भाषा – मराठी
लेखक – डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले
प्रकाशक – भारतीय विचार साधना, पुणे
प्रत मागविण्यासाठी संपर्क – ०२०-२४४९०४५४
https://bhavisa.org/product/इस्लामचे-अंतरंग/
किंमत – ₹१५०/-
अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता प्रस्थापित केली आणि वेगाने घडामोडी घडत गेल्या. ‘शरिया कायदा’ लागू केला, स्त्रियांनी बुरखा वापरण्याची सक्ती, अफगाणिस्तानमधून त्वरित बाहेर पडण्याची लोकांची धडपड ह्या सगळ्या बातम्या प्रसारमाध्यमांमुळे वेगाने समाजात पसरल्या. ह्यात ‘इस्लाम आणि शरिया’ ह्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न गुगलवर केला तर हजारो साईट्स सापडल्या. ह्यात नेमाके काय वाचावे आणि नेमकी खरी माहिती कोणती आहे ह्याविषयी शंका निर्माण झाल्या. मग ‘इस्लामचे अंतरंग’ हे डॉ. श्रीरंग गोडबोले सरांचे पुस्तक हाती आले. इस्लामविषयी स्पष्ट, सोप्या आणि मुद्देसूद भाषेत सगळी माहिती त्यांनी ह्या पुस्तकात दिलेली असल्यामुळे अनेक शंकांचे समाधान झाले. इस्लाम समजायला अतिशय उपयुक्त असे हे पुस्तक आहे.
ह्या पुस्तकात ‘शरियत कायदा’ म्हणजे काय, शरियतचे स्रोत – कुराण, हदीस, इज्मा; तसेच कियास ह्याची माहिती सोप्या भाषेत आहे. इस्लामची न्यायप्रणाली कशी असते. ‘हुदूद अपराध’ म्हणजे जे कुराण आणि अल हदीसमध्ये आहेत आणि त्यांच्या शिक्षेचा तपशील त्यात दिलेला आहे. इस्लामचे पंथ यात शिया आणि सुन्नी, देवबंदी आणि बरेलवी, वहाबी आणि अहल-ए- हदीथ आणि सुफी पंथ ह्याचे विवेचन केलेले आहे. हे कसे भिन्न आहेत. त्याचे बारकावे ह्या पुस्तकात आहेत. भारतात कोरोनाच्या काळात गाजलेली ‘तबलीघी जमात’, तिची कार्यपद्धती ह्यात आहे. इस्लाममध्ये स्त्रीचे स्थान आणि त्यांच्यावरील बंधने ह्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. इस्लाममध्ये विवाह हा करार असतो. ह्यात विवाहयोग्य आणि विवाहासाठी निषिद्ध स्त्रिया, आंतरधर्मीय विवाह, पती-पत्नीची भूमिका, बहुपत्नीत्व आणि तलाक, त्याचे प्रकार ह्या विषयी सखोल विश्लेषण आहे. जगात इस्लामी लोकसंख्या वाढताना आढळते. इस्लाममध्ये संततीनियमनाची भूमिका, इस्लामी देश कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम राबविताना कुराणच्या ज्या आयातींचा आधार घेतात त्याचे विवेचन केले आहे. ‘काफिर’ म्हणजे नेमके काय ? ‘जिहाद’ म्हणजे काय ? त्याचे प्रकार तसेच ‘धिम्मी’ ह्या संकल्पनेची माहिती आहे. ‘वक्फ’ म्हणजे काय ? ह्याची माहिती आहे. धर्मत्याग आणि त्याविषयी कुराणचा निर्णय ह्यावरही सोप्या पण अगदी स्पष्ट भाषेत लेखकाने लिहिलेले आहे.
इस्लाम विषयी स्वत सखोल अभ्यास करून लेखकाने अत्यंत महत्त्वाची माहिती ह्या पुस्तकात दिलेली असल्यमुळे सामान्य वाचकांच्या इस्लामविषयीच्या शंकांचे निरसन होते. इस्लामविषयी ज्ञान मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक प्रत्येक घरात संग्रही असावे असे आहे.
– रूपाली कुळकर्णी-भुसारी