतो. जर कुणाला रावणासारखा भाऊ असावा असे वाटत असेल, तर आधी शुर्पणखेसारखे व्हावे लागेल. शेजारणीने तिच्या ‘रावणासारख्या’ भावाकडे तुमच्या नवऱ्याची काही खरी-खोटी तक्रार केली, तर त्याचा बदला म्हणून त्याने जर तुम्हाला त्रास दिला तर चालणार आहे का? शेजारणीच्या रावणासारख्या भावाचे कौतुक कराल का?
आणि एक लक्षात घ्यायला हवे, रावणाने सीतेला पळवले ते शुर्पणखेला दिलेल्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी नव्हे. तर केवळ स्वत:ला सुंदर बायको मिळवण्यासाठी.
आणखी एक महत्वाचा मुद्दा असा – रावणाने शूर्पणखेच्या नवऱ्याला विद्युत जिह्वाला मारले होते. दंडकारण्यात विनाकारण फिरणारी, परपुरुषावर आसक्त होणारी, दुसऱ्या स्त्रीचा नवरा बळजबरीने घेऊ पाहणारी शूर्पणखा – नवऱ्याला मारल्यामुळे असे वागत होती का? खरच का रावण फार चांगला बंधू होता? बहिणीची काळजी वाहणारा?
बंधू म्हणून तो भावांशी कसे वागला हे देखील पाहण्यासारखे आहे – मोठ्या भावाकडून त्याने लंकेचे राज्य काबीज केले व त्याला लंकेतून घालवून टाकले. धाकट्या भावाला विभिषणाला राज्यातून हकलून लावले. आणि तिसऱ्या भावाला, कुंभकर्णाला मृत्युच्या खाईत लोटले. एकूण तो ना बहिणीचा ना भावांचा “आदर्श बंधू” शोभला.
डॉ. गोखले पुढे लिहितात – “लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान विश्रावाने रावणाला दिले.”
हे त्या कशाच्या आधारावर लिहितात काही कळत नाही. कारण स्वत: रावण मोठ्या प्रौढीने सीतेला सांगतो –
मत् भय आर्तः परित्यज्य स्वम् अधिष्ठानम् ऋद्धिमत् |
कैलासम् पर्वत श्रेष्ठम् अध्यास्ते नर वाहनः || ३-४८-५
मी माझ्या मोठ्या भावाला सळो की पळो करून सोडले. त्याच्या कडून लंका जिंकून घेतली. त्याचे पुष्पक विमान बळकावले. मला घाबरून तो कैलासात पळून गेला. असे पराक्रम करणारा मी शक्तिशाली दशानन आहे!
एकीकडे रामाने स्वत:ला मिळालेले राज्य धाकट्या भावाला सहज देऊन टाकले. तर दुसरीकडे रावणाने मोठ्या भावाचे राज्य त्याच्याकडून ओरबाडून घेतले. पण तरीही रावण “चांगला भाऊ” होता हे कसे काय लिहू शकतात?
डॉ गोखले म्हणतात – “वाल्मिकींनी उर्मिलेकडे दुर्लक्ष केले. लक्षमणाने तिला आपल्या सोबत अरण्यात का नेले नाही? किंवा लक्ष्मणाने रामाबरोबर वनवासात न जाता, उर्मिलेबरोबर अयोध्येत राहून तिला पतीसेवेची संधी का दिली नाही?”
एक नक्की ठरवले पाहिजे – वाल्मिकींना दोष द्यायचा आहे की लक्ष्मणाला? वाल्मिकींना दोष दिला तर लक्ष्मण ही त्यांनी तयार केलेली व्यक्तिरेखा आहे. ती व्यक्तीरेखा लेखक चालवेल तशी चालणार. आणि लक्ष्मण जर स्वत:च्या मर्जीने वागत असेल, तर तिथे वाल्मिकींना दोष देता येणार नाही, कारण त्यांनी जे घडलंय ते लिहिले आहे. एकाच वेळी दोघांना दोष देता येत नाही.
दुसरी गोष्ट अशी, की सीता हट्टाने रामाच्या मागोमाग वनवासात गेली. उर्मिलेने तसे केले नाही. तिने जर वनवासातील त्रासापेक्षा राजगृहातील सुख तिने निवडले असेल तर? देऊ की तिला पण सुखाने राजवाड्यात राहण्याचे स्वातंत्र्य!
डॉ. गोखले लिहितात -“रामकथा ही केवळ रामाची कथा आहे. सीतेची कथा नाही.”
रामायणातील बालकांडात वाल्मिकी म्हणतात –
काव्यं रामायणं कृत्स्न्नं सीतायाश्चरितं महत् | पौलस्त्यवधमित्येवं चकार चरितव्रतः || १-४-७
या काव्याचे नाव – रामायण किंवा सीताचरीत्र किंवा रावणवध असे आहे.
अर्थात रामायण ही कथा जितकी रामाची आहे तितकीच ती सीतेची पण कथा आहे असे वाल्मिकी स्वत: म्हणत असतांना डॉ. गोखलेंच्या मताला काय अर्थ आहे?
डॉ गोखले म्हणतात – उर्मिला, शूर्पणखा वगैरे दुर्लक्षित नायिका आहेत.
रामाच्या आणि सीतेच्या कथेत प्रत्येक पात्र कसे काय तितक्याच महत्वाचे असेल? राम-सीतेच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या, त्या घटनांमध्ये ज्या व्यक्ती आल्या त्यांचाच आणि तितकाच उल्लेख रामायणात येणार. उर्मिलेची भूमिका जर छोटी असेल, तर तिचा उल्लेख तितकाच येणार. हे म्हणजे कोणत्याही चित्रपटात सगळेच नायक व नायिका असाव्यात, चरित्र अभिनेते असूच नयेत असे म्हणण्यासारखे आहे.
दुसऱ्या एका लेखात डॉ गोखले लिहितात – “रामाला पराक्रमी दाखवण्यासाठी राक्षसवध आले. देखणं दाखवण्यासाठी स्वयंवर आले. नायक दाखवण्यासाठी खलनायक हवा म्हणून रावण आला. रावणाशी संबध यायला हवा म्हणून त्याच्याकडून सीताहरण करवले…”
उद्या सिंड्रेलाची गोष्ट वाचून – “सिंड्रेला दु:खी दाखवायची म्हणून तिला त्रास देणारी, तिचा छळ करणारी सावत्र आई आली. तो त्रास कमी पडेल म्हणून एक सोडून दोन सावत्र बहिणी आल्या. सिंड्रेला मनाने चांगली होती हे दाखवण्यासाठी या बहिणी दुष्ट दाखवल्या.” असे म्हणण्यापैकी झाले.
डॉ गोखलेंच्या मते सगळंच जर ‘दाखवण्यासाठी’ असेल तर रामायण ही ‘कथा’ आहे असे म्हणा आणि सिंड्रेलाची गोष्ट वाचता तशी रामाची गोष्ट वाचून सोडून द्या! आणि ‘कथा’ नाही असे म्हणायचे असेल तर, रामाचे अस्तित्व मान्य करा. मग पुढे बोलता येईल.
एकीकडे रामाचे अस्तिव मानायचे नाही, पण दुसरीकडे रावणाचे अस्तित्व निश्चित मानायचे. एकीकडे रामाने बांधलेला सेतू खोटा म्हणायचा. पण रामाने केलेले ‘अन्याय’ मात्र अगदी शतप्रतिशत खरे होते हे ठसवायचं. एकीकडे राम देव-माणूस नव्हता हे ठामपणे सांगायचे, पण रावण मात्र वनवासींचा देव होता ही भावना रुजवायची. अशा विसंगती सध्याचे ‘विचारवंत’ निर्माण करत आहेत. या ‘विचारवंतांना’ रावणासारखे परस्त्रीयांना पळवून आणणारे पुरुष समाजात घडवायचे आहेत की शूर्पणखेसारख्या परपुरुषांवर भाळणाऱ्या स्त्रिया तयार करायच्या आहेत? असो. ही लेखमाला त्याच प्रकारातील असून त्याचा सत्याशी संबंध नसून केवळ मिथ्यावर्णन केले आहे.