भाषा – मराठी
लेखक – दीपाली पाटवदकर
प्रकाशक – विवेकानंद केंद्र मराठी विभाग
पृष्ठ – १२०, रंगीत
किंमत – ₹ २००/-
Click To Order |
रामकथामाला या पुस्तकातून देशोदेशीच्या रामकथेची ओळख होते. भारतीय संस्कृतीची शिकवण देणारी रामकथा केवळ भारतातच नाही तर बाहेरील अनेक देशात पूज्य आहे. कोणी म्हणेल या कथेतला मर्यादापुरुषोत्तम राम हा आमच्या देशाचा नायक आहे! तर कोणी सांगेल श्रीरामाचे शब्द आमच्या देशाचे ब्रीदवाक्य आहे! कोण म्हणेल त्याची कथा आमच्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे! आणखी कोणी अभिमानाने सांगेल की त्याचे नाव आम्ही आमच्या राजाला दिले आहे, त्याच्या राजधानीचे नाव आम्ही आमच्या राजधानीला दिले आहे! कोणी गर्वाने सांगेल की त्याची कथा आम्ही वाचतो – ऐकतो! कोणी आनंदाने गर्जेल – आम्ही रामायण सांगतो – गातो! कोणी सांगेल आम्ही रामाची कथा नाट्यातून सदर करतो, नृत्यातून सदर करतो! कोणी सांगेल आम्ही रामकथा शिल्पात कोरली आहे! तर आणखी कोणी सांगेल आम्ही कळसूत्री बाहुल्यांच्या खेळातून रामायण सादर करतो!
हे सांगणारे भारताच्या बाहेरचे सुद्धा आहेत. जपानी, इंग्रजी, फार्सी, डच बोलणारे आहेत. जैन, बौद्ध, ख्रिस्ती, मुसलमान धर्मीय आहेत. गायक, नर्तक, नट, चित्रकार, शिल्पकार आहेत. अभिजात कला जाणणारे आहेत तसेच लोककला जाणणारे पण आहेत. शहरी आहेत, खेडूत आहेत आणि वनवासी पण आहेत. पुरुष आहेत आणि स्त्रिया पण आहेत. कवी, साहित्यिक, इतिहासकार आणि संशोधक सुद्धा आहेत. प्राचीन काळातील लोक आहेत, मध्ययुगीन लोक आहेत आणि अर्वाचीन काळातील लोक सुद्धा आहेत.

या सगळ्यांना रामायणात असे काय मिळाले की त्यांना रामकथा गात नाचावेसे वाटले? कोण आहेत या विविध संस्कृती? कुणाकुणाची उपजीविका रामकथेवर चालते? रामकथेचा प्रचार कुठेकुठे झाला आहे? हे सर्व जाणण्यासाठी रामकथामाला हे पुस्तक आवर्जून वाचावे! या पुस्तकातून लेखिकेने तात्त्विक मुद्दे मांडले आहेत, जसे –
“पाकिस्तानने जसे रामाला सोडले तसा तो देश रामराज्याला पारखा झाला आहे. युद्धात विजयाला पारखा झाला आहे. तेथील सामान्य नागरिक स्वत:ला बाहेरच्या देशात ‘पाकिस्तानी’ / ‘बांगलादेशी’ आहे हे सांगायला लाजतो. कित्येक जण परदेशात स्वत:ची ओळख ‘भारतीय’ म्हणून सांगतात. त्यांनी हॉटेल काढले तर त्याला ‘Pakistani Restaurant’ न म्हणता ‘Indian Restaurant’ म्हणतात. यांच्या उलट आग्नेय आशियाई देश आहेत. इंडोनेशियाने सुद्धा इस्लाम धर्म स्वीकारला, पण त्यांनी रामाला सोडलं नाही, रामकथेला सोडलं नाही. थायलंडने बौद्ध धर्म स्वीकारला पण रामाला सोडले नाही. कंबोडियाने पण बौद्ध धर्म स्वीकारला पण रामकथा सोडली नाही. रामाला धरल्याने या देशांमधून त्यांची संस्कृती जिवंत राहिली आहे. तेथील लोक उंच मानेने स्वत:ची सांस्कृतिक ओळख सांगतात. आज तिथे देशोदेशीचे पर्यटक रामायण बॅले पाहायला येतात, रामाची शिल्प पाहायला येतात, आणि नतमस्तक होऊन त्या देशाच्या मधुर आठवणी परत घेऊन जातात.”
रामकथेच्या दिग्विजयाचे साकार रूप घेऊन रामकथामला हे पुस्तक मा. राज्यपाल श्री. कोश्यारीजींच्या हस्ते प्रकाशित झालं आहे. दिपाली पाटवदकर ह्यांनी ‘रामकथामाला’ ह्या पुस्तकरूपाने ह्या सर्व रामायण अभिव्यक्तीचा परिचय करून देणारे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. ह्या मध्ये विविध रामायणावरील निरुपण आणि सोबत रंगीत प्रसिद्ध चित्रे, शिल्पांची चित्रे ह्यांनी नटलेले हे पुस्तक आहे. रामकथेच्या दिग्विजयाची कथा सांगणारे हे पुस्तक, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केले असून, या पुस्तकाला श्री निलेश नीलकंठ ओक यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. दिपालीचं पुस्तक केवळ माहिती न राहता एक स्वतंत्र तात्त्विक भूमिकाही मांडतं कारण त्यामध्ये प्रत्येक रूपाचं वैशिष्ट्य आणि फरकही आहे. जरूर संग्रही असावे असे पुस्तक, फोरकलरमध्ये असूनही अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे.
