शोधयात्रा भारताची #३० – प्रवाहो चालला …

स्थळ: अल्तामिरा गुहा समूह. कँटेब्रिया प्रदेश, स्पेन
महत्व: या गुहांमध्ये असणारी सुमारे २०००० वर्षांपूर्वीची भित्तीचित्रे ( cave wall paintings )

स्थळ: लास्को गुहा फ्रान्स
महत्व: या गुहांमध्ये असणारी सुमारे १७००० वर्षांपूर्वीची भित्तीचित्रे
अल्तमिरा आणि लास्को इथे मिळालेल्या या कलेला फ्रँको कँटेब्रियन आर्ट असे म्हणतात.

स्थळ: भीम बेटका मध्य प्रदेश भारत
महत्व: या गुहांमध्ये असणारी सुमारे ३०००० वर्षांपूर्वीची भित्तीचित्रे.

या तिन्ही स्थळांमध्ये असणारे साम्य म्हणजे मानवी कलेचा हा आविष्कार अश्मयुगीन आहे. आणि या कालखंडात जगाच्या अनेक भागांमध्ये मानवी अस्तित्व होते. आणि काळ जसा पुढे सरकत होता तसे ते अधिक ठळक आणि प्रभावशाली बनत होते. या कालखंडात असणारी मानवाची भटकी अवस्था संपवली ती धरतीच्या उदरातून रसरसून बाहेर येणाऱ्या अन्न धान्याच्या तृणपात्यानी! आणि सुरू झाला माणसाच्या स्थैर्याचा, विकासाचा आणि प्रगतीचा अविरत प्रवास!

मानवी विकासाच्या या स्थित्यंतरानी जगभरातील विविध प्रदेशात संस्कृतीचे एक लोभस रूप घेतले आणि मानवाची भौतिक आणि अध्यात्मिक उन्नती होऊ लागली. प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे यांच्या मते ” मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरुप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी पण आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय.”

व्यक्तींमध्ये संस्कृती साकारते, जिवंत होते. नव्याने निर्माण होते. लय पावते पण कोणतीही व्यक्ती संस्कृतीचे रूप पूर्णपणे दाखवू शकत नाही.

निसर्गावर विजय मिळवण्याचा क्रम म्हणजे संस्कृती होय. मूर्ती घडवणे हा संस्कृतीचाच एक भाग आहे. दगडाचे रूपांतर एका बांधेसूद सौष्ठवपूर्ण आकारात करणे हा संस्कृतीचा भौतिक भाग झाला तर त्या आकाराला, सगुण साकार रूपाला पुजणे, त्याची आराधना करणे आणि मानवी आयुष्यात त्या आकाराला, मूर्तीला श्रद्धेय बनवणे हा ही संस्कृतीचाच एक भाग आहे जो भावनिक पातळीवर आहे, भक्तीच्या पायावर आधारित आहे, पण तो दिसू शकत नाही. केवळ जाणवतो, अनुभवता येतो! हा संस्कृतीचा अध्यात्मिक पैलू आहे. भौतिक आणि अध्यात्मिक अशा दोन्ही घटकांमधून संस्कृती आकार घेते. आणि त्या आकारास अधिकाधिक दैवी आणि ऐश्वर्य संपन्न बनवण्याचे काम समाज करत असतो. संस्कृतीची वाटचाल वैयक्तिक पातळीवर होत असली तरीही तिला समृद्ध करण्याचे काम एकट्या दुकट्याचे नव्हे. त्यासाठी सामूहिक आणि संघटित प्रयत्न (collective efforts) हवेतच.

कोणत्याही संस्कृतीची प्रगती ही कायमच होत असते असे नाही, तर एका क्षणी ही प्रगतीची प्रक्रिया थांबते आणि ती संस्कृती लयाला जाते. सुमेरियन, इजिप्शियन, बॅबिलोनियन, ग्रीक, रोमन या संस्कृती विनाशाला गेल्याची इतिहास साक्ष देतो. संस्कृतीच्या उगमापासूनच्या प्रवासात जी संस्कृती स्वतः मधले आणि परिस्थिती मधले बदल स्वीकारत मार्गक्रमण करत राहते ती सतत उन्नत होणारी संस्कृती!

भारतीय संस्कृतीने असे बदल स्वीकारले आहेत. आणि म्हणूनच प्राचीन वेद साहित्य आजही अभ्यासले जाते. आजही उपनिषदे तत्वज्ञानाचे उद्गाते म्हणून नावाजली जातात. नवरसानी शृंगरलेल्या महाकवि कालिदासाचे ग्रंथ अभिजात साहित्यात अग्रस्थानी आहेत. हजार वर्षांपूर्वीची, देखण्या स्थापत्याने आणि अजोड मूर्तीकलेने सजलेली मंदिरे, गोपुरे भारतीय संस्कृतीचे अद्भुत मानदंड आहेत. या सर्व बीजरूप संपदेतून भारतीय संस्कृती विस्तारली. प्रांतोप्रांतीच्या अनेक प्रथा परंपरांचे, श्रद्धेचे, जीवन पद्धतीचे अनेक प्रवाह बनले. आणि ते प्रवाह पुन्हा भारतीयत्वाच्या एका समान धारेत मिसळून एकरूप झाले!

तरीही काळाचा प्रवाह पुढे जातोच आहे…. काल अनादि आहे.. काल अनंत आहे…!

*( समाप्त )*

– विनिता हिरेमठ

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s