शोधयात्रा भारताची #२९ – पाऊलखुणा

जीवकाला आज गुरू आत्रेयांनी तक्षशिला विद्यापीठापासून काही अंतरावर असणाऱ्या अरण्यात पाठवलं होतं. गुरुजींची आज्ञा होती की त्या अरण्यातून अशा वनस्पती आणायच्या की ज्यांचा वैद्यकशास्त्र आणि त्यातील उपचारांसाठी काहीही उपयोग होणार नाही. त्याप्रमाणे जीवक अशा निरुपयोगी वनस्पती आणण्यासाठी त्या अरण्यात शिरला. दिवसभर प्रयत्न करूनही गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्याला एकही वनस्पती दिसेना. गुरूंची आज्ञा पूर्ण करता आली नाही म्हणून जीवक स्वतः वरच नाराज झाला होता. गुरू आत्रेयांकडे जाऊन त्याने अतिशय निराशेने अशी कोणतीही निरुपयोगी वनस्पती मिळाली नसल्याचे सांगितले. आता गुरुजींच्या रागाला सामोरे जावे लागणार याबद्दल त्याच्या मनात जरासुद्धा शंका नव्हती. पण त्याने हे सांगितल्यावर घडले ते काही वेगळेच! हा वृत्तांत ऐकुन गुरू आत्रेय जीवकाला घेऊन सर्व स्नातकांसमोर गेले आणि त्यांनी जीवकाला वैद्यक शाखेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून घोषित केले. अरण्यात एकही निरुपयोगी वनस्पती शोधता आली नाही याचा अर्थ जीवकाला प्रत्येक वनस्पतींचे ज्ञान होते. वैद्यक अभ्यासातल्या इतर गोष्टींबरोबरच जीवक यातही अव्वल ठरला होता. आता जीवक वैद्यक शास्त्रातील उपचारांचा सर्वोत्कृष्ट स्नातक बनला होता. हाच जीवक पुढे गौतम बुद्धाचा वैद्यक चिकित्सक म्हणून प्रसिद्ध झाला.

बौद्ध ग्रंथ विनय पिटकामध्ये जीवकाची ही कथा आलेली आहे. जीवका प्रमाणेच इतरही शाखांचे शिक्षण घेणारे अनेक बुद्धीमंत या तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी होते. व्याकरणकर्ता पाणिनीही याच विद्यपीठाचा विद्यार्थी होता.

इ.स. पूर्व आठव्या शतकापासून ते इसवी सनाच्या चौथ्या शतकापर्यंत हे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ अव्याहतपणे हजार बाराशे वर्ष ज्ञानदान करीत होते. पाकिस्तानातील रावळपिंडी पासून सुमारे २५ किमी वर असणारे हे प्राचीन वारसा स्थळ आता केवळ काही अवशेषांच्या रुपात उरले आहे.

पश्चिम आशिया आणि प्राचीन भारतीय भूमीच्या मध्ये असणाऱ्या अफगाणिस्तानचे भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रदेशात पश्चिम आशियाई आणि प्राचीन भारतीय संस्कृतीच्या खुणा आजही दिसतात. पण त्या सर्व खुणा विखारी आणि आक्रमक धर्मांध हल्ल्यांमध्ये उध्वस्त झाल्या आहेत. गतकाळी मिरवलेले वैभव जाऊन आता तिथे फक्त हताशा आहे. पण या प्रदेशाचा प्राचीन इतिहास काही वेगळेच सांगतो.

सम्राट अशोकाने आपला राज्यविस्तार भारताच्या चहू बाजूस केला होता. संपूर्ण भारतात आढळणाऱ्या शिलालेखां मधून सम्राट अशोकाचे वर्चस्व आणि उत्तम राज्यकारभाराचे उल्लेख दिसतात. त्यातील एक शिलालेख दक्षिण अफगाणिस्तान मध्ये शेरे- कुना या गावी आहेत. सर्व पृथ्वीवर शांती आणि प्रीती नांदावी अशी इच्छा अशोकाने या शिलालेखातून व्यक्त केली आहे. आताच्या उध्वस्त अफगाणिस्तान मध्ये अशा सदिच्छेचा पुरावा असणे हा एक विरोधाभास आहे.

अशोकाच्या विजय यात्रेबरोबर अफगाणिस्तानात ही बौद्ध धर्माचा प्रसार झाला. इसवी सनाच्या पाचव्या शतकात बौद्ध धर्म अफगाणिस्तानात पूर्णपणे स्थिरावला होता. चीनमधील प्रवासी आणि बौद्ध भिक्षू फा – हि – यान आणि हुआन श्र्वांग यांच्या वर्णनातील बामियान शहर हे बौद्ध तत्वज्ञानाचे आणि बाजारपेठेचे मोठे केंद्र असल्याचे उल्लेख येतात.इथल्या सुमारे १७५ फूट आणि १२० फूट इतक्या उंचीच्या डोंगर रांगांमध्ये घडवलेल्या बुद्ध मूर्ती आत्तापर्यंत जगाला शांती आणि प्रीतीचा संदेश देत होत्या. या संदेशास तालिबानने शब्दशः सुरुंग लावला आणि प्राचीन संपन्नतेचा अजून एक ठेवा धर्मांधतेला बळी पडला.

परंतु, अशोकाच्या विजय यात्रेआधीही भारतीय संस्कृतीची ओळख या प्रदेशाला होती. ऋग्वेदामध्ये कुभा, सुवस्तू, कृमु आणि गोमती या नद्यांचे उल्लेख येतात. या नद्या आता काबूल, स्वात, कुर्रम आणि गोमल म्हणून ओळखल्या जातात.

कपिसा हे अफगाणिस्तानमधील प्राचीन शहर. याचा उल्लेख पाणिनी ने आपल्या ग्रंथात केला आहे. कपिसा मधील द्राक्षे आणि ( कपिसायनी ) आणि त्यापासून तयार केलेले मद्य ( कपिसायनी मधु ) हे या कालखंडात प्रसिद्ध होते. पुढे कौटिल्याने ही याचा उल्लेख अर्थशास्त्राच्या ग्रंथात केला आहे.

इ. सनाच्या आठव्या नवव्या शतकापर्यंत या प्रदेशात बौद्ध आणि हिंदू धर्माचे उल्लेखनीय अस्तित्व होते. इ. स. ८५०-१०२६ या कालखंडात या प्रदेशात हिंदू राज्ये प्रबळ होती. काबूल ( ईशान्य अफगाणिस्तान – NE Afganistan) आणि गांधार ( आता पाकिस्तान ) या ठिकाणची हिंदू राज्ये हिंदू शाही या नावाने प्रसिद्ध होती. पण नंतरच्या सततच्या मुस्लिम, तुर्की आक्रमणाने ही राज्ये लोप पावली.

आज आपल्याला या प्रदेशात जाणवते ती शांतता जी केवळ अनिश्चित आणि भयावह आहे. पण या धार्मिक उन्मादामध्ये विस्मृतीत गेलेली भारतीय संस्कृती आजही अनेक अवशेषांमध्ये दिसते. या अवशेषांना आता प्रतीक्षा आहे ती एका परीस स्पर्शाची आणि रामप्रहराची !!

– विनिता हिरेमठ

संदर्भ
* मराठी विश्वकोश
* पुराभिलेखविद्या – डॉ. शोभना गोखले
* Ancient Indian culture in Afghanistan – Dr. Upendranath Ghoshal
* globalbuddhistdoor.com
* ArcGIS.com


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

%d bloggers like this: