भाषा – मराठी
लेखिका – रुपाली भुसारी
प्रकाशक – वरदा प्रकाशन
पृष्ठ – २३५
किंमत – ३००/-
दहशतवादाची समस्या ही कोणत्याही एका देशाची नाही तर ती आज संपूर्ण जगाची समस्या आहे. मानवी जीवनाची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची जवाबदारी राज्यसंस्थेची आहे. पण आपला सगळ्यात प्रिय असणारा जीवच पणाला लावून काही जण आत्मघातकी दहशतवादी बनतात. मोठ्या प्रमाणात हिंसा घडवून आणतात. त्यामुळे ‘आत्मघातकी दहशतवाद’ हा विषय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरतो. दहशतवादाच्या सगळ्या प्रकारांमध्ये सर्वात दाहक प्रकार म्हणजे आत्मघातकी दहशतवाद. ‘मानवी बॉम्ब’ असेही त्याला म्हटले जाते. एखादी व्यक्ती स्वत; आपला प्राण देत समाजातील अनेक निष्पाप लोकांचे प्राण घेते. त्यासाठी किती तरी आधीपासून तयारी करते. ह्या दहशतवादी हल्ल्याचे यश हे त्याच्या मुत्यूवर आधारीत असते. दहशतवादी व्यक्ती ठार होत असल्यामुळे त्यावर थेट संशोधन करणे शक्य होत नाही. ही मोठी समस्या आहे. तरीही काहीनी त्यावर संशोधन केलेले आहे.त्याचे संदर्भ ह्यात आहेत.
मुळात एखादी व्यक्ती आपला जीव पणाला लावून इतराना ठार मारण्यासाठी तयार होते… काय असतात ह्या मागची कारणे … ह्याचा अभ्यासपूर्ण शोध घेण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केलेला आहे. राजकीय,सामाजिक,मानसिक तसेच धार्मिक अशा सर्व पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे. अगदी दहशतवादाचा इतिहास, त्याचे स्वरूप, आत्मघातकी दहशतवादी तयार कसा होतो ? त्याचे ब्रेनवॉश कसे केले जाते ? त्याची मानसिकता कशी असते ? तसेच निरागस बालके आणि स्त्रिया यांचा गैरवापर दहशतवादी संघटना कशा करतात ? ह्यांची माहिती ह्या पुस्तकात आहे.
भारतात आणि जगातील महत्त्वाच्या दहशतवादी घटना तसेच भावी काळातील दहशतवादाचे आव्हान ह्याचेही विवेचन ह्यात आहे. अमिरीकेचा ९/११ , भारतातील २६/११, पुलवामाचा हल्ला, श्रीलंकेतील हल्ले, इंडोनेशियातील हल्ला, इस्रायल आणि मध्यपूर्वेतील दहशतवादी हल्ले, अल कैदा नंतर इसीसचे वाढते जाळे ह्या सगळ्याचे विश्लेषण ह्यात केलेले आहे. तसेच संभाव्य हल्ला टाळणे ह्यादुष्टीने काही उपाय ह्या पुस्तकात आहेत. अतिशय सखोल संशोधन करून सुद्धा ह्या पुस्तकात माहिती सोप्या भाषेत मांडलेली आहे.
ब्रिगेडीयर [निवृत्त] हेमंत महाजन ह्यांची प्रस्तावना ह्या पुस्तकाला लाभलेली आहे. ह्या विषयावरचे मराठी भाषेतील हे पहिले पुस्तक आहे. प्रत्येक सुजाण नागरीकाने अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे.
पुस्तक वरदा प्रकाशन, Amazon व Flipkart वर उपलब्ध आहे.