दैनिक सकाळच्या ‘अयोध्या पर्व’ या १२ एप्रिल २०२१ मध्ये पूर्व प्रसिद्ध लेख
नेतृत्व आणि नेता
नेतृत्व करणे म्हणजे मार्ग दाखवणे. दिग्दर्शन करणे. संकटाचा सामना करायला अग्रणी असणे. समाजाचे नेतृत्व कोण करू शकतो? तर जो अधिकाधिक लोकांना आपल्या वक्तृत्वाने आणि कर्तृत्वाने प्रभावित करू शकतो तो. जो उत्तम योजना तयार करू शकतो, योजना उत्तम रीतीने व शीघ्र गतीने राबवू शकतो, तज्ञांचे मत विचारात घेतो, कुशल लोकांवर काम सोपवतो आणि सोपवलेल्या कामावर देखरेख ठेवतो तो. जो आपल्या अनुयायांशी सम्मानपूर्वक व्यवहार करतो, अनुयायांचे म्हणणे ऐकतो, जो आपल्या अनुयायांच्या मनात उत्साह व बल निर्माण करून त्यांच्या क्षमतेच्या पलीकडे वाटत असणाऱ्या गोष्टी करवून घेऊ शकतो तो. जो नीतीने वागतो, जो सामर्थ्यवान असतो, जो रागाच्या भरात निर्णय घेत नाही (responds not reacts), जो चारित्र्यवान असतो, ज्याने स्वार्थाचा त्याग केला असतो, जो बोलतो तसा चालतो, जो डगमगत नाही, जो लोकापवादाला घाबरतो तो. जो येणाऱ्या काळातील आव्हाने ओळखतो, जो लोकांना संघटीत करतो, असा मनुष्य समाजाचे नेतृत्व करू शकतो. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काढलेले उद्गार एका उत्तम नेत्याचे गुण दर्शवतात –
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ॥
यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत, नीतिवंत । जाणता राजा ॥
आचारशीळ, विचारशीळ । दानशीळ, धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळांठायी ॥
धीर, उदार, गंभीर । शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
कित्येक दुष्ट संहारीले । कित्येकांस धाक सुटले ।
कित्येकांस आश्रयो जाले । शिवकल्याण राजा ॥
एका उत्तम नेत्याचे ठिकाणी, वरील पैकी बरेच गुण कमी अधिक प्रमाणात आढळतात. यातील काही नेतृत्वगुणांचा विचार राम व रावण यांच्या बाबतीत वाल्मिकी रामायणाच्या आधारे करूया.
|| सुशीळ ||
माणसाच्या चारित्र्याला किंवा शीलाला अनेक पैलू आहेत. जसे सत्यवचन, नीति, स्थिरबुद्धी, निर्मोहिता, सदाचरण, शिस्तप्रियता, संयम इत्यादी. अशा गुणांनी संपन्न असलेली व्यक्ती वाहवत जात नाही, क्षणिक मोहाला बळी पडत नाही, कोणत्याही प्रसंगी चांगलंच वागेल याविषयी इतरांच्या मनात खात्री असते. म्हणूनच २१व्या शतकात, अमेरिकेसारख्या प्रगत पाश्चिमात्य देशातील जनतेला सुद्धा शुद्ध चारित्र्याचाच राष्ट्रपती हवा असतो. राम आणि रावण यांच्या चारित्र्याचा एक पैलू – परस्त्रीशी व्यवहार, हा रामकथेतून कसा उलगडतो ते पाहू.
रावणाविषयी त्याची बहिण शूर्पणखा म्हणते, “रावण हा परदार अभिमर्शनम् आहे”. अर्थात दुसऱ्यांच्या पत्नींकडे आकर्षित होणारा, परस्त्रीयांचा विनयभंग करायला मागे पुढे न पाहणारा होता. हे जाणूनच ती रावणाला सांगते, “बंधो! त्या रामाची बायको फार सुंदर आहे. तू तिला बळजबरीने पळवून आणून तिच्याशी लग्न कर. तुझ्या सारख्या बलाढ्य राजाला अशी सुंदर राणी असायलाच हवी.” मंदोदरी सह अनेक स्त्रिया असलेल्या रावणाने आणखी एका सुंदरीची अभिलाषा मनात धरून सीतेचे अपहरण केले. तिला अशोकवाटिकेत राक्षसींच्या कडक पहाऱ्यात ठेवले आणि ताकीद दिली –
ऊर्ध्वं द्वाभ्यां तु मासाभ्यां भर्तारम् मामनिच्चतीम् | मम त्वां प्रातराशार्थमालभन्ते महानसे || ५-२२-९
जर एका वर्षाच्या आत माझ्याशी विवाह केला नाहीस तर तुला मारून, सकाळच्या न्याहारीला मी तुला खाईन.
त्याच काळातील रामाने मात्र एकपत्नीव्रत (One woman man) धारण केले होते. दंडकारण्यात असतांना त्याच्या मदनासारख्या रूपावर भाळून शूर्पणखा एका लावण्यवतीचे रूप घेऊन आली. तिने रामाला लग्नाची मागणी घातली. पण राम तिच्या रुपाच्या मोहात अडकला नाही. तो त्याच्या व्रतापासून ढळला नाही. त्याने शूर्पणखेला आपण एकपत्नीव्रत धारण केले असल्याचे सांगून तिच्या प्रस्तावाला नकार दिला. राम म्हणाला –
कृत दारो अस्मि भवति भार्या इयम् दयिता मम | त्वत् विधानाम् तु नारीणाम् सुदुःखा ससपत्नता || ३-१८-२
ही पहा, ही माझी प्रिय भार्या सीता. तुला का बरे माझ्याशी विवाह करून सवतीचे जिणे जगायचं आहे? ( नकोच ते! तू माझ्याशी लग्न करायचा विचार मनातून काढून टाक! )
राम आणि रावण या दोघांच्या आपल्या पत्नीशी व इतर स्त्रियांशी वर्तनातील हा फरकच राम-रावण युद्धाचे बीज ठरले हा एक भाग झाला. दुसरा असा की शुद्ध चारित्र्यामुळे, राजा नसून सुद्धा, रामाला केवळ अयोध्येतील नागरिकांनीच नाही तर वनवासींनी सुद्धा आपला नेता मानले. राम वनवासात जाणार म्हटल्यावर कित्येक अयोध्यावासी त्याच्या बरोबर जाण्यास निघाले. वनवासात असतांना कित्येक वनवासी आपल्या तक्रारी रामाकडे घेऊन आले. जटायू, शबरी, अगस्ती यांसारखे रामाशी काही संबंध नसलेले लोक स्वत:हून रामाच्या मदतीला आले.
रावणाला त्याच्या अनुयायांकडून असे उत्स्फूर्त प्रेम मिळाले नाही. मारीच आणि कुंभकर्ण हे त्याचे नातलग असून सुद्धा त्यांची मदत मिळवण्यासाठी रावणाला त्यांना धमकी द्यावी लागली होती. मारीचाने सीताहरणासाठी मदत करायला नकार दिला, तेंव्हा रावण म्हणाला –
मृत्युर् ध्रुवो हि अद्य मया विरुध्यतः| ३-४०-२७
माझ्या सांगण्याच्या विरुद्ध गेलास तर तुझा मृत्यू निश्चित आहे हे जाण!
अनुयायांनी ऐकावे यासाठी रावणाला त्याचा अधिकार वापरावा लागला. राम आणि रावण दोघेही नेतेच पण एकाचे नेतृत्व पुढाऱ्या सारखे तर दुसऱ्याचे मालकासारखे होते. (Leader & Boss)
|| बहुत जनांसी आधारू ||
राम – लक्ष्मण – सीता वनवासाच्या काळात दंडकारण्यात आले, तेंव्हा ते शरभंग ऋषींच्या आश्रमात गेले. तिथे अनेक ऋषीमुनींनी रामाला तेथील दुर्दैवी परिस्तिथी सांगितली. अरण्यातील जनतेवर राक्षस सारखा हल्ला करत त्या विषयी सांगितले. त्यांनी रामाला पंपा नदी काठी राक्षसांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ऋषींच्या अस्थींचे ढीग दाखवले व म्हणाले आमचे या राक्षसांपासून रक्षण कर! रामाने त्यांचे आर्जव आज्ञेप्रमाण मानले व दुष्ट राक्षसांपासून त्यांचे रक्षण करण्याचे वचन दिले. बोलल्याप्रमाणे रामाने दंडकारण्यात असतांना अनेक नरभक्षक राक्षसांना यमसदनी पाठवले.
रामाने अनेकांना आधार दिला होता. रामायणाच्या सुरुवातीला विश्वामित्रांना देखील त्राटिकेच्या त्रासापासून सोडवण्यासाठी रामाची मदत मागितली होती. सुग्रीव आणि बिभीषणाला पण रामच आपल्याला आधार देऊ शकतो असे वाटले होते. आणि त्यांचा भाव रामाने सार्थ ठरवला होता.
रावणाच्या बाबतीत त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला होता किंवा इतरंना त्याचा आधार वाटला होता असे दिसत नाही. उदाहरणार्थ – शूर्पणखा जेंव्हा रावणाकडे लक्ष्मणाची तक्रार घेऊन गेली तेंव्हा रावणाला काही तिचे नाक कापल्याचा सूड घ्यावा किंवा त्रिशिर, खर, दुषणाला मारल्याचा सूड घ्यावा असे वाटले नाही. पण शूर्पणखेने जेंव्हा “तुला सीतेसारखी सुंदर बायको असायला हवी” असे आमिष दाखवले तेंव्हा त्याने राम – लक्ष्मणाला फसवून दूर पाठवले व सीतेचे अपहरण केले.
|| धीर, उदार, गंभीर ||
रामाचे वर्णन करतांना नारद मुनी वाल्मिकींना सांगतात –
स च सर्वगुणोपेतः कौसल्यानन्दवर्धनः | समुद्र इव गाम्भीर्ये धैर्येण हिमवानिव || १-१-१७
कौसल्येचा आनंद वाढवणारा राम सर्वगुणसंपन्न आहे. गांभीर्यात तो समुद्राप्रमाणे अथांग आहे, धैर्यात तो हिमालयासारखा अचल आहे आणि दानात तो कुबेरासमान आहे.
रावणाच्या शौर्याचे, धैर्याचे वर्णन सुद्धा रामायणात पदोपदी आले आहे. रावणाच्या मुलांचा आणि भावांचा युद्धात मृत्यू झाला तरीही रावणाने युद्धातून माघार घेतली नाही. तो धीराने रामाशी लढायला रणांगणात उतरला. महाभारतीय युद्धाच्या शेवटच्या दिवशी, दुर्योधन रणांगणातून पळून गेला व नदीत लपून बसला होता, हे लक्षात घेतले असता रावणाचे धैर्य कळते.
|| कित्येक दुष्ट संहारीले ||
रामाने संहार केला आहे तो दुष्टांचा, समाज कंटाकांचा. विश्वामित्रांच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या त्राटिकेचा. जनस्थानातील नरभक्षक राक्षसांचा. भावाच्या पत्नीचे हरण करणाऱ्या वालीचा. आणि शेवटी सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा.
रावणाने आधी केलेले एक युद्ध रामायणात येते ते कुबेराच्या विरुद्धचे. रावणाने स्वत:च्या मोठ्या भावाशी संघर्ष केला तो लंकेचे राज्य व पुष्पक विमान मिळवण्यासाठी. हा रावणाने केलेला संहार काही ‘दुष्टा’च्या विरुद्ध नव्हता. त्यामुळे रावणाच्या नेतृत्वाला हे विशेषण देता येत नाही.
|| कित्येकांस आश्रयो जाले||
राम वनवासात निघाला तेंव्हा लक्ष्मण आणि सीतेने राजवाड्यातील सुखांना तिलांजली दिली व ते रामाबरोबर वनात गेले. भरत सुद्धा रामाबरोबर वनात जाऊन राहण्यास तयार होता. इतकेच काय, विभीषण सुद्धा आपला महाल सोडून रामाकडे आला. सुग्रीवाला पण रामाने आश्रय दिला.
रावणाकडे आश्रय घेतला होता तो मारीचाने. विश्वामित्रांच्या यज्ञात दगडांचा वर्षाव करून विघ्न आणणाऱ्या त्राटिकेला रामाने मारले त्यावेळी मारीच तिथून निसटला आणि त्याने रावणाकडे आश्रय घेतला होता.
|| सामर्थ्यवंत ||
रामाचे सामर्थ्य मंदोदरीच्या शब्दातून सहज प्रकट झाले आहे –
कथन् त्रैलोक्यमाक्रम्य श्रिया वीर्येण चान्वितम् | अविषह्यन् जघान त्वं मानुषो वनगोचरः || ६-१११-६
मंदोदरी रावणाच्या पार्थिवा जवळ बसून म्हणते, “तुझ्यासारख्या त्रैलोक्यावर राज्य करणाऱ्या राजाला, वनात संचार करणाऱ्या एका य:कश्चित माणसाने युद्धात कसे काय हरवलं? अविश्वसनीय आहे ही घटना!”
हेच रामाचे ‘समर्थ’पण आहे. जटा वाढवून, वल्कले धारण करून, वनवासी जीवन जगणारा एक साधा माणूस. तो एका महाबलाढ्य प्रस्थापित राजाच्या विरुद्ध लढायला उभा राहतो. त्यासाठी मित्र मिळवतो, सैन्य जमवतो, समुद्रावर सेतू बांधतो आणि लढून जिंकतो सुद्धा! हे अचाट काम एक समर्थच करू शकतो.
|| सावधानता ||
सावधानता बाळगणारा नेता येणाऱ्या काळातील आव्हाने ओळखतो. सावधानता बाळगली नसता, काय होते ते रावणाच्या व्यवहारातून दिसते. हनुमान समुद्र उल्लंघून लंकेत येऊन सीतेला रामाचा निरोप देऊन जाता जाता लंका दहन करून गेला. तरीही रावणाला हे लक्षात आले नाही की त्याचा शत्रू सैन्यासह समुद्र ओलांडून त्याच्यावर हल्ला करू शकतो. रावण सुग्रीवाला निरोप धाडतांना म्हणतो –
न हीयम् हरिभिर्लङ्का प्राप्तुम् शक्या कथम् चन | देवैरपि सगन्धर्वैः किम् पुनर्नरवानरैः || ६-२०-१२
लंकेपर्यंत पोचता येणे केवळ अशक्य आहे. गंधर्वांना सुद्धा इथे पोचणे शक्य नाही, तिथे मानवांची आणि वानरांची की कथा?
रावण अशा भ्रमात राहिला आणि राम सेतू बांधून सैन्यासह लंकेत पोचला सुद्धा. लंकेत पोचल्यावर जिथे खायला भरपूर कंद-मूळ-फळ होती अशा ठिकाणी तळ ठोकला. आणि सैन्याच्या तुकड्या पाडून प्रत्येक तुकडीवर एक एक प्रमुख नेमून दिला!
|| श्रवण ||
भरत आणि राम, लक्ष्मण आणि राम, सीता आणि राम यांचे अनेक संवाद रामायणात आले आहेत. कसलीही भीड किंवा भीती न बाळगता त्यांनी आपले परखड मत रामाला स्पष्टपणे सांगितले आहे. अशा संवादातून त्यांच्यात होणारी विचारांची देवघेव वाचकाला सुद्धा समृद्ध करून जाते. या संवादातून राम किती लक्ष देऊन ऐकतो आणि त्यावर विचार करून शास्त्रांच्या आधाराने बोलतो हे लक्षात येते.
किंवा रामाचा अजून एक संवाद आहे विभीषणा बरोबर. युद्धाच्या आधी विभीषणाने रामाला रावणाची बलस्थाने सांगितली. त्याच्या कडच्या सैन्याची, हत्ती, रथ, पायदळाची संख्या सांगितली. कोणत्या प्रकारची शस्त्रे घेऊन कोणते वीर लंकेचे रक्षण करत आहेत हे सांगितले. रावण – कुबेर युद्धात रावणाचे सैन्य किती मोठे होते, त्याने कसा पराक्रम गाजवला हे रामाला सांगितले. हे ऐकून रामाने त्यावर विचार केला व त्यानुसार कोणत्या वानर वीराने लंकेवर कोणत्या बाजूने हल्ला करायचा याची योजना बांधली.
रावणाची बाबतीत मात्र अशी ऐकून घेण्याची वृत्ती दिसत नाही. जसेशुक आणि सारण हे रावणाचे दूत रावणाच्या सांगण्यावरून रामाच्या सैन्याची पाहणी करून येतात. आल्यावर ते रावणाला शत्रूची माहिती देतात. किती सैन्य आहे, कोण कोण सरदार आहेत, प्रत्येकाची नावे, त्यांच्याकडील शक्ती कोणती, रामाने आत्तापर्यंत मारलेल्या राक्षसांची जंत्री, रामाच्या प्रचंड मोठ्या सैन्याची माहिती, रामाच्या बरोबरचे इतर योद्धे जसे – लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, अंगद यांची माहिती ते दोघेजण रावणाला सांगतात.
त्यांचा वृत्तांत ऐकून रावण संतापतो! आणि म्हणतो, “रामाने खर, दूषण आदी राक्षसांना मारले असेल, पण त्याने अजून माझे शौर्य पहिले नाही! माझ्या सारखा योद्धा संपूर्ण विश्वात नाही! ते असो, मी त्याला युद्धभूमीत पाहून घेईन. पण तुम्हा दोघांकडे मी आत्ताच पाहून घेतो!
न तावत् सदृशम् नाम सचिवैर् उपजीविभिः | विप्रियम् नृपतेर् वक्तुम् निग्रह प्रग्रहे विभोः || २-२९-७
तुमची उपजीविका माझ्यावर अवलंबून आहे, मी तुमचा राजा आहे, प्रभू आहे. असे असून तुम्ही माझ्याशी अशी कटू वाक्य बोलता?
माझ्या समोर येऊन शत्रूची स्तुती करताय हे तुम्हाला शोभते का? धिक्कार आहे तुमचा! माझ्याशी असे बोलायला तुमची जीभ रेटतेच कशी? तुम्हाला हे बोलतांना मृत्युचं भय नाही वाटलं? तुम्ही आत्तापर्यंत केले काम आठवून मी तुम्हाला मृत्युदंड देत नाही. चालते व्हा इथून, पुन्हा मला तुमच तोंड दाखवू नका!”
या आणि अशा अनेक प्रसंगातून नेता म्हणून रावणाची ऐकण्याची क्षमता कमी पडते असे दिसते. रावणाच्या मृत्यूनंतर रणांगणात आलेली मंदोदरी रावणाच्या पार्थिवाजवळ बसून म्हणते – मी तुला किती वेळा सांगितले की रामाशी वैर ओढवून घेऊ नकोस! सीतेला रामाकडे परत पाठव! पण तू ऐकले नाहीस! आज सीता रामाबरोबर आनंदात आहे, आणि तुझ्या (न ऐकण्या) मुळे आम्ही सगळ्या (रावणाच्या पत्नी) मात्र दु:खसागरात लोटल्या गेल्या आहोत.
मारीचकुम्भकर्णाभ्यां वाक्यं मम पितुस्तथा | न श्रुतं वीर्यमत्तेन तस्येदं फलमीदृशम् || ६-१११-८०
रावणा! मारीच, कुंभकर्ण, विभीषण, माझे वडील आणि मी सुद्धा तुला सीतेला परत पाठवण्याबद्दल वारंवार उपदेश केला. पण तूला तुझ्या शक्तीचा अवास्तव गर्व नडला. तू कुणाचेही ऐकले नाहीस, आणि हाय आज आम्हावर शोक प्रसंग कोसळला!
ज्या रावणाने बायकोला पळवून नेले, ज्याच्याशी लढतांना लक्ष्मण मरता मरता वाचला होता, अनेक सैनिक धारातीर्थी पडले होते, अशा रावणाच्या मृत्यूनंतर मात्र राम – “मरणान्तानि वैराणि” असे सांगून बिभीषणाला रावणाचे अंत्यसंस्कार करायला सांगतो. एका नेत्याचे असे उदात्त विचार संपूर्ण समाजावर दीर्घकाळ संस्कार करणारे ठरले.
नेतृत्व कसे नसावे
चांगल्या नेत्याचे जसे गुण सांगितले आहेत तसेच वाईट नेत्याचे गुण पण रामायणात सांगितले आहेत. शूर्पणखा रावणाला राम-लक्ष्मणाच्या जनस्थानातील कर्तृत्वा बद्दल सांगते तेंव्हा ती म्हणते –
अतिमानिनम् अग्राह्यम् आत्म संभावितम् नरम् | क्रोधिनम् व्यसने हन्ति स्व जनो अपि नराधिपम् || ३-३३-१६
जो राजा अति मानी असतो, ज्याच्याशी संपर्क साधणे संवाद साधणे कठीण असते, जो स्वत:मध्ये रमलेला असतो, जो संतापी असतो, तो राजा संकट कोसळले असता स्वत:च्याच नाही तर स्वजनांच्या नाशास सुद्धा कारणीभूत ठरतो.
हे भविष्य रावणाने अखेर खरे करून दाखवले. युद्धात जसे राक्षसांचे एक एक वीर मारले जाऊ लागले, रावणाची मुले मारली गेली, तेंव्हा रावणाने कुंभकर्णाला बोलावून घेतले आणि सांगितले –
सर्वक्षपितकोशम् च स त्वमभ्युपपद्य माम् |त्रायस्वेमाम् पुरीम् लङ्काम् बालवृद्धावशेषिताम् || ६-६२-१९
आता तू एकटाच मला वाचवू शकतोस कुंभकर्णा! राज्याचा कोश रिकामा झाला आहे. युवा पिढी युद्धात धारातीर्थी पडली आहे. लंकेत आता फक्त बालकं आणि वृध्द राहिले आहेत. अशा परिस्तिथीत आता तूच लंकेचे रक्षण कर!
रावणाच्या नेतृत्वाने लंकेवर अशी परिस्तिथी ओढवली.
रामाच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या अयोध्येतील चित्र या विरुद्ध आहे. राम-रावण युद्ध अयोध्येपासून, किष्किंधेपासून दूर घडले आहे. त्यामुळे या दोन्ही नगरींना युद्धाची झळ लागली नाही. अयोध्येचा तर एकही सैनिक या युद्धात लढला नाही. अयोध्येला कसलीही तोशीस न लागता रामाने शेजारील राज्य असलेल्या किष्किंधा व लंकेत मित्र राजे स्थापन करून दोन देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले.
संदर्भ –
- वाल्मिकी रामायण – English Translation from valmikiramayan.net
- The Practical Sanskrit-English Dictionary – V S Apte
- Two Special Leadership Qualities: Integrity & Fidelity – Darlene Richard