डियर समराट असोक,
शिरसास्टांग नमस्कार इनंती इसेष.
मी तुमास्नी पत्र पाठवली … त्ये वाचून तुमी मले सपनात भेटायला आलता … कसं झ्याक वाटलं बगा! मला लई आनंद झाला! तुमच्या सवे गप्पा मारता मारता पहाटच झाली की! मंग उठल्यावर म्या बायाडीला सांगितलं तुमी सपनात आला व्हता म्हनून. तिले वाटलं म्या खोटच बोलतुया! म्हनली आदी तुमी तोंडावर पानी मारून या जावा, झोपेत काईतरी बडबडायलाय! पाह्यलत? अश्शी वागीती माज्याशी. पन जाऊंदे! तिचं न ऐकून सांगतो कुणाला? म्या गुमान हातपाय तोंड धुवून आलो. तर बायाडीने चहाचा कप दिला हातात अन् म्हनली, “कसे दिसत व्हते राजे?”
म्या तिला एकदम डिटेलवार सांगितलं. तुमचा जरीचा फेटा, कपाळावरच गंध, धारदार नजर, तरतरीत नाक, झुबकेदार मिशा, खांद्यावरचा भरजरी शेला, तलम धोतर, कमरेला तलवार, अन् सोन्या मोत्यांचे दागदागिने! कसं एकदम रुबाबदार अन् रांगड रूपड व्हतं माझ्या राजाचं!
“व्हय? काय म्हनलं राजे?” बायाडीने आणखी इचारलं.
“म्या त्याचं कौतुक करायलोय तर त्यो त्याच्या आजाचं सांगू लागला. म्हनला माह्या आजानं (म्हंजी चंदरगुप्त मौर्याने बरे का ग) शून्यातून संमद राज्य हूबं केलं. त्यांचे आधी ते नंद नावाचे कोणतरी राजे व्हते. लई माजले व्हते. मंग गुरु चाणक्यच्या मदतीने चंदरगुप्तने त्यांला हरवले. तवा चंदरगुप्त राजे झाले.”
“असं व्हय? चंदरगुप्त राजानं काय केले नंतर?” बायाडी आता मले खोदुखोदु इचारू लागली बगा.
“चंदरगुप्त लई हुश्शार राजा व्हता. त्याने काय केलं? आपल्या राजधानी भोवती मोट्टी भिंत बांधली पह्यलं. एकदम कडेकोट बंदोबस्त केला. राज्य वाढीवलं. सगळा कारभार चोख केला. सैन्य मजबूत केलं. नवीन तलवारी, अंबाऱ्या, हत्ती घोड्यांची ऑर्डर दिली. आनी काय केलं माहित्ये? आदीच्या नंद राजाच्या काळातली एक सभा व्हती. ती पार जुनी व्हती. म्हनून नवीन मोठी सभा बांधवली. दूर देशातून कारागीर बोलिविले. ८० खांब असलेली वर्ल्ड क्लास सभा बांधली.
“अन् तुले माहितेय? चंदरगुप्तच्या दरबारात यक यवन राजदूत व्हता. मेगास्तेनस की फेनेस काईतरी नाव सांगितलं बॉ राजानं. त्या यवनाने भारतावर पुस्तक लिव्हलं इंडिका नावाचं. त्यामंदी त्याने या सभेबद्दल लिव्हलंय की – चंदरगुप्त राजाची ८० खांबा असलेली सभा लई भव्य हाय. एकदम पारसी राजाच्या सभेवानी मोठी हाय.”
“ऑस्सं? यवनाला पण ती सभा भावली, तर मंग संमद्या परजेला पन आवडली असल, नाई का? किती त्यांला अप्रूप वाटलं असल आपल्या राजधानीत जगात भारी सभा हाय म्हनून!”
“तर तर! त्याच्या परजेला कितीतरी अभिमान व्हता राजाचा! पन संमदी लोकं काय तशी नव्हती! आदीच्या नंद राजाची काई जुनी मंत्री व्हते. त्यांचे पोटात दुखाया लागलं, चंदरगुप्तची कीर्ती त्यांला बघवेना. त्यांनी मोर्चे काढले, धरणं धरली, “सभा नको, झोपडी बांधा” अशा घोषणा दिल्या. पन चंदरगुप्तने मात्र कुण्णाकडं लक्ष दिलं न्हाय. त्यो आपलं काम करत राहिला.”
“अग बया बया! कसली बेक्कार लोकं व्हती ती, चांगल्या कामात इघ्न आणणारी. अशा लोकास्नी चांगलं झालेले काई बघवतच नाय! हे पन त्या राजदूताने लिऊन ठेवलंय होय?”
“हो तर! हे सगळ त्या यवनाने इंडिका मंदी लिव्हलं. पन ती “सभा नको, झोपडी बांधा” ची पाने, आणि चंदरगुप्तला बदनाम करण्यासाठी लिव्हलेल्या प्लॅनची पाने हरवली हायती.”
“मी काय म्हन्ते, ती सभा हाय काय अजून?” बायडीने इचारलं मला.
“येडी की काय तू? हज्जार हज्जार वर्स झाली त्याले. कशी राहील सभा? काई पण इचारती! सभा नाय, पन त्या सभेचे अवशेष मात्र हायती. अजुनी कुमरहारले गेले ना, तर तिथं त्या सभेचं खांब बीम पाह्यले मिळतात. एवढ लॉकडाऊन उठलं न, की तू आनी मी दोघं मिळून जाऊ पाह्यले! लई दूरदुरून लोकं येतात ते पाह्यला. पाटण्या जवळ हाय हे गाव. मुंबईहून थेट पाटण्याला जाऊ आनि आपल्या राजाची सभा बघून येऊ. काय?”
“व्हय, व्हय! जाऊयात की! पन तुमाले एक इचारायचं राहिलं! राजे असे अचानक कसं काय आलत तुमच्या सपनात? आणि आजाच्या सभेची आठवणी का सांगितल्या? ते दिल्ली मंदी नवीन सभा बंधायलेत त्याची परगती इचारायला आलते का? की सभेला ईरोध करनारे अजून परीस हायती ते पाहायला आलते?” बायाडीने इचारले.
“तुला बरे कळले राजांच्या मनात काय व्हत ते! त्यांनी माझ्याकडे दिल्लीच्या नवीन सभेचा प्लान मागवलाय. अन् सभा पूर्ण झाल्यावर त्याचा फोटो पन पाठवायला सांगितलाय!”
“वाटलंच मला.” असे बोलून बायडी सैपाकाला लागली आनी म्या पत्र लिव्हायला घेतलं. तुमी म्हनला व्हता ना, आपल्या झालेलं बोलण लिहून पाठिव? म्हनूनशान तुमास्नी पाठवत हाय. सोबत प्लान पन जोडलाय.
राजे! आमाला अजून बी तुमच्या आजाचा म्हंजी चंदरगुप्तचा लई अभिमान वाटतुया! त्याने राज्य मोठं केलं. जगात भारतचं नाव मोठ केलं. सोताला जगाचा राजा म्हनवणाऱ्या सिकंदरच्या गावाचं राजदूत येऊन चंदरगुप्तचं कौतुक करून गेलं. त्याच्या राजधानीचं, तटबंदीचं, सभेचं गुणगान लिहून ठेवलं ते बर झालं! गोऱ्या वितिहासकाराने लिव्हलं की इथल्या लोकांना पटतच बगा लगेच.
तुमच्या आदनेत ऱ्हानारा,
दामू.
सोपारा.
