आपल्या वेदांमध्ये आशीर्वाद कसे द्यावेत, कुठल्या प्रसंगाला काय द्यावेत, यावर विस्तृत भाष्य सापडतं. विशेषतः लहान मुलांच्या वाढदिवशी यापैकी काही श्लोकाचं उच्चारण तरी अवश्य करावं आणि आपला, म्हणजेच मोठ्यांचा, वाढदिवस साजरा करण्यामागे किमान एखादा तरी छानसा उद्देश ठेवलेला असावा. आपल्या जन्मदिनी, आपण गत जीवनात केलेल्या सत्कृत्यांचं आणि दुष्कृत्यांचंही, स्मरण करावं. दुर्गुणांचा शक्य तितका त्याग करुन, आपल्याला सत्कर्म अंगिकारता यावं, म्हणून देवाची प्रार्थना करावी. माझे काही मित्र-मैत्रिणी त्यांच्या वाढदिवशी पुण्यातल्या एखाद्या वृद्धाश्रमाला भेट देतात. तिथल्या आजी-आजोबांसोबत पूर्ण दिवस घालवतात. त्यांच्यापैकी दोघेजण एका अनाथालयाला मदत करतात, तिथल्या बाळगोपाळांना काही गोडधोड वाटतात आणि दुपारचं जेवण त्यांच्याबरोबरच घेतात. या मित्रांपैकी एकाने, वाढदिवस साजरा होताना, आशीर्वाद देण्यासाठी वेदांमधे काही मार्गदर्शन आहे का, अशी पृच्छा केली होती. माझ्या नाना आजोबांची, कै. श्री. रामदासशास्त्री साधले यांची, हस्तलिखित वही सापडत नसल्याने मी आंतरजालावर शोधकार्य सुरु केलं आणि ती माहिती मिळवताना अथर्ववेदातील यज्ञकर्मांचे काही दुवे सापडत गेले. ——
प्रातःकाळी सूर्योदयाच्या आधी उठून, सर्वप्रथम या जीवनदानासाठी ईश्वराचे आभार मानावेत. त्याने दिलेल्या सुंदर आयुष्यासाठी, त्याला धन्यवाद देऊन, दिनचर्येचा आरंभ करावा. प्रसन्न मनाने शुचिर्भूत होऊन ईश्वराची स्तुति-प्रार्थना, उपासना करावी. यज्ञविधिची तयारी करुन, यज्ञोपवित धारण करुन, स्वस्तिवाचन व शांतिकरण मंत्रांसह यज्ञात खालील आहुत्या द्याव्यात…
पश्येम शरदः शतम् ॥१॥ (आमच्या डोळ्यांची ज्योति शंभर वर्षं सुस्पष्ट असू देत)
जीवेम शरदः शतम् ॥२॥ (आम्हाला शतायुषी करा)
बुध्येम शरदः शतम् ॥३॥ (आम्हाला वयाच्या शंभरीपर्यंत बुद्धिमान ठेवा)
रोहेम शरदः शतम् ॥४॥ (शंभर वर्षं आमची सतत वृद्धी, उन्नति होत राहो)
पूषेम शरदः शतम् ॥५॥ (शंभर वर्षं सतत आम्हाला पोषण मिळत राहो, पुष्टि प्राप्त होवो)
भवेम शरदः शतम् ॥६॥ (आम्हाला (वयाची) शंभरी बघायला मदत करा)
भूयेम शरदः शतम् ॥७॥ (वयाच्या शंभरी पर्यंत आम्हाला पवित्र ठेवा, कुत्सित भावना आमच्यापासून दूर राहोत)
भूयसीः शरदः शतात् ॥८॥ (तुमच्यासोबत शंभर वर्षं अशाच कल्याणकारी चर्चा होत राहोत)
या अथर्ववेदातल्या १९व्या काण्डातल्या ६७व्या सूक्ताचा अर्थ मनाला भावणारा आहे. हे सूक्त सांगतं की हे प्रभो, आम्हाला फक्त शंभर वर्षांचे आयुष्य देऊ नका तर आमची सर्व इंद्रियं, बुद्धी, आरोग्य, कीर्ती, पुत्रपौत्रादी वंश आणि पश्वादी परिवार सतत वृद्धिंगत होत राहील असं करा. तरच त्या शंभर वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्याचा आम्हाला पुरेपूर उपयोग होईल. ही आठ वाक्यं, सूर्यास्त समयी, त्या मावळणाऱ्या दिनकराचे दर्शन घेत, रोज उच्चारावीत असंही सांगितलं जातं. ——
ॐ उप प्रियं पनिन्पतं युवानमाहुतीवृधम्।अगन्म बिभ्रतो नमो दीर्घमायुः कृणोतु मे॥ -अथर्ववेद (७.३२.१)
हे स्तुति करण्यायोग्य प्रिय प्रभु! ज्या प्रकारे मी या आहुत्या देऊन यज्ञातील अग्नि वाढवत आहे, त्याचप्रमाणे सात्त्विक अन्नाचं सेवन घडून माझं आयुष्य वाढत राहो आणि प्रतिवर्षी मला माझा जन्मदिन असाच (आनंदाने) साजरा करता येवो.
ॐ इंद्र जीव सूर्य जीव देवा जीवा जीव्यासमहम्।सर्वमायुर्जीव्यासम्॥-अथर्ववेद (१९.७०.१)
हे परम ऐश्वर्यवान देवा! तुम्ही आम्हाला श्रेष्ठ जीवन द्या. हे सूर्य! हे देवगण! आपल्या अनुकूलतापूर्वकतेने आपण आम्हाला दीर्घजीवन द्या.
ॐ आयुषायुः कृतां जीवायुष्मान् जीव मा मृथाः।प्राणेनात्मन्वतां जीव मा मृत्योरुदगा वशम्॥-अथर्ववेद (१९.२७.८)
मी असा संकल्प करतो की मला मृत्यूला वशीभूत होता येऊ नये. कर्मशील राहून आणि आत्मबलाने युक्त होऊन, ईश्वरभक्त आणि महापुरुषांचं अनुकरण करीत मी माझे आयुष्य वाढवत नेईन. जीवनभर श्रेष्ठ कर्म करून, नेहमी यश प्राप्त करेन.
ॐ शतं जीव शरदो वर्धमानः शतं हेमन्तान्छतमु वसन्तान्।शतमिन्द्राग्नी सविता बृहस्पतिः शतायुष: हविषेमं पुनर्दुः॥-ऋग्वेद (१०.१६१.४)
मनुष्याने श्रेष्ठ कर्म आणि संयम धारण करुन शंभर वर्षं जगण्याचा प्रयत्न करावा. विद्युल्लता, अग्नि, सूर्य, गुरु आणि अशा सर्वांकडून योग्य ती मदत घेऊन (या) मनुष्याने शंभर वर्षांपर्यंत जीवन धारण करावे.
ॐ सत्यामाशिषं कृणुतः वयोधै कीरिं चिद्ध्यवथ सवेभिरेवैः।पश्चा मृधो अप भवन्तु विश्वास्तद रोदसी शृणुतं विश्वमिन्वे॥-अथर्ववेद (२०.९१.११)
हे विद्वानांनो..!! आपला ‘आयुष्यमान् भवः’ हा आशीर्वाद सत्य होवो. आपण दाखवलेल्या मार्गावर चालणाऱ्याचे आपण ज्ञान देऊन (सतत) रक्षण करीत असता. आपल्या मार्गदर्शनामुळेच त्या मार्गाने जाणाऱ्याचे सर्व दोष नष्ट होत जातात. म्हणूनच हे श्रेष्ठ स्त्री-पुरुषांनो, तुम्ही आम्हाला वेदोक्त शिक्षण द्या.
ॐ जीवास्थ जीव्यासं सर्वमायुर्जीव्यासम् ॥१॥
जळासारख्या शांत स्वभावाच्या सज्जनांनो! तुम्ही मला दीर्घायुष्याचे शुभाशीष द्या. सदाचरण व प्रभुपूजेने मी माझे जीवन वाढवू शकेन. तुम्हीच असे जीवन मला देऊ शकता, म्हणूनच माझ्यावर कृपा करुन आपण हे श्रेष्ठ जीवनतत्त्व मला प्रदान करा. मी आपल्यासारख्या लोकांच्या मदतीने आणि प्रेरणेने दीर्घजीवन प्राप्त करण्याचा प्रयत्न करु इच्छितो.
ॐ उपजीवा स्थोप जीव्यासं सर्वमायुर्जीव्यासम् ॥२॥
ॐ सं जीवा स्थ सं जीव्यासं सर्वमायुर्जीव्यासम् ॥३॥
ॐ जीवला स्थ जीव्यासं सर्वमायुर्जीव्यासम् ॥४॥-अथर्ववेद (१९.६९.१-४)
या उच्चारणांनंतर, आयुष्याची जितकी वर्षं पूर्ण झाली असतील तितक्या वेळा, श्री गायत्री मंत्राच्या आहुति देऊन शेवटी पूर्णाहुति अर्पण करावी. सर्वात शेवटी यज्ञ-प्रार्थना आणि शांतिपाठ करावा. नंतर घरातल्या वडीलधाऱ्यांनी ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या डोक्यावर पुष्पवृष्टी करुन खालील आशीर्वाद द्यावा.
हे……….(ज्याचा वाढदिवस आहे त्याचे नाव घ्यावे)! त्वं जीवः शरदः शतं वर्धमानः। आयुष्मान् तेजस्वी वर्चस्वी श्रीमान् भूयाः॥ अर्थ- हे……..! तू आयुष्यमान, विद्यावान, धार्मिक, यशस्वी, पुरुषार्थी, प्रतापी, परोपकारी असा श्रीमान हो!! —–आपल्या प्रिय व्यक्तीच्या जन्मदिवशी हा विधि अवश्य करुन बघावा. प्रत्यक्ष यज्ञ करणं हल्ली सहजशक्य होत नाही, अशा वेळी साधा नंदादीप किंवा समई प्रज्वलित करुन, त्याच्यासमोर बसून, शांत आणि एकाग्र चित्ताने हे उच्चारण/ यज्ञ विधी करता येतील. वैदिक ग्रंथांनी आपल्याला दिलेल्या या देणगीचा उपयोग अवश्य करुन बघावा. आशीर्वादात भरपूर बळ तर असतेच पण या विधींमुळे त्याचा प्रभाव शतगुणित होतो, असं साक्षात वेदांनी सांगितलेलं आहे.
॥शुभम् भवतु ॰ कल्याणम अस्तु॥
– सिद्धार्थ अकोलकर