दाते पंचांग, २०२० मध्ये पूर्व प्रसिद्ध

आपल्या बोलण्यात असे येते … संस्कृती जतन करायला हवी, हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, किंवा हीच का तुमची संस्कृती? वगैरे! संस्कृती म्हणजे काय निक्की काय? आणि काय आहे हा सांस्कृतिक वारसा?

भूक लागल्यावर जेवणे ही प्रकृती आहे. पण आपण भुकेले असतांना, आपल्यातले अन्न दुसऱ्याला देणे, ही संस्कृती आहे. किंवा सोन्याचा गोळा ही प्रकृती आहे, पण त्यापासून घडवलेला अलंकार ही संस्कृती दाखवते. किंवा तांदूळ ही प्रकृती आहे तर त्यापासून केलेला नारळीभात ही संस्कृती दाखवते. दगड ही प्रकृती आहे, तर त्यावर घाव घालून घडवलेली मूर्ती ही संस्कृती दर्शवते. किंवा दूध ही प्रकृती आहे, तर त्याला विरजण लावून, घुसळून, काढवून त्याचे तूप करणे ही संस्कृती झाली. 

जिथे काही संस्कारांनी एखादी गोष्ट सुंदर, शुद्ध, दीर्घायुषी व समृद्ध होते; पाहणाऱ्याच्या मनात आदरयुक्त कौतुक निर्माण करते, तीथे संस्कृतीचा जन्म होतो. एका दिवसात खराब होऊ शकणाऱ्या दुधावर विरजण आदी संस्कार केले की त्याचे दीर्घकाळ टिकणारे व अधिक पौष्टिक असे तूप होते. किंवा एखाद्या मनुष्यावर योगासनाचे संस्कार केले असता तो आरोग्यपूर्ण व दीर्घायुषी होतो. किंवा लहान मुलावर स्वच्छता, शिक्षण, अभ्यास, निरपेक्ष प्रेम, निष्काम कर्तव्य, स्वसंरक्षण, मोठ्यांचा आदर, आदि संस्कारांचे घाव रोजच्या रोज घातले असता ‘सुसंस्कृत’ नागरिक तयार होतो.

जेंव्हा एखादा संपूर्ण समूह असे संस्कार आत्मसात करतो तेंव्हा त्या समूहाला ‘टोळी’ न म्हणता ‘संस्कृती’ असे म्हटले जाते. उदाहरणार्थ – सिंधू संस्कृती. किंवा दगडावर संस्कार करून हत्यारे तयार करणारी पाषाणयुगीन संस्कृती. असे संस्कार जेंव्हा परंपरेने पिढी दर पिढी चालत येतात तेंव्हा तो आपला सांस्कृतिक वारसा होतो. हा वारसा वेगवेगळ्या पद्धतीतून, रीतिरिवाजातून, रूढीतून आणि सामाजिक संस्थांमधून प्रकट होतो.

भारत हा जगातील एकमेव देश आहे, ज्याला किमान ७००० वर्षांची अखंडित सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. आपल्याला वारस्याने मिळालेले जमीन, वाडी, बंगला, गाडी या वस्तू डोळ्याला दिसतात. तशी परंपरेने मिळालेली  मातृभाषा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. ज्या मराठी भाषेमुळे ज्ञानेश्वरी आणि गीतरामायण ऐकायचे भाग्य लाभले, ज्या मराठी भाषेने ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ ऐकवतांना डोळे पाणावले, ज्या मराठीने ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हे शिकवले, त्या सांस्कृतिक वारास्याची किंमत मोजता येत नाही.

परंपरेने चालत आलेली उकडीचे मोदक, पुरणाची पोळी, गुळाची पोळी, काळा मसाला, मेतकुट, पापड, लोणचे, कुरडई, शेवई, फोडणी, विरजण, इत्यादी करायच्या पद्धतीची हा पण सांस्कृतिक वारसा आहे.

घरातील सण साजरा करायची पारंपारिक पद्धत जसे – गौरीचे जेवण, नवरात्रीला केली जाणारी कुमारिकेची पूजा, दिवाळीला करायचा आकाशकंदील, पणत्यांची सजावट हा पण आपला सांस्कृतिक वारसा आहे.

अगदी साधी ठिपक्यांच्या रांगोळी काढायची पद्धत, हा सुद्धा आपला सांस्कृतिक वारसा आहे. दारात काढायची लक्ष्मीची पाऊले, गोपद्म, शंख, चक्राची ठराविक नक्षी परंपरेने मिळाली आहे.

कथा, कहाण्या, म्हणी, आणि जीवन सुंदर करणारी पारंपारिक गाणी हा सुद्धा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. पाळणे, बडबड गीते, भोंडल्याची गाणी, नागपंचमीची गाणी, मंगळागौरीची गाणी, डोहाळ जेवणाची गाणी, लग्नातली गाणी इतकंच काय जात्यावरच्या ओव्या आहेत, आणि शेतातील तृण काढतांना म्हणायची गाणी देखील आहेत. एकत्रितपणे मुक्त कंठाने पारंपारिक गाणी गाणे हा एक stress buster तर आहेच, पण जीवनातील वेगवेगळे प्रसंग साजरे करून आनंद लुटायचा मार्ग सुद्ध ते दाखवतात.

जगण्याच्या कलेचा वारास्याला – सांस्कृतिक वारसा म्हणू शकतो. हा सांस्कृतिक वारसा आपल्याला रोजच्या जीवनात आनंदी कसे राहायचे ते शिकवतो. दु:ख पचवायला शिकवतो. आला दिवस कसा साजरा करायचा ते शिकवतो. आरोग्याला काय चांगले आहे, काय खावे ते सांगतो. कोणता व्यायाम करावा ते सांगतो. मुलांना कसे वाढवावे, कधी पाहिलं जेवण द्यावे ते सांगतो. हा सांस्कृतिक वारसा आपल्यापासून वेगळा करता येत नाहीत. कारण तो आपल्या जीवनाचा केवळ अविभाज्य भाग नाही तर आपल्या जीवनाचा पाया आहे. तो काढून टाकला तर, आपले जीवन कोलमडून पडेल. आणि मग, आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काहीही फरक राहणार नाही.

भाषेचा, गाण्यांचा, गणिताचा, कालगणनेचा, विज्ञानाचा, तत्त्वाज्ञानाचा, कपड्यांचा, अन्नाचा, चित्रांचा, स्थापत्याचा, सणांचा वारसा आपल्याला सहज मिळत असल्याने, आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव नसते.

आजकाल अगदी सहज, अलीकडची युवक – युवती – “my life my rules” म्हणतात. जिथे आपली भाषा, आपले शिक्षण, आपली वेशभूषा, आपले खाद्य पदार्थ, आपला धर्म, आपली ओळख इतकेच काय, आपले नाव सुद्धा एका सांस्कृतिक परंपरेतून येते, तिथे आपलं जगणं हे खरोखर “स्वत:चे” किती आणि “वाराशाने” मिळालेले किती? भाषे शिवाय जिथे विचारही खुंटतो, तिथे “my life my rules” हे शब्द तरी कुठून येणार?

एखादी परंपरा मोडतांना आपण हजारो वर्षांच्या विचारांवर, शेकडो पिढ्यांच्या कष्टांवर, पूर्वजांच्या शहाणपणावर  पाणी सोडत असतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यावर एकदा नाही हजार वेळा विचार करायला हवा. त्या परंपरेचा नक्की उद्देश काय, आणि ती परंपरा मोडून काय साध्य होणार आहे, हा विचार निश्चित हवा.

आवळी भोजनाची प्रथा तर आपण कधीच बंद पाडली. पण आता “आरोग्याला चांगला असतो” म्हणून आवळा ज्यूस विकत घेऊन पितो. पूर्वी आवळी भोजनासाठी आवळ्याचे झाड मुद्दाम लावले जायचे. आजही आवारात आवळ्याचे झाड लावायला जागा आहे, पण आवळी भोजनाच वारसा गमावल्यामुळे, त्या झाडाची आठवण न होता, शोभेची परदेशी झाडे लावली जातात. आवळ्याचे झाड आवारात असे तोवर त्या झाडाखाली खाली फिरणे, त्याची ताजी फळे खाणे होत असे. फळे देणाऱ्या झाडाशी आपलेपणाचे नाते निर्माण होत असे. आता आवळ्याचे झाड लावणारा, त्याकडे “Raw material” म्हणून बघतो आणि आपण कोरडेपणाने preservatives घातलेला, प्लास्टिकच्या डब्यातला आवळ्याचा ज्यूस पितो. मग आवळी भोजनाची प्रथा मोडून आपण खरोखर काय मिळवले आणि काय गमावले याचा विचार करायला हवा.

आपण जसे आजोबांच्या घरावर अधिकार सांगतो, तसा त्यांचा पोशाख पण आपली जहागीर आहे. त्यांच्यासारखी पगडी बांधता येत नसेल, त्यांच्या सारखे दुटांगी धोतर नेसता येत नसेल तर आपण आपला वारसा गमावला आहे. आजीसारखी भाकरी करता येत नसेल, तिची ठेवणीतली नऊवारी नेसता येत नसेल तर तिच्या दागिन्यांवर तरी अधिकार कसा सांगायचा?

बदलत्या काळात, सांस्कृतिक वारसा जपणे निश्चित कठीण आहे. बाहेरच्या देशांमध्ये आपला वारसा  टिकवण्यासाठी केलेली खटपट पाहता आपण कुठे आहोत हे कळते. उदाहरणार्थ, लंडन मध्ये – केवळ पारंपारिक पद्धतीनेच घर बांधायला परवानगी मिळते. तिथे रस्त्याच्या दुतर्फा वसलेली त्यांची टुमदार घरे आपल्या मनात घर करून बसतात. किंवा फ्रांसने तिथे झालेला फास्टफूडचा सुळसुळाट पाहून, त्यांच्या पौष्टिक खाद्य संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि ती टिकावी या करिता ‘फ्रेंच कूसीन’ ला जागतिक वारशाचा दर्जा मिळवला.

त्यांना स्वत:च्या वारशाबद्दल आदर व आपलेपणा दिसतो. लंडन मधील Westminister Abbey चर्च किंवा कॅम्बोडिया येथील अंकोर वाट मंदिर, या जागतिक वारसा असलेल्या प्रार्थना स्थळांची सभ्यता राखण्यासाठी ड्रेसकोड लागू आहे. आपल्याकडेही काही मंदिरात धोतर / साडी नेसल्याशिवाय प्रवेश नसतो. त्याकडे “व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला” या दृष्टीने न पाहता, वारसा व तेथील सभ्यता या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.

एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याचे / वास्तूचे नुकसान करणे हा जसा गुन्हा आहे. तसेच चालत आलेला सांस्कृतिक वारसा विनाकारण मोडणे हा सुद्धा गुन्हा आहे. सांस्कृतिक परंपरेला केवळ विरोधासाठी विरोध करणे, आपल्या मुलांना त्यांच्या हक्काच्या वारशाची ओळख करून न देणे, हा पण गुन्हा आहे. किल्ल्याचे / वास्तूचे नुकसान केले, तर एकवेळ नुकसानीचे मोजमाप करता येईल. पण सांस्कृतिक परंपरेचे नुकसान मोजमापाच्या पलीकडचे आहे.

आपला वारसा जपण्यासाठी व संस्कृतीलक्ष्मीचे संवर्धन करण्यासाठी पुन्हा एकदा प्रतिज्ञा घेण्याची वेळ आली आहे  –

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे ||

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन ||


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Website Powered by WordPress.com.

%d bloggers like this: