पूर्व प्रसिद्धी – मुंबई तरुण भारत, १४ जानेवारी २०२१
विविधतेत एकता दिसणे हे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आहे. या उदात्त विचाराचा पाया वेदांनी घालून दिला आहे. ऋग्वेदात दीर्घतमा औचथ्यः ऋषींनी सूर्याची स्तुती करतांना म्हटले आहे –
इन्द्रं॑ मि॒त्रं वरु॑णम॒ग्निमा॑हु॒रथो॑ दि॒व्यः स सु॑प॒र्णो ग॒रुत्मा॑न् ।
ज्ञानी जन वेगवेगळ्या प्रकारे तुझ्या एकाचे वर्णन करतात. ते एकाच सत् वस्तूला इंद्र, मित्र, अग्नी, वरुण आणि सूर्य म्हणतात. परमात्मा हे एकच तत्त्व आहे. ते जेंव्हा ऐश्वर्यवान होते तेंव्हा त्याला इंद्र म्हटले आहे, हितकारी होते तेंव्हा त्याला मित्र म्हटले आहे, श्रेष्ठ होते तेंव्हा वरुण म्हटले आहे, पृथ्वीवर प्रकाश देणारे होते तेंव्हा त्याला अग्नी म्हटले आहे आणि आकाशात प्रकाश देणारे होते तेंव्हा त्यालाच सूर्य म्हटले आहे!
एकं॒ सद् विप्रा॑ बहु॒धा व॑दन्त्य॒ग्निं य॒मं मा॑त॒रिश्वा॑नमाहुः ॥ ऋग्वेद १.१६४.४६॥
हाच विचार पुढे नेत उपनिषदांनी परमात्म्याबद्दल म्हटले आहे – ॥ स एकाकी न रमते ॥ तो परमात्मा एकटाच होता, पण त्याला एकट्याने करमेना, म्हणून तो एकाचा अनेक झाला – ॥ एकोऽहं बहुस्यां ॥
अर्थात एकाचेच अनेक होणे, आणि अनेकात एक पाहणे ही वृत्ती अंगी बाणल्याने भारतीय जीवनाच्या प्रत्येक अंगात आपल्याला एकच तत्त्व विविध प्रकारे नटतांना दिसते आणि त्या विविधतेत पुन्हा एक तत्त्व पाहण्याची शक्ती आपल्या दृष्टीला वेदांनी दिली आहे. औदार्यमूर्ती असलेल्या वेदांनी विविधतेला प्रोत्साहन दिले.
विविधतेतील एकता जाणण्यासाठी मकर संक्रांतीचा सण एक उत्तम उदाहरण आहे. या सणाचे तत्त्व आहे – सूर्याचा मकर राशीत प्रवेश. पूर्वी हे संक्रमण २१ डिसेंबरला होत असे, आता १४ – १५ जानेवारीला होते. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होणे हे उत्तरायण सुरु झाल्याचे सूचित करणारी आकाशातील अलौकिक घटना होती. थंडी आणि अंधाराचे राज्य संपून प्रकाशाचे आणि उबेचे राज्य सुरु होणार असल्याची ही नांदी आहे! सूर्याचे मकर राशीतील आगमन आता दिवस मोठा होत जाणार, अधिक उजेड, अधिक उब घेऊन येणार असल्याचा संकेत आहे. पण अजून थंडी संपली नाहीये … म्हणून थंडीसाठी उपयुक्त असेलेले तीळ व गुळ आहारात घ्यायला हवेत, या काळात खूप भाज्या पिकत असल्यामुळे भरपूर भाज्या खाव्यात. वैदिक यज्ञव्यवस्थेने उत्तरायणाला आणि दक्षिणायनाला गुरांची विशेष करून बैलांची सेवा / पूजा करण्यास सांगितले आहे. उत्तरायण व दक्षिणायन २१ जून व २१ डिसेंबरला असते, पण आपण प्राचीन परंपरेला अनुसरून ते श्रावण अमावस्येला आणि मकर संक्रांतीला साजरं करतो. सूर्याची पूजा, अग्नीची पूजा, बैलांचा उत्सव आणि आहारात तिळगुळाचा समावेश हे एक तत्त्व भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाम व रूप घेऊन नटलेले दिसते. ते वैविध्यपूर्ण रूप पाहू –
सूर्य पूर्ण वर्षात १२ राशींमध्ये प्रवास करत असल्याने, प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते. पण शिशिर ऋतू मधली मकर राशीतली संक्रांतीला विशेष महत्व आहे. जम्मू-काश्मीर मध्ये मकर संक्रांतीला ‘शिशुर संक्रांत’ नाव आहे, शिशिर ऋतू मधली संक्रांत म्हणून. स्थानिक कॅलेंडर मधील महिना अमावस्येला संपतो की पौर्णिमेला त्यानुसार मकर राशीतली संक्रांत पौष महिन्यात किंवा माघ महिन्यात पडते. उत्तरेकडे माघ महिन्यात मकर संक्रांत येत असल्याने तेथील संक्रांतीच्या नावात ‘माघ’ येते. नेपाळ मध्ये ‘माघे संक्रांत’, पंजाब मध्ये ‘माघी’, हिमाचल मध्ये ‘मागी साजी’ आणि आसाम मध्ये ‘माघ बिहू’ अशी नावे दिसतात. बंगाल मध्ये आणि बांगलादेश मध्ये ह्या सणाला ‘पौष संगक्रांती’ म्हणतात. सिंध (पाकिस्तान) मध्ये संक्रांतीला उत्रान (उत्तरायण) म्हणतात. राजस्थान व गुजरात मध्ये ‘उत्तरायण’ म्हणतात. उत्तरप्रदेश व बिहार मध्ये ‘खिचडी’ म्हणतात. महाराष्ट्र, ओडीसा व आंध्र मध्ये ‘मकर संक्रांती’ म्हणतात. कर्नाटक मध्ये ‘मकर संक्रमण’ आणि केरळ मध्ये ‘मकर विल्लाक्कू’. तामिळनाडू, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया मध्ये ‘पोंगल’ अशा अनेकविध नावांनी सूर्याचा मकर राशीतला प्रवेश साजरा केला जातो.
संक्रांतीला गंगास्नानाला विशेष महत्व आहे. उत्तरप्रदेश, बिहार मध्ये गंगास्नान, बंगाल मध्ये गंगासागर स्नान पुण्याचे मानले आहे. प्रयाग येथील कुंभमेळ्याचे पहिले स्नान मकर संक्रांतीला सुरु होते. या दिवसात पंजाबपासून तमिळनाडूपर्यंत सूर्य आणि अग्नीची पूजा केली जाते. काही ठिकाणी विष्णूची पूजा पण केली जाते. संक्रांतीला दानाला विशेष महत्व आहे. एका गरजू कुटुंबाला एका जेवणाला पुरेल इतके तांदूळ, तूप, फळे, तीळ, खीर या गोष्टी दान करण्यास सांगितल्या आहेत.
संक्रांतीचा सण एक दिवसाचा नसून माघ शुद्ध सप्तमी पर्यंत म्हणजे रथ सप्तमी पर्यंत चालणारा सण आहे. अनेक ठिकाणी पहिले ३-४ दिवस महत्वाचे असतात. महाराष्ट्रात भोगी, संक्रांत हे दोन दिवस महत्वाचे आहेत. ह्या दरम्यान गायी-बैलांची पूजा आंध्र मध्ये संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, गोधनाची पूजा करतात आणि तिसऱ्या दिवशी रेड्यांची झुंज, कोंबड्यांची झुंज लावली जाते. तमिळनाडू मध्ये तिसऱ्या दिवशी म्हणजे माट्टू पोंगलच्या दिवशी गुरांना सजवून त्यांच्या अंगावर झूल घालून, शिंगाना सोनेरी कवच घालून मिरवणूक काढतात. बैलांना गोडधोड करून खाऊ घालतात. चौथ्या दिवशी बैलांचा जल्लीकटूचा खेळ रंगतो! कर्नाटकात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, गायी, बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतात.
संक्रांत हा एकत्र येऊन वेगवेगळे खेळ खेळण्याचा, आप्तेष्टांना भेटण्याचा पण सण आहे. पंजाब मध्ये संक्रांतीला रात्री शेकोटी पेटवून भांगडा नृत्य करतात. गुजरात मध्ये, पंजाब मध्ये शेजारी पाजारी एकत्र जमून पतंग उडवतात. आजकाल गुजरात मध्ये संक्रांतीला Kite Festival आयोजित केला जातो. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात आप्त स्वजनांच्या घरी जाऊन तीळ गूळ देण्याची पद्धत आहे. तसेच संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत घरोघरी हळदी-कुंकू करून वाण लुटण्याची पद्धत आहे.
संक्रांतीनिमित्त भारतभर तिळ-गुळाचे विविध पदार्थ केले जातात. पंजाब मध्ये ‘तिल चावली’ म्हणजे तीळ – गूळ घालून पुलाव, आणि ‘रस्से का खीर’ म्हणजे उसाच्या रसात तांदळाची खीर केली जाते. उत्तराखंड मध्ये घुगुतीमाला करतात. म्हणजे उसाच्या रसात कणिक मळून त्याच्या छोट्या छोट्या तलवारी, ढाली तळून त्या खाऊच्या तलवारींची माळ मुलांच्या गळ्यात घालतात. राजस्थान मध्ये तिळाचे विविध प्रकार करतात – तीळ-पट्टी, तिळाचे लाडू, खीर, घेवर आणि पकोडी. मध्यप्रदेशची तिळगुळाची पातळ चिक्की गजक तर प्रसिद्धच आहे. बिहारमध्ये संक्रांतीला तीलवा म्हणजे तीळ, गुळ, तांदूळ आणि पोहे घालून तिळगुळ करतात.
आसाम मध्ये तीळ पीठा म्हणजे तांदळाच्या आंबवलेल्या पीठाचे लहानसे धिरडे करून त्यात तीळ-गुळ-नारळाचे सारण भरून रोल करतात. या शिवाय कोट पीठा, शुंग पीठा, घीला पीठा आणि पोडा पीठा असे अनेक गोड पदार्थ संक्रांतीला करतात. ओडिशा मध्ये मकर चौला म्हणजे तांदूळ, केळी, नारळ, गूळ आणि तीळ घालून गोड खीर करतात. बंगाल मध्ये गोकुल पीठे म्हणजे – गूळ, खवा आणि नारळाचे सारण भरून, तुपात तळून, पाकात घोळलेला कणकेचा मोदक!
गुजरात मध्ये तीळ, गूळ व दाणे घालून चिक्की करतात. महाराष्ट्रात तिळगुळाचे लाडू आणि तीळगुळाची पोळी करतात. कर्नाटकात एल्लू बेळ्ळा म्हणजे पांढरे तीळ, दाणे, खोबरे आणि गूळ याचा कोरडा तिळगुळ करतात. आंध्रमध्ये संक्रांतीला अरीसेळू करतात. हा प्रकार फार जिकीरीचा आहे, आपल्या अनारश्यासारखा. दोन दिवस तांदूळ भिजवून वाळवून पीठ करायचं. ते गुळाच्या पाकात तीळ घालून मळायचं. आणि त्याच्या पुऱ्या तळायच्या. तमिळनाडू मध्ये पोंगलला नवीन पातेल्यात खीर करून सूर्याला नैवेद्य दाखवतात.
संक्रांतीच्या काळात विविध भाज्या पण केल्या जातात. जसे गुजरात मध्ये उंधियो. महाराष्ट्रात भोगीला – खिचडी, वांग्याची भाजी, आणि तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. उत्तर प्रदेश, बिहार मध्ये संक्रांतीला ‘खिचडी’ म्हणतात आणि जेवायला सुद्धा खिचडी करतात. बंगाल मध्ये खिचडी, चोखा म्हणजे खूप भाज्यांची भाजी, पापड, तूप आणि लोणचे. ओडिशा मध्ये खिचुरी म्हणजे खिचडी करतात.
एकूण संक्रांतीचा सण साजरा करण्यात प्रचंड विविधता दिसते. पदार्थांमध्ये, गोधनाच्या सेवेमध्ये, उपासनेमध्ये आणि खेळांमध्ये ही विविधता दिसते. असे म्हणता येईल की या सणाचे तत्त्व एक आहे – तीळगुळ, गोसेवा आणि सूर्योपासना. आणि भारतभर तेच एक तत्त्व विविध प्रकारांनी प्रकट केले जाते. ही एकातून प्रकट झालेली विविधता आहे आणि खोलात गेले की वरवर दिसणाऱ्या विविधतेत एकता दिसते. शेवटी काय आहे, या जगाच्या अफाट पसाऱ्यात वरवर दिसणाऱ्या विविधतेच्या मुळाशी एक ब्रह्म-तत्त्व आहे जाणणे हेच ज्ञान होय!