ऋग्वेदाने सरस्वती नदीची स्तुती ठिकठिकाणी केली आहे. सरस्वतीला सर्वोत्तम देवी, सर्वोत्तम नदी व सर्वोत्तम आई म्हटले आहे [ऋग्वेद २.४१.१६]. हिमालयापासून समुद्रापर्यंत गर्जना करत अखंड वाहणारी, वेगवान लहरींनी वाटेतील पर्वतांचा चुरा करणारी नदी अशी तिची स्तुती केली आहे [ऋग्वेद ६.६१]. ती जीवन देणारी नदी आहे. सुपीक भूमी व त्याद्वारे अन्न देऊन पोषण करणारी माता आहे. आणि ज्ञान देणारी देवी आहे! ती आवाज करत वाहणारी शब्दाची देवता आहे. पाणी जसे नदीतून वाहते तसे ज्ञान शब्दातून, भाषेतून वाहते! पाणी जसे वरून खाली वाहते तसे गुरुमुखातून शिष्याच्या हृदयाकडे वाहणारा ज्ञानाचा प्रवाह म्हणजे सरस्वती आहे. सरस्वती देवी शब्दाची जननी आहे! ती भाषेत वसते! गायनातून प्रकटते! वादनातून व्यक्त होते! आणि अक्षर रूपाने अमरत्व पावते!
ऋग्वेदात, मैत्रावरुणिर्वसिष्ठ ऋषी सरस्वतीची स्तुती करतांना म्हणतात –
हे शुभ्रवर्णा सरस्वती, तू आम्हाला दोन्ही प्रकारचे (लौकिक आणि पारलौकिक) अन्न प्रदान करणारी आहेस. हे कल्याणी, आम्ही तुझी प्रशंसा करतो तुझ्या स्तुतीचे गीत गातो! समुद्र, मेघ व ज्ञानी हे तिघे सरस्वान् होत! सरस्वती नदीचे पाणी समुद्राला मिळते म्हणून समुद्र सरस्वान् आहे. सरस्वतीचे पाणी शोषून मेघ तयार होतो, म्हणून मेघ सरस्वान् आहे! तसेच विद्येची नदी ज्याच्या हृदयसागरात येऊन मिळते तो महाज्ञानी मनुष्य पण सरस्वान् होय! अशा सरस्वानला ज्ञानामृताचा पाझर फुटो! सरस्वान् आम्हावर अमृतजलाचा वर्षाव करो! ज्ञानाचा पान्हा पिऊन आम्ही धुष्टपुष्ट होऊ! [१]
ऋग्वेद ७.९६
सरस्वती ही भाषेची देवी. शब्दांची देवी. तिचा प्रवास भाषेतून युरोप पर्यंत पोचला. सरस्वती ही वाक् देवता (वाग्देवता) आहे. ‘वाक्’ या शब्दातून आलेले आपल्या माहितीतले शब्द आहेत – वाक्य, वाक्पटू, वक्ता, अनुवाक, चार्वाक, एकवाक्यता इत्यादी. तसेच ‘वाक्’ या शब्दातून आलेले युरोपियन भाषेतील शब्द आहेत – vocal (English), voice (English), vowel (English), voix (French), vocem (Latin), आवाझ (Persian) इत्यादी. इंग्लिश मध्ये Vowel म्हणजे स्वरतंतू (vocal chord) मधून काढता येणारे आवाज – a, e, i, o, u हे वोवेल आहेत. वोवेल हा शब्द वाक् मधून उगम पावला आहे. इंग्लिश मधील advocate हा शब्द पहा. याचा उगम पण ‘वाक्’ मध्ये आहे. जो दुसऱ्यासाठी बोलतो, जो दुसऱ्याची वाचा होतो, तो अड्व्होकेट. किंवा vouch हा शब्द ‘दुसऱ्यासाठी वचन देणारा’ या अर्थाने येतो. किंवा पदवीदानाच्या समारंभाला convocation म्हटले जाते. याचा अर्थ आहे academic assembly, एकत्र (con) येण्यासाठी दिलेली हाक (voko / वाक्). [२]
सरस्वती ही गायनाची, स्वरांची व वादनाची पण देवी आहे. ‘स्वर’ हे गायनात तर आहेतच तसेच वर्णमालेत सुद्धा आहेत. ‘गायन’ साठी संस्कृत शब्द आहे ‘स्वन्’. ‘स्वन्’चा अर्थ होतो गायन करणे, गाणे म्हणणे, गुणगुणणे. यावरून आलेले इंग्लिश शब्द आहेत – sing, song, singer, sonnet, sonate इत्यादी. सरस्वतीचे वाहन असलेल्या हंसाला इंग्लिश मध्ये Swan म्हटले जाते. त्या Swan चा अर्थ आहे ‘गाणे गाणारा (पक्षी)’. Swan या शब्दाचा उगम ‘स्वन्’ मध्ये आहे. जसा हा गाण्यात येतो, तसाच हा स्वन् इंग्रजी वर्णमालेत पण येतो! इंग्लिश मधील consonant (वर्णमालेतील व्यंजन) या शब्दाचा अर्थ आहे स्वराच्या (sound) बरोबर (co) काढलेला आवाज. [२]
स्वरात्मिका वाग्देवी आज voice, vocal, vowel, consonant आणि song या अशा अनेक इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन, डच, फार्सी शब्दात सुद्धा नांदते.
सरस्वती ही स्वरांची देवी असल्याने तिच्या हातात वीणा असते, वाचेची देवी असल्याने हातात अक्षमाला असते, विद्येची देवी असल्याने हातात पुस्तक व नदीची देवी असल्याने हातात शुद्ध पाण्याने भरलेला कमंडलू दाखवला जातो. सरस्वती नदीत हंस असल्याने या देवीचे वाहन हंस आहे. जो कवी असतो अर्थात जो ज्ञानी असतो तो सरस्वतीचा वाहक होतो, अशा महाज्ञानीला ‘परमहंस’ म्हटले जाते. या कलांच्या व विद्येच्या देवतेने अखिल विश्वाला मोहिनी नाही घातली तरच नवल.
हॉलंड येथील एक डच कलाकार आहेत पीटर वेल्तेवेर्डे (Pieter Weltevrede) यांनी अनेक वेळा भारताची वारी केली आहे. कुंभमेळा व बनारस मध्ये अनेक साधुसंतांची भेट घेतली आहे. त्यांनी त्यांच्या अध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने सरस्वती देवीची अनेक सुंदर चित्रे रेखाटली आहेत [३]. त्यातील ही काही चित्रे –

५व्या शतकात भारतातून जपान मध्ये पोचलेल्या बौद्ध मुनींनी अनेक हिंदू देवता त्यांच्या बरोबर जपानला नेल्या. त्या मध्ये – ब्रह्म, अग्नी, वायू, सूर्य, चित्रगुप्त, इंद्र अशा कैक देवता आहेत. त्या मध्ये एक आहे सरस्वती. सरस्वती या लोकप्रिय देवीचे तेथील नाव आहे बेंझाईतेन. बेंझाईतेन ही विद्येची, पाण्याची आणि शिक्षणाची देवता! तिच्या हातात बिवा नावाचे विणेसारखे दिसणारे तंतुवाद्य असते. या जपान मधील सरस्वतीच्या लोभासवण्या मूर्ती आहेत –

सरस्वतीची उपासना इंडोनेशिया तसेच कंबोडिया, थैलंड, म्यानमार व तिबेट मध्ये पण केली जाते. इंडोनेशिया मध्ये वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरस्वती पूजन केले जाते. शाळेतून, महाविद्यालातून सरस्वतीची पूजा केली जाते. अमेरिकेचे पूर्व अध्यक्ष बराक ओबामा लहानपणी इंडोनेशियाच्या शाळेत शिकले होते. इंडोनेशिया मध्ये शिकलेला हा मुलगा जेंव्हा अमेरिकेचा अध्यक्ष झाला, तेंव्हा इंडोनेशियाने एक सरस्वतीची मूर्ती त्यांना भेट दिली. ही मूर्ती वॉशिंग्टन मध्ये इंडोनेशियाच्या दूतावासाच्या समोर उभी केली आहे. सोनेरी नक्षीकाम असलेली ही शुभ्र मूर्ती १६ फुट उंच आहे. हंसवाहिनी सरस्वती देवी कमळात उभी असून तीन विद्यार्थी तिच्या पायाशी बसून अभ्यास करत आहेत. त्यामध्ये एक मुलगा आहे – बराक ओबामा. वंशाने आफ्रिकन, कर्माने अमेरिकेचे अध्यक्ष आणि धर्माने ख्रिश्चन. एका मुस्लिम धर्मीय देशाच्या सरकारने, ख्रिश्चन धर्मीय देशाच्या अध्यक्षांना दिलेले सन्मानचिन्ह आहे – विश्वाला मोहून टाकणारी विद्येची, ज्ञानाची, वाचेची, संगीताची देवी सरस्वती! [४]

संदर्भ –
- ऋग्वेद का सुबोध भाष्य – पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर
- Wiktionary, the free dictionary, https://en.wiktionary.org
- पीटर वेल्टेवर्ड – www.sanatansociety.com
- Goddess Saraswati Statue With Barack Obama Symbolizes Relationship Between Indonesia and the U.S. – Mike Ghouse, Huffpost, June 2013