भाषा – मराठी
लेखक – दीपाली पाटवदकर
पृष्ठ – ८०
किंमत – १००/-
Click To Order |
घर – अंगण ही एका गृहिणीची डायरी आहे. घरात आणि अंगणात रमणाऱ्या कोणत्याही मराठी गृहिणीचे अनुभव. अगदी नित्याचे, साधेसुधे प्रसंग. घर आवराण्या पासून ते मुलांच्या डब्यांपर्यंत आणि मनीप्लांट लावण्यापासून ते वडाचे झाड लावण्यापर्यंत आलेले घरातले आणि अंगणातले विविध अनुभव. या पुस्तकातील एका कथेचा काही भाग – नवरा फ्रीज उघडतो
“अग, ही बघ १८५७ मधली भाजी राहिलीये ह्या वाटीत!”, नरेन. फ्रीज मध्ये डोकं असल्याने त्याचा आवाज घुमतो.
“नाही का त्या रात्री, अचानक मित्रांनी तुला पार्टीला नेले? अगदी तुझी इच्छा नसतांना, तुला ओढून नेले. आणि तू पण डायट म्हणून फक्त सूप आणि सलाड खाल्लेस? त्याच रात्रीचा हा उर्वरित भाग आहे!”, मी.
ध्यानीमनी नसतांना एखाद्या सकाळी उठून, काहीही कारण नसतांना नवरे लोक फ्रीज का उघडतात, ते देवच जाणे!
“अग, हे वाटीभर वरण, आणि ही परवाची मेथीची भाजी आहे. ती टाकून देतो.” माझ्या आधीच्या कुत्सित बोलण्याकडे अजिबात लक्ष न देता स्वारी आपल्या ध्येयाकडे अविचलपणे वाटचाल करत असते. आज फ्रीज स्वच्छ करायचा त्याने चंगच बांधला असतो.
उरलेले मुगाचे वरण आणि मेथी घालून पराठे करायचा माझा नाश्त्याचा बेत रसातळाला जातांना मी हताशपणे पाहते. असे पराठे नाहीतर थालीपीठ म्हणजे (कुणाच्याही लक्षात न येता) शिळे संपवायचा हमखास उपाय. पण तो बेत सांगितला तर माझ्या खुसखुशीत पराठ्याचे गुपित कळेल, आणि मग कधीही पराठा खातांना “आपण शिळे अन्न खात आहोत” असे वाटत राहील. म्हणून मी मुग न गिळता गप्प बसते.
“आणि हे बघ हा expire झालेला सोया सॉस. हा पण फेकून देतो.” नरेनची ध्येयाकडे घोडदौड चालू असते….
या आणि अशा अनेक अनुभवांचा संग्रह … घर-अंगण